दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शंकर महादेवन यांना चक्क दात घासताना सुचली ‘दिल चाहता है’ चित्रपटाच्या टायटल साँगची आयकॉनिक ट्यून
दिल चाहता है!
ही कहाणी आहे तीन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची…
ही कहाणी आहे कॉलेज जीवन आणि करिअरच्या उंबऱ्यावरच्या आयुष्याची…
ही कहाणी हळुवार प्रेमाची आणि ही कहाणी आहे धमाल गोवा ट्रीपची…
२००१ साली आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटामुळे अनेक संदर्भ बदलले. मित्रांचे गोवा ट्रिपचे प्लॅन इथूनच सुरु झाले. त्यावेळी शाहरुखच्या स्वप्नाळू दुनियेतल्या टिपिकल आणि अतर्क्य प्रेमकहाण्या किंवा इतर देशभक्तीपर चित्रपटांच्या लाटेला कंटाळलेल्या प्रेक्षकांना हा वेगळ्या वळणावरचा चित्रपट मनापासून भावला.
काही गोष्टी परफेक्ट असतात, तर काही गोष्टी ‘परफेक्शन’ या शब्दाची व्याख्या बनून जातात. ‘दिल चाहता है’ हा असा चित्रपट आहे ज्या चित्रपटाने परफेक्शनची व्याख्या ठरवून दिली. या चित्रपटामध्ये दिल, दोस्ती, प्यार, मोहब्बत या सगळ्या गोष्टी असूनही हा चित्रपट संपूर्णपणे वेगळा आहे.
यामधली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखेचं व्यक्तिमत्व वास्तववादी आहे आणि म्हणूनच ते प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. यामधली प्रत्येक प्रेमकहाणी वेगळी आणि मनाला साद घालणारी आहे.
पण या झाल्या सर्व चित्रपटाबद्दलच्या गोष्टी. परंतु चित्रपट बनण्यापूर्वीच्या गोष्टीही तितक्याच रंजक आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
आमिर, सैफ, अक्षय नाही तर हृतिक, अभिषेक अक्षय होती पहिली पसंती
दिल चाहता है म्हटलं की आपल्यासमोर उभे राहतात ते आकाश, समीर आणि सिद म्हणजेच आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना. या तिघांनीही आपआपल्या भूमिकेमध्ये जीव ओतला आहे. परंतु सुरुवातीला या तिन्ही भूमिकांसाठी फरहान अख्तरने वेगळी नवे निश्चित केली होती. ती नाव म्हणजे – हृतिक रोशन, अभिषेक बच्चन आणि अक्षय खन्ना.
हृतिक आणि अभिषेक दोघांनीही नकार दिल्यावर त्यांच्या जागी आमिर आणि सैफची वर्णी लागली. सुरुवातीला आकाशची भूमिका अक्षय खन्ना साकारणार होता. परंतु, आमिरने स्क्रिप्ट वाचल्यावर आकाशच्या भूमिकेमध्ये रस दाखवला आणि फरहाननेही त्याला होकार दिला.
प्रीतीची निवड आधीच झाली होती
या चित्रपटामध्ये तीन मित्रांच्या भूमिकेइतकीच महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे शालिनी. शालिनीची भूमिका प्रितीने इतकी सहज सुंदर केली आहे की, तिच्या जागी इतर कुठल्याही अभिनेत्रीचा विचार आपण (प्रेक्षक) करू शकत नाही. आणि तसा तो फरहान अख्तरनेही केला नव्हता.
प्रीती झिंटा जेव्हा ‘क्या कहना’ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मुंबईला आली होती तेव्हा फरहान अख्तरने तिला बघितलं. त्यावेळी फरहान तिला भेटला आणि तिला सांगितलं की, “मी जेव्हा चित्रपट बनवेन तेव्हा त्या चित्रपटामध्ये मी तुला भूमिका देईन.” थोडक्यात त्याच क्षणी दिल चाहता है मधली शालिनी निश्चित झाली होती.
=====
हे देखील वाचा: भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?
