‘त्या एका भूमिकेमुळे वर्षा उसगावकर यांच्यामध्ये घडला एक मोठा बदल
मराठी चित्रपटसृष्टीमधली चिरतरुण अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. आजही ती तितकीच फ्रेश, एनर्जेटिक आणि तरुण वाटते. ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं. घाऱ्या डोळ्यांच्या या गोऱ्या गोमट्या, देखण्या अभिनेत्रीने केवळ नाटक अथवा मराठी चित्रपटच नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Varsha Usgaonkar)
गोव्यामधील उसगाव हे या अभिनेत्रीचं मूळ गाव. यावरूनच त्यांचं आडनाव पडलं उसगावकर. वडील राजकारणात सक्रिय, परंतु त्यांना मात्र राजकारणात अजिबात रुची नव्हती. लहानपानापासूनच त्यांना अभिनेत्री व्हायचं होतं. लहापणी स्वतःला आरशासमोर निरखत असताना त्यांना अनेकदा वाटायचं, “तशी बरी दिसते मी. मी देखील अभिनेत्री होऊ शकते.”
लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि गाण्याची प्रचंड आवड होती. गणितात मार्क्स कमी मिळाल्यामुळे कथ्थक नृत्याचा क्लास वडिलांनी बंद केला. त्यावेळेची मात्र लहानग्या वर्षाला प्रचंड राग आला होता. एकवेळ शाळा थांबवली असती तरी चाललं असतं, पण नृत्य का थांबवलं? असे विचार राहून राहून त्यांच्या डोक्यात येत होता. (Varsha Usgaonkar)
मराठीवर नितांत प्रेम असणाऱ्या वर्ष उसगावकर यांचं प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून, तर पुढचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. मराठी साहित्यावर विशेष प्रेम आणि गोव्याच्या भूमीत जन्माला आल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या वागण्या- बोलण्यामधून नेहमी जाणवत असतो. लाजरी- बुजरी आणि काहीशी अबोल असणाऱ्या वर्षा उसगावकर मनाने मात्र निखळ स्वछ आणि पारदर्शक आहेत.
लाजरा- बुजरा स्वभाव असल्यामुळे शाळेमध्ये त्यांनी कधी कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नाही. परंतु, नववीमध्ये असताना त्यांनी दिसला ग बाई दिसला या लावणीवर स्वतःच कोरिओग्राफ करून नृत्य परफॉर्म केलं होतं. तेव्हा त्यांचं सर्वानी कौतुक केलं आणि यामुळे त्यांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. कॉलेजमध्ये मात्र एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्यस्पर्धा विविध स्पर्धांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली. पुढे औरंगाबादला त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. (Varsha Usgaonkar)
वर्षा उसगावकर यांना गाण्याचीही प्रचंड आवड होती. त्यांच्या गाण्यांचं अनेकांनी कौतुक केलं. इतकंच नाही तर त्यांच्या गाण्याचे अनेक कार्यक्रमही झाले. परंतु अल्पावधीतच त्यांच्या लक्षात आलं की, गाण्यासाठी प्रचंड मेहनत आणि सुरांची तालीम लागते. दर्दी, कानसेन प्रेक्षकांना रुचण्याइतकं आपण छान गात नाही. एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट त्यांनी प्रांजळपणे मान्य केली होती. आपल्या मर्यादांबद्दल एवढं प्रामाणिकपणे बोलणारी वर्षाजींसारखी नायिका एखादीच! अर्थात गाण्याच्या आवडीमुळे नंतर त्यांनी गायनाचं शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलं.
अभिनय, नृत्य, गायन अशा सर्वच क्षेत्रात हरहुन्नरी कलाकार असणाऱ्या वर्षाजींना शाळेत असताना ‘स्पोर्ट्स’मध्ये मात्र अजिबातच इंटरेस्ट नव्हता. अगदी क्रिकेटबद्दल बोलयतानाही त्या म्हणतात, “मला या खेळातील खेळाडूंबद्दल आदर आहे पण, ‘आय हेट क्रिकेट’. परंतु खेळ आवडत असो किंवा नसो एका कलाकाराला आयुष्यात आपल्या भूमिकेच्या अनुषंगाने अनेक नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. अगदी स्विमिंग पासून हॉर्स रायडिंगपर्यंत अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी त्यांना आत्मसात कराव्या लागतात किंवा बॅडमिंटन, फुटबॉल अशा एखाद्या खेळाचंही प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागतं. असंच एक शिक्षण वर्षा उसगावकर यांनाही घ्यावं लागलं होतं. (Varsha Usgaonkar)
त्यावेळी वर्षाजी ‘राणी लक्ष्मीबाई’ ही मालिका करत होती. या मालिकेच्या निर्मात्या होत्या हेमामालिनी. या मालिकेमध्ये घोड्यावर बसून काही शॉट्स त्यांना द्यावे लागणार होते. सुरुवातीला वर्षा उसगावकरने हेमामालिनी यांना सांगितलं, “मुझे घोडे पे बैठना नहीं आता.” यावर हेमाजींनी त्यांना सांगितलं, “तो आपको सिखना पडेगा.”
=========
हे देखील वाचा – उत्तम युक्तिवाद करूनही हाय कोर्टात केस हरले होते ॲड महेश कोठारे!
=========
या मालिकेतली भूमिका वर्षाजींसाठी स्वप्नातली भूमिका होती. एवढी चांगली भूमिका केवळ घोड्यावर बसायच्या भीतीने सोडणं शक्यच नव्हतं. अखेर वर्षाजींनी या मालिकेसाठी टिनू वर्मा यांच्याकडे ‘हॉर्स रायडींग’चं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. बरं त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर महालक्ष्मी रेसकोर्सच्या एका क्लबच्या मेम्बर झाल्या. रोज पहाटे ५ वाजता उठून अर्धा तास हॉर्स रायडींगला जायचा नेमच त्यांनी केला होता. पुढे जाऊन त्यांनी नेमबाजीचंही प्रशिक्षण घेतलं. त्यामध्ये सिल्वर मेडलही मिळवलं. अशाप्रकारे झाशीच्या राणीच्या भूमिकेने वर्षांजींमधला धाडसीपणा जागवला. (Varsha Usgaonkar)
-भाग्यश्री बर्वे