शर्टच्या अदलाबदलीने दोन कलाकार बनले जिगरी दोस्त…
हिंदी सिनेमाच्या दुनियेत ऑनस्क्रीन वरचे किस्से जसे मशहूर असतात तसेच ऑफस्क्रीन वरचे किस्से (Offscreen stories) देखील तितकेच मनोरंजक असतात. हा किस्सा खूप जुना म्हणजे चाळीसच्या दशकातला पुण्यात घडलेला आहे. नंतरच्या काळात हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झालेल्या दोन मित्रांच्या उमेदवारांच्या काळातील हा किस्सा आहे. या प्रसंगामुळेच दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि ती अखेरपर्यंत कायम राहिली. काय आहे हा किस्सा? आणि कोण आहेत हे दोघे मित्र? त्याकाळी अभिनेता देव आनंद चित्रपटात काम करण्यासाठी धडपड करत होता याच धडपडीतून तो पुण्याला प्रभात फिल्म कंपनीमध्ये आला होता. दिग्दर्शक पी एल संतोषी यांनी त्याला ‘हम एक है’ या चित्रपटात काम करण्यासाठी भूमिका दिली. देवआनंदचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे त्याबद्दल तो खूपच उत्सुक होता ,आशावादी होता. प्रभात फिल्म कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्येच तो राहत होता. त्याचवेळी उदय शंकर यांच्या नृत्य कंपनीतून बाहेर पडून पुढे पन्नासच्या दशकात लोकप्रिय ठरलेले अभिनेता- दिग्दर्शक गुरुदत्त उमेदवारी करण्यासाठी प्रभात फिल्म कंपनीमध्ये आले होते. या कंपनीत ते नृत्य दिग्दर्शक म्हणून जॉईन झाले आणि त्याचबरोबर दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे सहाय्यक म्हणून ते काम करू लागले. गुरुदत्त आणि देव आनंद हे दोघेही परस्परांना ओळखत नव्हते. दोघांचाही तो मोठा स्ट्रगलिंग पिरेड चालू होता! (Offscreen stories)
याच दरम्यान एक घटना अशी घडली ज्यामुळे एका भेटीत दोघे एकमेकांचे जिवलग मित्र झाले. एक दिवस सेटवर येत असताना गुरुदत्त आणि देव आनंद यांची गाठभेट झाली. गुरुदत्तने देवसोबत हस्तांदोलन केले आणि सांगितले,” मी इथे विश्राम बेडेकर यांचा सहाय्यक म्हणून काम करत आहे.” त्यावेळी त्यांचे लक्ष देव आनंदने घातलेल्या शर्टवर होते. गुरुदत्तने देवला विचारले,” तुमचा शर्ट खूपच चांगला आहे. कुठून खरेदी केला?” त्यावर देव आनंद थोडासा सटपटला आणि तो म्हणाला “माझ्या धोब्याने मला हा शर्ट दिला आहे. मी त्याच्याकडे धुलाईला दिलेला शर्ट त्याला सापडतच नव्हता.” त्यावर गुरुदत्त काही बोलणार त्याच वेळी देवआनंदचे लक्ष गुरुदत्तने घातलेल्या शर्टकडे गेले. शर्ट ओळखीचा वाटला. त्याने विचारले,” हा शर्ट तुम्ही कुठून खरेदी केला हा देखील सुंदर शर्ट आहे!” आता गुरुदत्तच्या लक्षात आलं तो डोळा मारून तो म्हणाला,” हा शर्ट मला माझ्या धोब्याने दिलाय माझा शर्ट त्याच्याकडून गहाळ झालाय.” आता मात्र दोघांनाही सर्व प्रकार लक्षात आला. दोघांचे डोळे चमकले. धोब्याकडून झालेल्या चुकीमुळे त्यांच्या शर्टसची अदलाबदल झाली होती आणि एकाच दिवशी त्यांनी परस्परांचे शर्ट घातले होते! दोघांनी जोरात हस्तांदोलन केले आणि मोठ्याने हसत एकमेकांना मिठी मारली! (Offscreen stories)
धोब्याच्या एका चुकीमुळे दोघांमध्ये क्षणार्धात मैत्री निर्माण झाली. पुढे काही वर्ष दोघेही पुण्याला प्रभात स्टुडिओमध्ये होते. तेव्हा दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. अख्ख पुणे शहर ते सायकल वरून फिरत असत. कॅम्पमध्ये जाऊन मांसाहार करत असत. डेक्कन जिमखाना वरील लकी हे त्यांचं आवडतं इराणी हॉटेल होतं. तिथे त्यांनी अनेकदा बन मस्का पाव खाल्ला होता.( पुढे अनेक वर्षांनी १९९४ साली देव आनंद जेव्हा त्याच्या एका सिनेमाचा प्रीमियर करण्यासाठी पुण्याला आले तेव्हा त्यांनी आवर्जून ‘लकी’ला भेट दिली होती आणि पुन्हा आपल्या खास अंदाजामध्ये एक बन मस्का पाव ची ऑर्डर दिली होती!) देवआनंद आणि गुरुदत्त या दोघांचाही तो उमेदवारीचा आणि संघर्षाचा काळ होता. (Offscreen stories)
दोघेही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत आणि आपल्या भावी आयुष्याबद्दल बोलत असत. देवने गुरुला सांगितले ,”उद्या जर मी निर्माता झालो तर तुला दिग्दर्शक म्हणून घेईल!” आणि गुरुदत्तने सांगितले “जेव्हा मी माझ्या संस्थेचा चित्रपट निर्माण करेल तेव्हा नायक म्हणून मी तुला घेईल!” दोघांनीही आपले शब्द पाळले. कारण १९५० साली देव आनंदच्या नवकेतन या चित्रपट संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेचा १९५१ सालचा चित्रपट ‘बाजी’ त्यांनी गुरुदत्त यांच्याकडे दिग्दर्शनासाठी सोपवला. देव आनंद गीता बाली यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला. देवआनंद आणि नवकेतन बॅनर दोघे हिट ठरले. पुढच्याच वर्षी आलेल्या ‘जाल’ या नवकेतनच्या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील गुरुदत्त यांनीच केले होते. पुढे १९५४ साली गुरुदत्त ने आपल्या फिल्म कंपनीची स्थापना केली. १९५५ साली सीआयडी या चित्रपटाची निर्मिती केली आणि या चित्रपटाचा नायक म्हणून देवआनंद ला घेतले. या सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त चे सहाय्यक राज खोसला यांनी केले होते.(Offscreen stories)
=========
हे देखील वाचा : शम्मीकपूर आणि लता मंगेशकर यांनी विमानप्रवासात एकत्र गायलं हे गाणं
=========
अशा प्रकारे पुण्यात एका धोब्याच्या चुकीमुळे झालेल्या शर्टच्या अदलाबदलीमुळे देव आनंद आणि गुरुदत्त यांच्यात मैत्री झाली आणि व्यावसायिक नाते देखील निर्माण झाले. पन्नास च्या दशकात दोघे हिंदी सिनेमातील टॉपचे कलाकार बनले. या दोघांमधील मैत्री कायम राहिली भले यांनी एकत्रित काम केलेले चित्रपट दोन-तीन जरी असले तरी गुरुदत्तच्या मृत्यूपर्यंत दोघांची मैत्री अबाधित होती!