अभिनयाची तृष्णा!
फुलपाखरू, हे मन बावरे अशा मालिकांतून ‘तानिया’, ‘विशू’ अशा पात्रांच्या रूपात एक चेहरा आपल्या मनात घर करून आहे, तो म्हणजे तृष्णा चंद्रात्रे! तर जाणून घेऊया तृष्णाच्या अभिनयाच्या प्रवासाविषयी…
१. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे तुमच्यातली अभिनयाची जाण आणि आवड तुम्हाला केव्हा उमगली?
खरं तर, माझ्या कुटुंबात अभिनयाची कोणालाच आवड नव्हती. अभिनयात करिअर करणं तर लांबच. लहानपणीही मला असं कधीच वाटलं नाही की आपण अभिनेत्री बनावं. लहानपणी माझे हात पाय तालात हलायचे म्हणून माझ्या आईने मला साधारण ४ वर्षांची असतानाच ‘गुरु मंजिरी देव’ यांच्याकडे कथ्थक नृत्यकलेचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. इतक्या लहान वयात एखादी नृत्यकला शिकणे अवघड असतं. पण मी आणि माझी आई ‘गुरू मंजिरी देव’ यांच्याकडे भेटायला गेलो त्या दिवशी नेमकी गुरुपौर्णिमा होती. त्यामुळे त्या ‘नाही’ म्हणू शकल्या नाहीत. तिथून पुढे दोन वर्ष मी बाईंच्या मांडीवर बसून इतरांना नृत्य करताना पाहत होते. मनाला येईल तशी नाचत होते. असे माझे सुरुवातीचे नृत्य प्रशिक्षण होते.
मी शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आणि इकडे माझे कथ्थकचे खरे प्रशिक्षण सुरू झाले. कथ्थक नृत्य कलेत हावभावांना फार महत्व असते, हे आपल्याला माहितीच आहे.
माझे हावभाव (एक्सप्रेशन्स) पाहून एकदा माझ्या गुरु म्हणजेच बाई मला म्हणाल्या की, ‘तू अभिनयात देखील करिअर करायला हरकत नाही’…
त्या हे अगदी सहज म्हणाल्या, पण मी मात्र ते फार मनावर घेतले. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी आई बाबांसोबत चित्रपट किंवा नाटक पाहायला जायचे, तेव्हा इतर घटकांपेक्षा ‘कलाकारांचा अभिनय’ बारकाईने न्याहाळायचे!
मी कथ्थकच्या एकूण चार परीक्षा दिल्या. नववीपासून मात्र अभ्यासामुळे डान्स क्लास सुटला तो सुटलाच. मला त्याची फार खंत वाटतेय. नववी ते बारावी अशी चार वर्षे मी मी डान्सचा विचार देखील केला नाही. मात्र तोपर्यंत अभिनयाची जब्बार आवड निर्माण झाली होती.
२. ‘मला अभिनयात करिअर करायचंय’, हे तुम्ही घरी कसं सांगितलं आणि त्यावर घरच्यांची काय रिएक्शन होती?
मी साधारण नववी-दहावीत असताना घरी अभिनयाबद्दल बोलले. घरी अपेक्षित भडका उडालाच! पण माझ्या घरचे खरंच खूप समजूतदार असल्याने त्यांनी मला पाठिंबा दिला. ‘दहावी झाल्यावर आपण यावर विचार करू, क्लासेस वगैरे लावू’ असे म्हणून घरच्यांनी तेव्हा पुरता तो विषय तिथेच थांबवला.
मग दहावी झाल्यावर मी २१ दिवसांचे एक वर्कशॉप केले. ज्यामुळे ‘आपण स्वतःवर किती काम करायला हवं’ याची तीव्र जाणीव झाली. या वर्कशॉप मुळे माझ्यात अभिनयाबद्दलचा आत्मविश्वास रुजू लागला.
३. रुपारेलच्या नाट्य विभागामुळे तुमच्या अभिनयाला कशा प्रकारे मार्ग मिळाला?
मी अकरावी-बारावीला रूपारेल मध्ये होते. मी रूपारेल कडून भरपूर एकांकिका केल्या. अकरावीलाच मी आय एन टी या स्पर्धेत रुपारेल कडून लीड ॲक्ट्रेस म्हणून उतरले. खरं तर, गेल्या गेल्या बॅकस्टेज पासुनचा प्रवास पूर्ण करावा लागतो.. पण मला लीड मिळाली हे खरंच माझं भाग्य आहे.
