सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी एका टांगेवाल्यासाठी गायली गाणी कारण..
हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांइतकंच स्टारडम गायकांनाही प्राप्त झालं आहे. कित्येक चित्रपट केवळ ‘म्युझिकल हिट’ ठरले आहेत, म्हणजेच ते केवळ गाण्यांवर चालले आहेत. या गायकांचाही स्वतःचा एक वेगळा जॉनर होता आणि तो आवडणारा प्रेक्षक खरंतर श्रोतेवर्गही होता. बॉलिवूडमध्ये अगदी ५० च्या दशकापासून अजरामर झालेले असेच एक गायक म्हणजे मुकेश (Mukesh).
मुकेश यांचा जन्म २२ जुलै १९२३ साली झाला होता. जोरावर चांद माथूर आणि चंद्राणी माथूर या हिंदू कश्यप दांपत्याच्या १० अपत्यांपैकी मुकेश हे सहावे अपत्य. मुकेशजींची बहीण ‘सुंदर प्यारी’ तेव्हा शास्रीय संगीताचं शिक्षण घेत होत्या. त्यांना शिकवण्यासाठी घरी शिक्षक यायचे तेव्हा लहानगा मुकेश बाजूच्या खोलीत बसून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. इथूनच त्यांच्या गायनकलेची खरी सुरुवात झाली.
मुकेश (Mukesh) लहानपणापासूनच ‘सैगल’ यांच्या गाण्याचे चाहते होते. ते नेहमी त्यांची गाणी ऐकून त्यांच्यासारखं गायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे ते जिथे जात तिथे त्यांना सैगल यांची गाणी म्हणण्याचा आग्रह केला जात असे. मुकेश त्यांच्या बहीणीच्या लग्नाच्या वेळी असंच ते गाणं गात होते तेव्हा त्यांचे दूरचे नातेवाईक आणि प्रसिध्द अभिनेते मोतीलाल यांनी ते गाणं ऐकलं. त्यांच्या आवाजाने मोतीलाल प्रभावित झाले. त्यांनी मुकेश यांना मुंबईला यायचा सल्ला दिला.
मुंबईला गेल्यावर मुकेश यांनी ‘पंडित जगन्नाथ प्रसाद’ यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षण चालू असतानाच त्यांना एका चित्रपटामध्ये गायक आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिकांसाठी ऑफर आली. साहजिकच त्यांनी ती स्वीकारली. हा चित्रपट होता ‘निर्दोष’. हा चित्रपट आणि त्यातली गाणी काही फारशी लोकप्रिय झाली नाहीत. यानंतर त्यांनी दुःख सुख, अदा या चित्रपटांमधून भूमिका केली. पण ते ही चित्रपट फारसे चालले नाहीत. निर्माता म्हणूही नशीब आजमावून बघितलं पण पदरी अपयशच आलं. अभिनेता म्हणून यश मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी तो नाद सोडला आणि आपलं संपूर्ण लक्ष गाण्यावर केंद्रित केलं.
मुकेश (Mukesh) यांच्या गाण्यावर सैगल यांची छाप होती. त्यांच्या ‘पहिली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है तो जलने दे’ हे गाणं जेव्हा सैगल यांनी ऐकलं तेव्हा ते आश्चर्याने म्हणाले, “ताज्जुब है! मुझे तो याद नहीं आता, ये गाना मैंने कब गाया?” पुढे मात्र मुकेश यांनी त्यांच्या गाण्याची स्वतंत्र शैली तयार गेली. एस पी बालसुब्रम्हण्यम यांचा आवाज जसा सलमान खानच्या गाण्यांची ओळख बनला होता, तसंच त्या काळात मुकेश यांचा आवाज म्हणजे राज कपूर, मनोज कुमार, फिरोज खान, सुनील दत्त आणि दिलीप कुमार यांच्या गाण्यांची ओळख बनला होता.
