अमिताभ बच्चन यांनी मला ठार मारण्याच्या प्रयत्न केला; परवीन बाबी यांनी केला होता गौप्यस्फोट..
“माय नेम इज अँथनी गोन्साल्विस” या गाण्यामधली नायिका आठवतेय का? हो, तीच परवीन बाबी! बॉलिवूडमधली ७० च्या दशकातली बोल्ड अभिनेत्री. परवीन बाबी यांचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. इंग्रजी विषयात बीए असणाऱ्या परवीन बाबी यांनी पुढे शिकण्यात फारशी रुची नव्हती कारण बोल्ड आणि ब्युटीफुल असणाऱ्या या सौंदर्यवतीने स्वप्न पाहिलं ते मॉडेलिंगचं! हो सुरुवातीपासूनच त्यांना मॉडेल व्हायचं होतं. या दुनियेत येण्यासाठी आवश्यक असणारा बोल्डनेस त्यांच्याजवळ होताच. (Parveen Babi)
मॉडेलिंगसाठी परवीन योग्य संधीच्या शोधात होत्या. एक दिवस चित्रपट दिग्दर्शक बीआर इशारा यांनी त्यांना पाहिलं. त्यावेळी त्या सिगारेट ओढत होत्या. त्यांना सिगारेट ओढताना पाहून बीआर इशारा यांनी मनोमन ठरवले, “हीच असेल आपल्या चित्रपटाची नायिका!”
बीआर इशारा यांच्या ‘चरित्र’ चित्रपटात क्रिकेटर सलीम दुर्रानीसोबत परवीन बाबी सर्वप्रथम मोठ्या पडद्यावर झळकल्या. हा चित्रपट विशेष कमाल दाखवू शकला नाही. यानंतर त्यांनी काही चित्रपट केले पण पहिलं व्यावसायिक यश मिळालं ते १९७४ सालच्या ‘मजबूर’ या चित्रपटाला. यामध्ये त्यांचा नायक होता अमिताभ बच्चन. परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘शान’ आणि ‘कालिया’ सारख्या चित्रपटात ही जोडी पुन्हा जमली. हे सर्व चित्रपट तुफान हिट झाले. (Parveen Babi)
सुरुवातीच्या काळात परवीन बाबी आणि झीनत अमान या दोन्ही अभिनेत्रींमध्ये तुलना होत असे. परवीन बाबी यांना गरिबांची ‘झीनत अमान’ म्हणूनही हिणवलं जात असे. परंतु होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करून परवीन त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये प्रचंड वेगाने प्रगती करत होत्या. अशातच बॉलिवूडच्या या ‘फॅशन आयकॉन’साठी एक खास दिवस उजाडला. १९७६ साली त्यांचा फोटो ‘टाइम मॅगझिन’च्या कव्हर पेजवर झळकला. यापूर्वी हा मान बॉलिवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीला मिळाला नव्हता.
परवीन बाबी त्यांच्या व्यवसायिक आयुष्यात यशस्वी होत होत्या. त्या काळात ‘सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री’ असा त्यांचा उल्लेख केला जाऊ लागला. व्यावसायिक यशाइतक्याच त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगू लागल्या. सर्वात आधी त्यांचं नाव जोडलं गेलं ते डॅनीसोबत. ही दोघं साधारणतः तीन ते चार वर्षे एकत्र होती. परंतु नंतर अचानक काही कारणांनी दोघं वेगळी झाली. त्यानंतर त्यांचं नाव जोडलं गेलं ते कबीर बेदी यांच्यासोबत. परवीन बाबी आणि कबीर बेदी सुमारे तीन वर्षे एकत्र होते, पण नंतर हे नातेही संपुष्टात आले. (Parveen Babi)
एकीकडे परवीन बाबी यांचे चित्रपट यशस्वी होत होते, तर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र बरीच उलथापालथ होत होती. त्यांची प्रेमपकरणं अयशस्वी होत होती. याचदरम्यान त्यांच्या आयुष्यात आला एक प्लॉप दिगदर्शक – महेश भट्ट. महेश भट्ट यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. त्यांनी पत्नीला सोडून आपल्यासोबत राहावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र यासाठी ते तयार नव्हते. या दोघांच्या विभक्त होण्यामागे हे एक मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. यानंतर मात्र त्या मनातून पूर्णपणे कोलमडल्या. त्यांचा नात्यांवरचा विश्वास उडाला. याच दरम्यान त्यांना ‘पॅरानोइड स्किझोफ्रेनिया’ नावाचा मानसिक आजार जडल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
