उमेश कामत आणि प्रिया बापट यांची प्यारवाली लव्हस्टोरी
मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला उमेश कामत आज त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठीमध्ये नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत उमेशने त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आज उमेश मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.
प्रभावी अभिनय, गुड लुक्स, सॉफ्ट टॉक, आकर्षक व्यक्तिमत्व अशा अनेक गुणांमुळे उमेश नेहमीच लोकांच्या पसंतीमध्ये आघाडीवर असतो. उमेशने आजपर्यंत अनेक हिट सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये कमालीचा यशस्वी आहे. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील यशस्वी आणि आनंदी आहे. त्याने अभिनेत्री प्रिया बापटसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्ष झाली असून ते सुखाने संसार करत आहे. मात्र आजही त्यांची लव्हस्टोरी अनेकांना माहित नसेल. आज उमेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया उमेश आणि प्रियाची प्रेमकहाणी.
एका कार्यक्रमादरम्यान प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी त्यांची लव्हस्टोरी सगळ्यांना सांगितली. प्रिया आणि उमेश यांच्यामध्ये ८ वर्षाचे अंतर आहे. जेव्हा उमेश मालिकांमध्ये काम करत होता तेव्हा त्याचे अनेक फॅन्स होते. यातलेच एक नाव म्हणजे प्रिया बापट. प्रिया उमेश मालिकांमध्ये काम करत असतानाच त्याच्या प्रेमात पडली होती. प्रिया आणि उमेश यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे. ती शाळेत असल्यापासूनच उमेशची मोठी चाहती होती. उमेश तेव्हा अनेक मुलींचा क्रश होता.
प्रियाला उमेशला भेटायचे होते त्याच्याशी बोलायचे होते. मात्र तो कसा भेटेल आणि बोलेल हे तिला समजत नव्हते. प्रिया तेव्हा ‘हमाल दे धमाल’ या शोमध्ये बालकलाकार म्हणून काम करत hoti. तेव्हा तिने एक शक्कल लढवली आणि ती उमेशला भेटायला गेली आणि त्याला सांगितले की , “आम्हाला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिला ज्यात एका सेलिब्रिटींची मुलाखत घ्यायची. तर तू देशील का?” त्यावर तो देखील हो बोलला आणि त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. तेव्हाच उमेशच्या लक्षात आले की ही मुलाखत नक्कीच नाही.
काही वर्षांनी दोघांची ‘भेट’ या सिनेमाच्या प्रीमियरला भेट झाली. पुढे एका मालिकेच्या निमित्ताने पुन्हा त्यांची भेट झाली आणि तेव्हा त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर त्यांचे बोलणे चालू झाले. जवळपास तीन वर्षांनी 8 ऑगस्टला प्रिया बापटने उमेश कामतला प्रपोज केले. मात्र उमेशने लगेच उत्तर दिले नाही. त्याने वेळ मागून घेतला. १८ सप्टेंबरला प्रियाच्या वाढदिवशी उमेशने तिला होकार दिला होता.
उमेश कामत हा वेळ घेऊन निर्णय घेणाऱ्यांपैकी आहे. प्रियाप्रमाणे उमेशही तिच्या प्रेमात पडला होता. जेव्हा प्रिया उमेशच्या प्रेमात पडली तेव्हा तिचे वय फक्त १८ वर्ष होते. त्यावेळी त्यांचे नाते नक्की कोणत्या दिशेला जात आहे, याची त्यांना कल्पना देखील नव्हती. जेव्हा प्रियाने उमेशला लग्नाबद्दल विचारले तेव्हा मशें वेळ घेतला विचार केला आणि मग तो लग्नाला तयार झाला. पुढे त्यांनी २०११ मध्ये घरच्यांच्या संमतीने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला आता १२ वर्ष पूर्ण झाली आहेत.
दरम्यान प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीचा मोठा चााहतावर्ग आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकार देखील त्यांचे चाहते आहेत. प्रिया आणि उमेशने अनेक मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसेरीजमध्ये देखील एकत्र काम केले आहे. त्यांची ‘आणि काय हवं’ ही सीरिज तुफान गाजली.