किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांच एक जबरदस्त बॉन्डींग होतं. म्हणजे सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळात इतर संगीतकार किशोर कुमारकडे लक्ष देखील देत नव्हते. त्या काळात सचिन देव बर्मन आवर्जून आपल्या चित्रपटातून किशोर कुमार यांचा स्वर वापरत होते. या दोघांमधील नात्याचे हे बंध अखेरपर्यंत कायम राहिले. सचिन देव बर्मन यांच्या कडील किशोर कुमार यांनी गायलेल्या शेवटच्या गाण्याचा एक भावस्पर्शी किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला.
खरोखरच त्या काळामध्ये कलावंतांमध्ये आपापसामध्ये केवढं मोठं प्रेम होतं. एक आत्मियता होती. परस्परांचा सन्मान होता. एक आदर होता. त्यामुळेच त्या काळातील गाणी आज इतकी पन्नास-साठ वर्षे झाली तरी आपल्याला आठवत असतात. सचिन देव बर्मन यांच्याकडे किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी शेवटचं गाणं गायलं होतं १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिली’ या चित्रपटात. ‘मिली’ हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी आणि अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मराठी नाटककार वसंत कानेटकर यांच्या एका मराठी नाटकावर या चित्रपटाची कथा आधारीत होती. या चित्रपटातील इतर गाणी रेकॉर्ड झाली होती; फक्त एक सॅड सॉंग रेकॉर्ड व्हायचे राहिले होते. गीतकार योगेश यांनी हे गाणं लिहिलं होतं. गाण्याचे बोल होते ‘बडी सुनी सुनी है जिंदगी ये जिंदगी’ सचिन देव बर्मन जनरली रिहर्सलसाठी गायक कलाकाराला आपल्या घरी बोलवत. त्यांच्या घरातील म्युझिक रूम मध्ये रिहर्सल होत असे. या गाण्याकरीता किशोर कुमार जेव्हा सचिनदा यांच्या घरी गेले त्यावेळेला त्यांना सचिनदा थोडेसे थकलेले वाटले. तरी त्यांनी रिहर्सल सुरू केली. (Kishore Kumar)
सचिनदा किशोर कुमार (Kishore Kumar) जात असताना एक त्यांच्याकडे एकटक पाहत होते. काहीच बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच भाव किशोर कुमारला दिसले. गाणं संपलं तेव्हा सचिनला यांचे डोळे पाण्याने भरले होते. ते किशोर दादा म्हणाले,” गाणं असच झालं पाहिजे. सगळे इमोशन्स या गाण्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उतरले आहे.” दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग करायचं ठरलं. किशोर कुमार सचिनदांना नमस्कार करून घरी गेला. त्यानंतर वीसच मिनिटांनी सचिन देव बर्मन यांना हार्ट अटॅक आला.
हा त्यांचा तिसरा हार्ट अटॅक होता. घरी सगळीकडे धावपळ सुरू झाली. डॉक्टर आले. सगळेजण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघाले. तेंव्हा सचिनदा म्हणाले,” मी हॉस्पिटलला जाणार नाही. उद्या किशोर कुमारच्या (Kishore Kumar) गाण्याचा रेकॉर्डिंग आहे. ते झाल्यानंतर मी जाईल.” पण डॉक्टर म्हणत होते की ,”त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणे गरजेचे आहे.” शेवटी सचिन देव बर्मन यांचे पुत्र आर डी बर्मन यांनी किशोर कुमारला फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. आणि ताबडतोब घरी येऊन “तूच सचिन देव बर्मन यांना समजावून सांग.” असे सांगितले.
किशोर कुमार धावत पळत सचिनदाकडे आले. त्यांना म्हणाले की,” दादा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा .बरे व्हा. नंतर रेकॉर्डिंग होऊन जाईल.” त्यावर ते म्हणाले की,” नाही नाही. उद्याच आपल्याला गाणं रेकॉर्डिंग करायच आहे.” तेव्हा किशोर कुमार (Kishore Kumar) म्हणाले, ”दादा माझा आवाज देखील खराब आहे. आपण काही दिवसानंतर रेकॉर्डिंग करूया. तोपर्यंत तुम्ही बरे व्हा. माझा आवाज देखील ठीक होईल. आपण मस्त रेकॉर्डिंग करू. सचिनदा राजी झाले पण जाताना किशोर कुमार यांना म्हणाले,” बघ किशोर.. रेकॉर्डिंग चांगलं झालं पाहिजे. हे गाणं तुझ्या आवाजात फार सुंदर येणार आहे. रेकॉर्डिंगला मी उपस्थित असेल किंवा नसेल मला माहिती नाही. पण मी अनुपस्थित जरी असलो तरी मी तिथे आहे असं समजूनच तू गाणं गा.” सचिनदा यांना लगेच हॉस्पिटलला नेण्यात आले.
त्यानंतर काही दिवसांनी या गाण्याच रेकॉर्डिंग राहुल देव बर्मन यांनी केलं. किशोर कुमार यांच्या डोक्यात सचिन देव बर्मन यांचे शब्द होते. त्यांनी सचिन देव बर्मन यांनी सांगितल्या पद्धतीनंच सगळे गाणं गायलं. गाणं मस्तपैकी रेकॉर्ड झालं. गाण्याचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर ती टेप घेऊन एस डी बर्मन यांच्याकडे गेले. त्यांना ते गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकताना सचिन देव बर्मन यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते आर डी बर्मन यांना म्हणाले, ”पंचम किशोर (Kishore Kumar) सारखा गायक नाही. मी पहिल्यापासून त्याच्या गाण्यावर विश्वास ठेवला आहे!” अशा पद्धतीने हे गाणं रेकॉर्ड झालं.
===============
हे देखील वाचा : ‘ऐ दिल ए नादान…’ या गाण्याच्या प्रेमात बिग बी पडले होते!
===============
त्यानंतर काही दिवसातच मात्र सचिन देव बर्मन यांची तब्येत बिघडली आणि ते कोमामध्ये गेले. आणि ३१ ऑक्टोबर १९७५ या दिवशी त्यांचे निधन झालं. काय गंमत असते पहा त्यानंतर बारा वर्षांनी १३ ऑक्टोबर हे १९८७ या दिवशी किशोर कुमार (Kishore Kumar) यांचे निधन झाले. ३१ आणि १३ या दोन्ही तारखांमधील आकड्यांचा खेळ तुमच्या लक्षात आला असेल. तर महिना देखील लक्षात आला असेल. या दोघांचं इतकं अतूट बंध होते की कदाचित त्यांनी मृत्यूच्या तारखा आणि महिना देखील एकच निवडला असावा!