१९८४ मध्ये त्या फिलॉसॉफर यूजी कृष्णमूर्ती यांच्यासोबत त्या ‘वर्ल्ड टूर’वर करत होत्या. एप्रिल १९८४ रोजी जॉन एफ. केनेडी विमानतळावर मात्र त्यांच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली. विमानतळाबाहेर पडताना आपली ओळख सिद्ध करण्यासाठी त्यांना ओळखीचा एकही पुरावा देता आला नाही. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने त्यांना बेड्या ठोकून एका खोलीत बंद केले. ही बातमी तिथल्या भारतीय दूतावासात पोचताच तिथले अधिकारी तात्काळ तिथे आले आणि त्यांनी परवीन बाबींची सुटका केली. त्यांची अवस्था पाहून त्या भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी आहे यावर विमानतळ कर्मचाऱ्यांचा विश्वासच बसत नव्हता.
====
हे देखील वाचा – जेव्हा सचिन देव बर्मन यांना तिकीट चेकरने पकडले…
====
पुढे त्या १९८९ साली भारतात परत आल्या तेव्हा त्यांची मानसिक अवस्था अत्यंत वाईट होती. याच वर्षी परवीन बाबी यांनी प्रसारमाध्यमांमध्ये अमिताभ बच्चन तिला ठार मारायचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट केला. एका मासिकाला मुलाखत देताना त्या म्हणाल्या, “अमिताभ बच्चन हे ‘इंटरनॅशनल गँगस्टर’ आहेत. मला ठार मारायची त्यांची योजना आहे. त्यांच्या गुंडांनी माझे अपहरण करून मला एका बेटावर ठेवले आणि माझी शस्त्रक्रिया करून माझ्या कानाखाली एक चिप घालण्यात आली. या चिपच्या मदतीने ते माझ्यावर लक्ष ठेवातात.” या मुलाखतीदरम्यान त्यांनी कानाखाली झालेली एक जखमही दाखवली.(Parveen Babi)
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला अनेक पत्रकार त्यांच्या घरी मुलाखतीसाठी जात असत. तेव्हा येणाऱ्या पत्रकाराला त्या त्यांचं खाणं व पाणी टेस्ट करायला सांगायच्या कारण त्यांना वाटत असे की, कोणीतरी त्यांच्या खाण्यात विष मिसळलं आहे. घरातले लाईट गेल्यावर त्यांना वाटायचं आंतरराष्ट्रीय माफियांनी तिला घाबरवण्यासाठी मुद्दाम तिच्या घरचं वीज कनेक्शन तोडलं आहे. त्यांच्या दृष्टीने सर्व पत्रकार अमिताभ बच्चन यांचे एजंट होते. अमिताभ यांना टीव्हीवर पाहूनही त्या घाबरत असत. १९९१ साली आलेल्या ‘इरादा’ या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या.
महेश भट्ट यांचा ‘अर्थ (१९८२)’ हा चित्रपट त्यांच्या आणि परवीन बाबीच्या नातेसंबंधावर आधारित होता. तर २००६ साली प्रदर्शित झालेला वो लम्हे हा चित्रपट परवीन बाबीच्या आयुष्यावर आधारित असल्याचं बोललं जातं. तसंच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रंजिश ही सही’ या वेबसीरिजची कथा महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या नात्यावर आधारित असल्याचं सांगितलं जातं.
अखेर २००५ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अनेक दिवस घराबाहेर वर्तमानपत्रे आणि दुधाच्या पिशव्या पडलेल्या होत्या. कोणीतरी पोलिसांना कळवलं आणि त्यांनी दरवाजा तोडून मृतदेह घरातून बाहेर काढला. बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचा मृत्यू हे एक कोडेच आहे. यापैकी एक नाव परवीन बाबी यांचेही आहे.