मुकेश बॉलिवूडमध्ये दर्दभऱ्या गाण्यासाठी प्रसिद्ध असले तरी नंतरच्या काळात त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणीही गायली आहेत. यामध्ये डम -डम डिगा डिगा, जो तुमको हो पसंद वोही बात कहेंगे, कहीं करती होगी वो मेरा इंतजार, सावन का महिना, चंचल शीतल निर्मल कोमल, इ अनेक गाण्यांचा सामावेश आहे. मुकेश यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १३०० गाणी गेली आहेत.
त्यावेळी मोठ्या शहरांचा अपवाद वगळता गायकांचा चेहरा सर्वसामान्य लोकांना माहिती नसायचा. कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. मासिकं फार कमी लोक वाचत असत. त्यामुळे गायकाचा आवाज हीच त्याची ओळख होती. यामुळे मुकेश (Mukesh) यांच्या बाबतीत यामुळेच एक किस्सा घडला होता.
मुकेश साईभक्त होते. एकदा वेळात वेळ काढून ते शिर्डीला गेले होते. त्यावेळी ओला, उबेर काहीही नव्हतं. शिर्डीही फारसं प्रगत नव्हतं. शिर्डीत पोचल्यावर त्यांनी दोन दिवसांसाठी एक टांगेवाला ठरवला. दोन दिवस जेव्हा मुकेश शिर्डीमध्ये टांग्यातून फिरत होते. त्यावेळी तो टांगेवाला टांगा हाकताना फक्त त्यांचीच गाणी म्हणत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला ते काहीच बोलले नाहीत. टांगेवाल्यानेही त्यांना ओळखलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी टांगेवाल्याला विचारलं, तू नेहमी कोणाची गाणी म्हणत असतोस? तेव्हा टांगेवाल्याने उत्तर दिलं, ‘मुकेश नावाचे गायक आहेत. ही सर्व त्यांचीच गाणी आहेत.
त्यानंतरही मुकेश (Mukesh) शांत बसले. पण आपल्या चाहत्याला आपली ओळख न देणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी टांगेवाल्याला आपली ओळख सांगितली. साहजिकच टांगेवाल्याचा विश्वास बसला नाही. तेव्हा त्याची खात्री पटवून देण्यासाठी मुकेश यांनी चक्क त्याच्यासमोर गायला सुरुवात केली. गाणं ऐकताक्षणी टांगेवाल्याने त्यांचा आवाज ओळखला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आजपर्यंत ज्यांचा आवाज ऐकत आलो तो आवडता गायक समोर गाताना बघून तो भारावून गेला.
त्या दिवशीची संपूर्ण संध्याकाळ मुकेश यांनी त्या टांगेवाल्याची फर्माईश पूर्ण करण्यात घालवली. इतकंच काय तर त्याला साईबाबांची भजनेही ऐकवली. मुकेश यांची गाणी त्यांच्याजवळ बसून ऐकण्याचं भाग्य त्याला लाभलं होतं. स्वतःला तो धन्य धन्य समजू लागला.
=========
हे देखील वाचा – भूपिंदर सिंग: गाण्यात रस नव्हता म्हणून गिटार शिकली आणि गिटारीनेच पुन्हा गायनाकडे नेलं…
========
मुकेश यांची निघण्याची वेळ आली तेव्हा त्यांना निरोप देताना त्याला गहिवरून आलं होतं. त्याचं प्रेम पाहून मुकेश यांचे डोळेही भरून आले. टांगेवाल्याने पैसे घेण्यास नकार दिला. मुकेश यांनी मात्र त्याला ठरलेले पैसे तर दिलेच वर आणखीन पैसेही त्याला दिले. डांगेवाल्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते पाहून, “मी जेव्हा जेव्हा शिर्डीला येईन तेव्हा तुझ्याच टांग्यातून फिरेन”, असं सांगून मुकेश यांनी त्याची समजूत काढली.
चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या कलाकारांची अनपेक्षित भेट कायम वसमरणीय ठरत असते. तसंच कलाकरांसाठीही आपल्या चाहत्यांचे असे अनुभव नेहमीच आनंददायी आणि अविस्मरणीय असतात. अशा या सहृदय गायकाचे २७ ऑगस्ट १९७३ साली वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झाले आणि त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधल्या दर्दभऱ्या गाण्यांमधला दर्द कुठेतरी हरवून गेला.