=====
टायटल सॉंगची आयकॉनिक ट्यून बनली होती ब्रश करताना
या चित्रपटाच्या टायटल सॉंगची आयकॉनिक ट्यून शंकर महादेवन यांना चक्क दात घासताना सुचली होती.
परंतु, पुढील गाण्यांच्या धून काही त्यांना सुचत नव्हत्या. त्यामुळे संगीतकार शंकर एहसान आणि लॉय तिघांनीही लोणावळ्याला जाऊन चार दिवसात बहारदार संगीताची रचना केली.
फरहानची पर्सनल डायरी आणि चित्रपटाचे स्क्रिप्ट
या चित्रपटाचे संवाद आणि स्क्रिप्ट संपूर्णपणे इंग्रजी भाषेत लिहिलेले होते. या चित्रपटाच्या स्क्रिप्टमागची कहाणी पण अत्यंत रंजक आहे. या चित्रपटाची कथा फरहानला लास वेगासमध्ये सुट्टी घालवताना सुचली होती. आणि याची प्रेरणा होती त्याची पर्सनल डायरी.
चित्रपटातली काही पात्रे फरहानचे मित्र, तर काही पात्रे व प्रसंग शेक्सपियरच्या ‘मच अडो अबाउट नथिंग’ या नाटकामधून घेतले आहेत. चित्रपटात सुबोधची भूमिका करणारा ‘असद दादरकर’ हा खरंतर फरहानचा जवळचा मित्र होता आणि त्याचे व्यक्तिमत्व सुबोध नाही, तर आकाशच्या व्यक्तिरेखेशी मिळतेजुळते होते.
=====
हे देखील वाचा: जर ‘फना’मध्ये गाणीच नसती तर…
=====
‘कोई कहे कहता रहे’ गाण्यात दिसणार नव्हती प्रीती
मूळ स्क्रिप्टमध्ये ‘कोई कहे कहता रहे’ या डिस्को गाण्यामध्ये प्रीती झिंटा दिसणार नव्हती. परंतु, तिला हे गाणं इतकं आवडलं की, तिने फरहानकडे या गाण्यात घेण्यासाठी आग्रह धरला.
डिंपल कपाडियाचा होकार प्रचंड महत्वाचा होता
या चित्रपटामध्ये डिंपल कपाडियाने तारा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्यापेक्षा वयाने भरपूर मोठ्या असणाऱ्या स्त्रीवर निरपेक्ष प्रेम करणारा सिद हा या चित्रपटातील काहीसा बोल्ड आणि हळवा प्रसंग होता.
‘तारा’च्या व्यक्तिरेखेसाठी फरहानने फक्त डिंपलची निवड केली होती. चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी फरहानने या चित्रपटाच्या काही आठवणी ट्विटरवर शेअर केल्या तेव्हा त्याने एका ट्विटमध्ये डिंपलला टॅग करून लिहिलं होतं की –
“I think if you had said no, I’d probably have had to scrap making the film. Tara was written for you and thank my lucky stars that you said yes. Forever grateful.”
काही चित्रपट कधीही जुने होत नाहीत. दिल चाहता है हा असाच एक चित्रपट आहे.
कॉलेजच्या धमाल दुनियेपासून, कॉलेज संपल्यानंतरचं वास्तव जग म्हणजे दिल चाहता है…
मित्रांचा गोवा प्लॅन म्हणजे दिल चाहता है…
“जाने क्यो लोग प्यार करते है…” मधील अल्लड प्रेमापासून “कैसी है ये रुत के जैसे…” मधलं धीरगंभीर तरीही अलवार प्रेम म्हणजे दिल चाहता है…
“आज पूजा तो कल कोई दुजा…” पासून “वो लडकी है कहा…” पर्यंतची अरेंजवाली लव्ह स्टोरी म्हणजे दिल चाहता है.
थोडक्यात सांगायचं तर, कधीही आणि कितीही वेळा पहिला तरी न विसरता येण्यासारखी एक बहारदार कलाकृती म्हणजे दिल चाहता है!