शोभना समर्थ यांनी लिहिलेल्या डायरीचे रहस्य
शोभना समर्थ (Shobhna Samarth) म्हटलं की, ह्या कोण, असा प्रश्न आज अनेकांना पडेल आणि ते साहजिकच आहे. जमानाच इतका फास्ट झाला आहे की, कालचा सुपरस्टार असं विचारलं तर, कोण? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, असे दिवस आले आहेत खरे.
शोभना समर्थ म्हणजे काजोलची आजी. काजोलच्या आईची म्हणजे तनुजाची आई, असं म्हटलं तर तुम्हाला थोडी तरी ओळख पटल्यासारखं वाटेल नाही? पण माणसं झपाट्याने विस्मृतीत जाऊ लागली आहेत हे अंतिम सत्य!
साक्षात्कारी अनुभव सांगतो-
भारतीय सिनेमाला ७५ वर्षे झाली. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवले गेले. मुंबईत आकाशवाणी थिएटरमध्ये चित्रपटाचा महोत्सव आयोजित केला होता. रोज तिथे वेगवेगळे, वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट दाखवले जात. एका दिवशी किती पाहू आणि किती नको असे प्रेक्षकांना होत असे.
एक दिवशी दुपारच्या वेळात मला जायला थोडा वेळ झाला. मी धावत पळत गेलो कारण मला चित्रपटाची श्रेय नामावली चूकवायची नव्हती. तेवढ्यात माझं लक्ष दुसरीकडे गेलं, डोअर किपर आणि एक बाई यांच्यात बाचाबाची सुरू झाली होती.
तो डोअर किपर सांगत होता की, “बाई, तुमच्याकडे पास नाही तेव्हा ऑडीटोरियमध्ये मी तुम्हाला सोडू शकत नाही.” त्यावर बाई म्हणत होत्या, “अरे घाई गडबडीत मी पास विसरले हे खरं. पण मी कोण आहे माहित आहे का? आता जो चित्रपट चालू आहे त्याची हिरॉईन मी आहे!”
पण, डोअर किपर ऐकायला तयार नव्हता. माझं लक्ष गेलं, हुज्जत घालणाऱ्या बाई म्हणजे साक्षात शोभना समर्थ (Shobhna Samarth) होत्या. ऑडीटोरियममध्ये त्या नायिका असलेला चित्रपट सुरू झाला होता ‘रामराज्य’.
शोभना समर्थचा हा रोल इतका परिणामकारक आणि उत्कट झाला होता की, लोक, विशेषत: बायका त्या दिसल्या की त्यांच्या पाया पडत असत. सीता म्हणजे ‘रामराज्य’ मधल्या शोभना समर्थ (Shobhna Samarth) असे समिकरण झालं होतं. त्याच ‘सीतेला’ आता डोअरकीपर ओळखतच नव्हता. “टाईम-टाईमकी बात होती है”, हेच खरं.
हे पाहून मी चटकन पुढे आलो. रोज चित्रपटाला येऊन-जाऊन डोअरकिपरची थोडीशी ‘जान पहेचान’ झाली होती. त्याला समजावलं आणि मी शोभना समर्थना घेऊन काळोख्या ऑडिटोरीयममध्ये गेलो.
रामराज्य चित्रपट सुरू झाला होताच. त्या वेळेला मी शोभना समर्थना कसं ओळखलं?
काही वर्षापूर्वी ‘अनुभव’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात तनुजा हिरॉइन होती. त्या चित्रपटाचे बजेट ‘लो’ असल्यामुळे त्याचं शुटिंग ताडदेव येथील उषा किरण ह्या त्यावेळच्या सर्वोच्च बिल्डींगमध्ये सुरु होतं. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते बासू भट्टाचार्य. बासूंना मी म्हटलं, “मला सर्वोच्च इमारत बघायची आहे.” तेव्हा ते म्हणाले, “कल आ जाओ वहा शुटिंग होगी, दोपहार के बाद.”
