कार चालवायला शिकवणाऱ्या आपल्या गुरुला मुक्ताने दिली होती ‘अशी’ गुरुदक्षिणा
मुक्ता बर्वे! नाटक, मालिका, चित्रपट अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी एक गुणी आणि गोड अभिनेत्री. नाटकांपासून सुरू झालेला मुक्ताचा प्रवास मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमांमधून आजही चालू आहे. चित्रपटसृष्टीमधील झगमगाटापेक्षाही नाटकाच्या रंगभूमीवर तिचं मनापासून प्रेम आहे. (Mukta Barve)
‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटात मुंबईकर दाखवलेली मुक्ता प्रत्यक्षात मात्र पुणेकर आहे. पुण्यातील चिंचवड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुक्ताला लहानपणापासून आवड होती ती नृत्याची. वडील टेल्को कमानीत नोकरीला, आई शिक्षिका, तर मोठा भाऊ देबू बर्वे तेव्हा चित्रपटांमध्ये काम करायचा. मुक्ता लहानपणापासून काहीशी लाजरी आणि अबोल. मुक्ताचा अबोल स्वभाव बदलण्यासाठी तिच्या आईने तिच्यासाठी ‘रुसू नका फुगू नका’ हे बालनाट्य लिहिले. यामध्ये ‘भित्रा ससा’ आणि ‘परी राणी’ अशा दोन्ही भूमिका मुक्ताने साकारल्या होत्या. (Mukta Barve)
दहावीच्या परीक्षेनंतर मुक्ताने रत्नाकर मतकरी लिखित ‘घर तिघांचं हवं’ या नाटकामध्ये काम केलं. पुण्याच्या एसपी कॉलेजमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुक्ताने ललित कला केंद्रामधून (सावित्रीबाई फुले विद्यापीठ) नाट्यशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर ती मुंबईला गेली.
मुंबईमध्ये सुरुवातीला ती हॉस्टेलला रहायची. कुटुंबापासून लांब राहताना, हॉस्टेलच्या वातावरणात तिला पुण्याची, आपल्या घराची आणि कुटुंबीयांची भरपूर आठवण यायची. पण ती मागे आली नाही. काही दिवसांतच तिने हॉस्टेल सोडलं आणि एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहायला गेली. मुंबईत मुक्ताने ९ वर्षात एकूण ९ जागा बदलल्या आणि अखेर स्वतःचं घर घेतलं. पण या नऊ वर्षात मी मागे फिरली नाही. जिद्दीने आपली कारकीर्द घडवत राहिली. अर्थात अधून मधून घरच्या आठवणीने भावनाविवश होत असे. पण याच दरम्यान तिला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. रसिका जोशी ही तिची अत्यंत खास मैत्रीण होती.
हळूहळू मुक्ता मनोरंजन क्षेत्रात स्थिरावत होती. तिने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं. तिने स्वतःची कार घेतली पण तिला ती चालवता येत नव्हती. त्यामुळे दोन महिने कार तशीच पडून होती. अखेर ती कार चालवलायला शिकली पण तिची कार शिकण्याची कहाणी मात्र भन्नाट आहे. (Mukta Barve)
त्यावेळी मुक्ता आणि सोनाली कुलकर्णी (गुलाबजाम फेम) अमेरिकेमध्ये एकमेकींना भेटल्या तेव्हा सोनालीने तिला विचारलं, “अगं तू कार घेतलीस ना? मग चालवत का नाहीस? आता कार घेतली आहेस, तर तिचा वापर कर. तू कार चालवायला शिक.” मुक्ताला सोनालीचं बोलणं पटलं म्हणण्यापेक्षा तिच्या बोलण्यामुळे एक प्रेरणा मिळाली आणि तिने भारतात आल्यावर ड्रायव्हिंगचा क्लास लावला.
ड्रायव्हिंगचा क्लास तसा यथातथाच होता. मुक्ताला सूचना देण्यापलीकडे तो काहीच शिकवत नव्हता. त्यामुळे मुक्ताला त्याचा फार काही फायदा होत नव्हता. पण जेव्हा तिची मैत्रीण रसिकाला हे सगळं कळलं तेव्हा ती म्हणाली, “मुक्ते, अगं, मी असताना तुला दुसऱ्या गुरुची गरजच काय? मी शिकवते तुला गाडी” रसिका उत्तम गाडी चालवायची. तिने मुक्ताला अवघ्या तीन दिवसात गाडी चालवायला शिकवली. (Mukta Barve)
आपल्याला गाडी चालवता यायला लागली याचा मुक्ताला प्रचंड आनंद झाला. तिने रसिकाला गुरुदक्षिणा द्यायची ठरवली. त्या दिवशी मुक्ता स्वतःच्या घरातून गाडी घेऊन रसिकाच्या घरी तिला भेटायला गेली. रसिकाच्या घराच्या खाली आल्यावर तिने रसिकाला फोन केला आणि खाली यायला सांगितलं. जेव्हा रसिकाला कळलं की, मुक्ता स्वतःच्या घरून ड्राइव्ह करत तिथपर्यंत आली तेव्हा रसिक खुश झाली आणि तिने मुक्तावरून १०० रुपये ओवाळून तिला दिले. (Mukta Barve)
रसिका जोशी एक उत्तम अभिनेत्री होती. तिने मराठी नाटक, मालिका व चित्रपटांसह कित्येक हिंदी मालिका व चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या. ७ जुलै २०११ रोजी ल्युकेमियाच्या आजाराने वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
=======
हे देखील वाचा – ..तर बिग बी दिसले असते ‘खलनायक’!
=======
मुक्ताने २०१३ साली निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. आपल्या मैत्रिणीच्या आठवणीप्रित्यर्थ तिने आपल्या प्रॉडक्शन कंपनीचं नावही ‘रसिका प्रॉडक्शन’ ठेवलं. अशी मैत्री अभावानेच बघायला मिळते. मनोरंजनाच्या क्षेत्रात तर फारच कमी. मुक्ताने ‘रसिका प्रॉडक्शन’च्या माध्यमातून छापा काटा, लव्ह बर्ड्स, इंदिरा, कॉड मंत्रा, दीपस्तंभ अशा अनेक लोकप्रिय नाटकांची, तर ‘रंग नवा’ या कवितांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. एक अभिनेत्री म्हणून यशस्वी असणारी मुक्ता निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहे