भावाच्या पावलावर पाऊल टाकत जेव्हा ‘तो’ झाला कलाकार
आपल्या समोर वावरणाऱ्या कलाकारांकडे पाहून आपल्याला अभिनय करावासा वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे पण ध्यानीमनी नसताना जेव्हा आपल्याच भावाची भूमिका आपल्या वाट्याला येते तेव्हा?
असा झकास योग ज्याच्याबाबतीत जुळून आला; तो कलाकार आहे उमेश कामत.
उमेश कामतच्या कुटुंबाचा अभिनयाशी तसा अजिबात संबंध नव्हता, पण आई-वडिलांना नाटकाची आवड होती. उमेशच्या दूरच्या कुणी नातेवाईकांनी वर्तमानपत्रात बालकलाकारासाठी आलेली जाहिरात उमेशच्या आई-वडिलांना दाखवली. उमेशच्या मोठ्या भावाला अर्थात जयेश कामतला घेऊन त्यांचे आई-बाबा ऑडिशनला गेले.
६० मुलांमधून अंतीम ३ मुलांमध्येजयेशची निवड झाली. त्या तीन मुलांपैकी दोघांबाबत नाटकांचे निर्माते मोहन वाघ आणि दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्यात वेगवेगळी मतं होती. त्यावर उपाय म्हणून तीन जणांना ५-५ प्रयोग करू द्यावे आणि त्यातून अंतीम बालकलाकार ठरवावा असे ठरले. पण पहिल्या प्रयोगात जयेश याने अशी छाप पाडली की त्यालाच बालकलाकार म्हणून निश्चित करण्यात आले. नाटक होतं सोनचाफा. आणि सोबत होते दिग्गज कलावंत यशवंत दत्त आणि वंदना गुप्ते.
हे वाचलेत का ? नवा गडी अन् राज्य नवं…
नाटकाचे साधारण २५० प्रयोग झाल्यावर जयेशची उंची वाढली जी भूमिकेसाठी उपयुक्त नव्हती. मोहन वाघ तेव्हा नव्या मुलाच्या शोधात होते. आपल्या भावाचे नाटक पहायला गेलेला उमेश तिथे विंगेत, स्टेजसमोर तेंव्हा बागडत असे. एके दिवशी मोहन वाघ यांनी ते पाहून उमेशला विचारलं, काय रे नाटकात काम करशील का? इयत्ता पाचवीत असणा-या उमेशला नाटक म्हणजे काय ते ही समजही नव्हतं.
पण उमेश ने खणखणीत ‘हो’ असं उत्तर दिलं.
अशाप्रकारे सोनचाफा नाटकातून उमेशचं नाटकात पदार्पण झाले. अगदी कमी कालावधीत दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी उमेशकडून तालीम करुन घेतली. पण संपूर्ण नटसंचासोबत तालीम झाली नव्हती, त्यामुळे उमेशच्या पहिल्या प्रयोगाला सगळेच चिंतेत होते. सारेजण विंगेत उभं राहून नाटक पहात होते. पण नाटक सुरू झाल्यावर उमेश सहतजेने स्टेजवर वावरला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
हेही वाचा : डॉ. रामाणींचा ताठ कणा
तेव्हापासून आतापर्यंत स्वामी, रणांगण, मन उधाण वाऱ्याचे, गांधी आडवा येतो, डोन्ट वरी बी हॅप्पी, दादा एक गुड न्यूज आहे, अशा विविध नाटकातून उमेशचा अभिनय पाहायला मिळतो. पण कोणताही विचार नसताना अगदी अचानक उमेशकडे आलेली त्याच्याच भावाची भूमिका त्याला कलाकार करुन गेली.