ज्या फ्लॅटमध्ये शुटिंग चालू होतं. तो फ्लॅट होता शोभना समर्थ (Shobhna Samarth) आणि तनुजाचा! त्यावेळी देखील उतार वयातल्या शोभना समर्थ लक्ष वेधून घेत होत्या. ह्या ‘ओळखीमुळे’ मी रामराज्य चित्रपटाच्या वेळी त्यांना ओळखलं होतं.
अर्थात पुढे मी ही ओळख ठेवली.
शोभना समर्थ (Shobhna Samarth) यांचं आयुष्य चिकार चढ-उतारांनी भरलेलं होतं. कुमारसेन समर्थ बरोबर असलेला त्यांचा संसार का मोडला? त्यांच्या आयुष्यात मोतीलालचं काय स्थान होतं? त्यांची मुलगी नुतन बरोबर त्याचं नेमकं भांडण काय होतं? असे नको ते प्रश्न देखील मी विचारत होतो.
तेव्हा एक दिवशी त्या म्हणाल्या, “तू असं करशील का? लोणावळ्याला माझं फार्म हाऊस आहे. तेथे तू ये. आपण गप्पा मारू. इथे मुंबईत ते शक्य नाही…”
शोभना समर्थचं आयुष्य विलक्षणच! सगळं असून आयुष्याची फरफट पहायला लागत होती. त्या, त्यांच्या मुली आणि त्यांच्याबरोबर येणारे. प्रश्न पडावा खरं काय खोटं काय? तेव्हा त्या म्हणाल्या “कुणासाठी? कशाकरता?”
तेव्हा पटकन मी म्हटलं, उद्या तुम्ही नसाल तेव्हा तुमच्या नातवंडानां तुमच्याबद्दल बरं वाईट कोणी तरी सांगणारच तेव्हा त्या नातवंडाना तुमची बाजू कशी कळणार?
====
हे देखील वाचा: समर्थ आणि मुखर्जी घराण्याचा वारसा तितक्याच समर्थपणे सांभाळणारी गुणी अभिनेत्री म्हणजे काजोल.
====
इथेच गप्पा-बैठक संपली
एक दिवशी शोभना समर्थचा निरोप आला, “येऊ शकशील?” प्रश्न नव्हताच गेलो. गेल्या गेल्या शोभना समर्थ यांनी माझ्या पुढ्यात एक वही ठेवली. “तू जे बोललास ते पटलं, मी विचार केला. असा सल्ला यापूर्वी पण कुणी दिला नाही आणि मी ऐकलं देखील नसतं बरं! पण तू आता ऐक.
माझी कहाणी मी ह्या वहीत लिहिली आहे. मी बसल्या बसल्या वही चाळायला लागलो. तेव्हा त्या म्हणाल्या, “हे सार्वजनिक नाही. प्रसिद्ध तर करणारच नाही मात्र तनुजाकडे देऊन ठेवणार आहे. थॅंक्स फॉर युअर ॲडव्हाईस.”
पुढे वयोपरत्वे शोभना समर्थ (Shobhna Samarth) गेल्या.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
तनुजाची चित्रपट कारकिर्द पण संपत आली होती. एकदा कुठल्या शुटिंगला भेटली त्यात तिने वयोवृद्ध झालेल्या बाईंचा रोल केला होता. तेवढ्या वेळात मी ‘त्या’ वहीचा विषय काढला. पण तनुजाने उत्तर दिलं नाही कारण तिला शॉटसाठी बोलवण्यात आलं. मग ते राहिलंच! अजूनही वाटतं एकदा तनुजाकडे जावं. निदान ती वही तिने पुढे काजोल कडे सुपूर्द केली का विचारावं. काही झालं तरी ऐतिहासिक ठेवा जपला जायला हवा, हे कसे शक्य होईल ?
– रविप्रकाश