त्यानंतर मी डिग्री कॉलेज साठी सोमय्या मध्ये प्रवेश घेतला. तिथेही गेल्या गेल्या मी आय एन टी साठी लीड एक्ट्रेस म्हणून सिलेक्ट झाले.
४. थिएटर्स करत असताना अचानक सिरीयल कडे कशा काय वळलात?
सोमय्या मध्ये प्रवेश घेतल्यावर मला एक सिरीयल मिळाली. पण ती सिरीयल आणि ते चैनल, दोन्ही आज पर्यंत बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी तो एक धक्का होता!
आता यापुढे अभिनयात आपलं करियर होईल का, अशी सतत शंका येत होती. संयम सुटत चालला होता. यातच मला झी युवा च्या एका मालिकेसाठी ऑडिशनला बोलावण्यात आले.
मला सांगितल्याप्रमाणे मी साडी वगैरे नेसून ऑडिशन दिली. ‘मंदार देवस्थळी सर’ स्वतः ऑडिशन घेत होते.
पहिल्या दोन वाक्यानंतर सरांनी मला थांबवलं आणि वेस्टर्न मुलीचा एक वेगळा पॅच दिला. मी पुन्हा वेस्टर्न कपड्यात तयार झाले. पण तिथे वेगळेच प्रॉब्लेम सुरू झाले. मी ऑडिशन देणारी शेवटची मुलगी होते, त्यामुळे सरांना लगेच निघायचे होते. ते दडपण होतेच.
त्यातच तो वैदेही नामक पात्राचा पॅच खूपच कठीण होता. ती वाक्यच मला पाठ होत नव्हती.
पहिले दोन टेक अडखळत अडखळत गेले. शेवटी तिसऱ्या टेकला सरांनी मला थांबू न देता पुढची वाक्य घ्यायला सांगितली.
हे वाचलेत का ? मंदार म्हणतोय..”दत्तगुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे!”
अजिबात अपेक्षा नसताना मला साधारण एका महिन्याने मी सिलेक्ट झाल्याचे कळले. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. मला अगदी पहिल्या शूटिंग पर्यंत विश्वास बसत नव्हता.
त्यात मंदार सरांनी नंतर मला सांगितले की, आपले सुरुवातीचे २५ भाग झाले आहेत. तुझं ‘तानिया’ नावाचं हे पात्र आपण नवीनच लिहिलं आहे. सुरुवातीला कमी डायलॉग आणि नंतर एक लव स्टोरीचा ट्रॅक..
ही पात्र हळूहळू सगळ्यांच्या ओळखीचं होऊ लागलं. एका वर्षाने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.
ही सिरीयल चालू असतानाच मला ‘हे मन बावरे’ या सीरियल साठी विचारण्यात आले.
अशाप्रकारे तानियाची विशाखा झाली!
५. सिरीयल मध्ये झळकल्या पासून तुमचा फॅन फॉलोविंग नक्कीच वाढलाय.. याबद्दलचा एखादा किस्सा ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
असे खूप किस्से आहेत. पण ‘हे मन बावरे’ करत असताना बऱ्याच आजी आणि मावशींनी भेटून लाडाने फटके मारले, काहींनी गालगुच्चे देखील घेतले.
मी आता नवीन घरात शिफ्ट झाले आहे. तर सोसायटी खाली राऊंड मारत असताना एक लहान मुलगी माझ्याजवळ धावत धावत आली आणि ‘तू तृष्णा चंद्रात्रे ना’ असं तिने मला विचारलं. मी फुलपाखरू आणि हे मन बावरे या मालिकांमध्ये काम करते हे देखील तिला माहित होते. या सगळ्यातून जास्त आनंदाची गोष्ट की तिला माझे खरे नाव देखील तंतोतंत माहित होते. तिने अगदी गोड हसून मला मिठी मारली.. हा माझ्यासाठी सर्वात आनंददायी क्षण होता!
६. मालिकांमध्ये काम करताना तुम्हाला तुमच्या सहकलाकारांकडून कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या?
सर्वप्रथम म्हणजे मराठी इंडस्ट्री ही बॉलीवूड पेक्षा जास्त सेफ असल्याचे मला जाणवले. कोणाची दृष्ट नको लागायला आपल्या इंडस्ट्रीला!
