ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
व. पु. च्या कथेवर बनलेला ’मुंबईचा जावई’आजही लोकप्रिय!
मराठी साहित्य दरबारातील एक मानाचं पान होतं व. पु. काळे (V.P. Kale) शहरी मध्यम वर्गीयांच्या भाव भावनांच फार सुरेख चित्रण त्यांच्या कथांमधून असायचं. १९७० साली त्यांच्या ’कुचंबना’ या कथेवर एक चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ’मुंबईचा जावई’. मुंबईतील जागेची समस्या व चाळीतील दोन खोल्यांच्या खुराड्यात होत असलेली एका नव विवाहित दांपत्याची अडचण दाखविलेल्या या सिनेमाच्या निर्मितीची कथा मनोरंजक आहे. १९६९ साली व. पु. (V.P. Kale) च्या याच कथेवर पुण्याच्या एफ टी आय आयच्या विद्यार्थ्यांनी एक शॉर्टफिल्म बनवली होती. (या शॉर्ट फिल्म मध्ये जया भादुरीने भूमिका केली होती तेव्हा ती एफ टी आयला शिकत होती!) ही फिल्म त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग होता व ती कुठेही प्रदर्शित होणार नव्हती. पण या कथेचे हक्क एफ टी आय कडे होते. ते हक्क मिळविण्यासाठी राजा ठाकूर व निर्माते तुषार प्रधान तत्कालीन प्राचार्य जगत मुरारी यांना भेटले. त्यांनी याची परवानगी मंत्रालयाकडून मागावी लागेल असे सांगून तसे पत्र दिल्लीला पाठवले. इकडे राजा ठाकूर यांनी परवानगी येणारच आहे, आता थांबायचे कशाला म्हणून सिनेमाची निर्मिती सुरू केली.
व.पु.ची (V.P. Kale) कथा समस्या प्रधान होती पण त्याचे उत्तर विनोदी पध्दतीने काढले जाणार होते. हे व.पु. ना सुरूवातीला पटले नव्हते. पण ठाकूरांनी व.पु. (V.P. Kale) ना काही समस्या विनोदाच्या अंगाने मांडल्या तर पब्लिकला जास्त लवकर अपील होतात, असे सांगून पटविले. राजा ठाकूर यांनी राम केळकर यांच्याकडून पटकथा संवाद लिहून घेतले. सिनेमाचा मुहूर्त जयप्रभा स्टुडिओत तिथले ज्येष्ठ कर्मचारी म्हादबा मिस्त्री यांच्या हस्ते झाला. सिनेमात राजा दाणी (यावेळी ते एस बी आय मध्ये कार्यरत होते) व सुरेखा (एकटी ची नायिका) ही जोडी होती. सोबतीला अरूण सरनाईक व रजिता आणि शरद तळवळकर व रत्नमाला अशी पात्र रचना होती. मुंबईतील छोट्या जागेत राहणारी मंडळी किती मोठ्या मनाची असतात याचं खूप भावस्पर्शी चित्रण केलं गेलं. दुसर्याच्या सुखासाठी झटणारी, त्यांच परस्परांवरील प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचं नातं, त्यागाची, समर्पणाची भावना याच सुरेख सादरीकरण यात होतं.
मुंबईचा जावई या चित्रपटाचे कथानक व. पु. काळे यांच्या असल्यामुळे मुंबईच्या मध्यमवर्गीय समाजाच्या सुख-दुःखांना फार सुंदर रीतीने त्यांनी या चित्रपटात दाखवले आहे. कथानक चाळीतील असल्यामुळे जागेचा मुंबईतील भेडसावणारा प्रश्न येथे ऐरणीवर आणला असला तरी इथल्या चाळीतील लोकांची मने किती मोठे असतात ते फार सुंदर रीतीने यामध्ये दाखवले आहे. नव्या नवरीचे होणारी कुचंबना फार अप्रतिम रित्या यात दाखवली आहे. तिच्या सुखासाठी धडपडणारे सर्वजण, त्यातून होणाऱ्या गमतीजमती प्रेक्षकांना मनापासून आवडल्या. नवविवाहितांना एकांत मिळावा म्हणून घरातील सर्वांनी बाहेर जाणे. नायक त्यादिवशी नेमका उशिरा येणे आणि आता एकांत मिळणारे आनंदात असतानाच अचानक कोणीतरी पाहुणा येऊन टपकणे! सारेच फार गोड आणि सुंदर रीतीने चित्रपटात घेतले होते. नायिकेचे काका (जी भूमिका रामचंद्र वर्दे यांनी केली होती) ते अतिशय तापट. मुंबईतील छोट्या जागेवर नाराज असलेले.’ ‘प्रशस्त वाड्यात वाढलेली मुलगी इथल्या चाळीच्या खुराड्यात कशी राहणार?’ हा त्यांचा प्रश्न रास्त असतो. ते मुलीला कायम स्वरूपी परत आपल्या घरी घेऊन जाणार असतात. परंतु इथे आल्यावर इथल्या मुंबईकरांच्या मोठ्या मनाची कल्पना त्यांना येते आणि मोठ्या दिलाने ते आपल्या आयुष्याची सर्व पुंजी तिच्या ताब्यात देतात. काहीसा भाबडा आशावाद असलेलं कथानक असलं तरी ते सच्चे कथानक होते. त्यामुळेच हा चित्रपट प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. कारुण्य आणि विनोदाचा मस्त शिडकावा प्रेक्षकांना सुखावून गेला.
=====
हे देखील वाचा : अभिजात मराठी चित्रपट ‘आम्ही जातो आमुच्या गावा…’
=====
या सिनेमातील गदीमांची गाणी व त्यावरील सुधीर फडकेंचा सुरीला स्वरसाज अवर्णनीय होता. प्रथम तुज पाहता (रामदास कामत) कारे दुरावा कारे अबोला, आज कुणी तरी यावे (आशा भोसले) कशी करू स्वागता (सुमन कल्याणपूर) या गाण्यांनी बहार आणली. (यातील कारे दुरावा कारे अबोला ही चाल फडक्यांना इतकी आवडली की काही वर्षांनी पुन्हा त्यांनी याच चालीवर ’धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ हे गाणे बनवले) चित्रपटाच्या सुरूवातीला नीलम प्रभू आणि अरविंद देशपांडे यांचे निवेदन होते. अवघ्या तीन महिन्यात हा चित्रपट तयार झाला. पण अद्यापही दिल्लीहून काही कथेच्या हक्काबाबत परवानगी आली नाही. मग वपुंच्या नावाशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला पण भाग्य व.पु. (V.P. Kale)चे प्रदर्शनाच्या काही दिवस आधी परवानगीचे पत्र मिळाले! सिनेमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. १९७१ सालच्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट,दिग्दर्शक,पटकथा,संवाद,विशेष अभिनेता,कला दिग्दर्शक,छायालेखक अशी दणदणीत सात पारितोषिक मिळवून ’मुंबईचा जावई’ ने बाजी मारली. पुढे अनिल धवन -जया भादुरीला घेवून बासू चटर्जी यांनी १९७२ साली याच कथानकावरून ’पिया का घर’ बनविला त्याला देखील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. मुंबईचा जावई हा चित्रपट युट्युब वर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली देत आहे, वाचकांनी हे अभिजात कलाकृती नक्की पहावी.