मंदार सरांकडून दिग्दर्शनाबाबत फार काही शिकायला मिळाले. सर्वात जास्त प्रभावी मुद्दा म्हणजे साधेपणा. कोणतीही गोष्ट नैसर्गिकरित्या दाखवण्यासाठी त्यात साधेपणा हवा, उगाच दिखावे गिरी नको, हे आम्हाला सरांनी शिकवले.
कमीत कमी रंग वापरून रंगवलेले चित्र अधिक सुंदर दिसते, अगदी तसेच अभिनय आणि दिग्दर्शनाचे!
वंदना गुप्ते या ज्येष्ठ अभिनेत्री सोबत एकाच सेटवर काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वतःची स्क्रिप्ट स्वतः लिहिणे, तिचा अर्थ समजून घेणे,आपल्या मनातील अर्थ आणि दिग्दर्शकाला सांगायचा अर्थ सारखाच आहे का हे तपासणे.. अशा बऱ्याच गोष्टी!
हे वाचलेत का ? ताई माझी लाडाची गं!
ऋता दुर्गुळे आणि आशिष जोशी यांचाही सहकलाकार आणि मित्र म्हणून माझ्यावर फार प्रभाव आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला मार्गदर्शन केलं. अभिनय असो की खरं आयुष्य.. सगळं कसं कॅलक्युलेटेड आणि प्रॅक्टिकल असावं, हे मी ऋता कडून शिकले.
७. अशी कोणती भूमिका आहे जी तुम्हाला पुन्हा रंगमंचावर जिवंत करायला आवडेल..?
मला असं खूप वाटतं की प्रशांत दामलेंचं ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं की त्यातलं मोहिनीचं पात्र मी साकारायचा प्रयत्न करावा.
आणि मुक्ता बर्वे यांचं मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटातलं पात्र मला पुन्हा साकारायला नक्कीच आवडेल. तो चित्रपट आणि ते पात्र दोन्ही ‘ऑल टाईम फेवरेट’ आहे!
८. तुम्हाला पुढील काळात कोणत्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची इच्छा आहे.. थोडक्यात ते ड्रीम कलाकार कोणते?
प्रशांत दामले यांच्यासोबत मला अभिनय करायचा आहे, पण त्यासाठी मला अजून खूप मेहनत घ्यायची आहे.
वंदना गुप्ते यांच्यासोबत सध्या मी एकाच सिरीयल मध्ये काम करत आहे, परंतु आमचे एकत्र सीन फार कमी असतात. त्यामुळे मला त्यांच्यासोबत एकत्र काम करायला फार आवडेल.
सुमित राघवन हे तर माझे खूप आवडते अभिनेते आहेत. त्यांच्या एकूण एक भूमिका मला फार आवडतात. सर्वात जास्त आवडणारी भूमिका म्हणजे ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ चित्रपटातील भूमिका. वाचिक अभिनय म्हणजे काय, हे मी त्यांच्याकडून शिकले.
९. रॅपिड फायर
ओटीटी, थिएटर की टीव्ही = ओटीटी
आवडता अभिनेता = सुमित राघवन
आवडती अभिनेत्री = मुक्ता बर्वे आणि ऋता दुर्गुळे
प्रेरणास्थान = ऋता दुर्गुळे, मंदार देवस्थळी सर आणि आई-बाबा
आवडते नाटक = एका लग्नाची गोष्ट
स्वतःला रिचार्ज करण्याचा मार्ग = गाणी ऐकायची आणि बेफाम नाचायचं!
डान्स करण्यासाठी फेवरेट सॉंग= मोहे रंग दो लाल आणि घर मोरे परदेसिया!
बेस्ट फ्रेंड कोण? आई, बाबा कि दादा = दादा!
सहकलाकारांपैकी फेवरेट कोण? = पूर्णिमा तळवळकर
राग येणारी गोष्ट कोणती = सेटवरील स्पॉट दादा किंवा टेक्निशियन यांना नीट वागणूक न देण्याची प्रवृत्ती
आवडता खाद्यपदार्थ = पाणीपुरी
आवडतं फिरण्याचे ठिकाण = समुद्रकिनारा
बिनधास्त घराबाहेर पडायला मिळाल्यावर सर्वात पहिले कोणाला भेटाल? = शाळेतल्या मैत्रिणींना भेटून खूप गप्पा ठोकणार!
कलाकृती मीडियातर्फे तृष्णा चंद्रात्रे यांस पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि सदिच्छा !
- मुलाखत आणि शब्दांकन : सोनल सुर्वे