कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar): मराठी संगीत रंगभूमीचा “किर्तीवंत शिलेदार” हरपला
संगीत आणि अभिनय हाच ज्यांचा श्वास होता आणि रंगभूमीची सेवा हेच ज्यांचे जीवनध्येय होते अशा जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचे आज वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतु, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कलेचा शास्त्रशुध्द अभ्यास, निर्मळ स्वर, मनाचा ठाव घेणारा अभिनय, अखंड परिश्रम याच्या सहाय्याने गेली सहा दशके त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीवरील एक दीपस्तंभ विझला आहे.
कीर्ती जयराम शिलेदार (Kirti Shiledar) यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी पुणे येथे झाला. वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला शिलेदार रंगभूमीवरील गायन आणि अभिनय करत असल्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर संगीत आणि अभिनयाचे संस्कार झाले.
वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ या नाटकांपासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए.’ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.
विद्याधर गोखलेंच्या ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाच्या निमित्ताने कीर्ती यांना ‘नीळकंठबुवा अभ्यंकर’ गुरू म्हणून लाभले. अभ्यंकर बुवांच्या तालमीत वाढलेल्या कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारात तयार झाल्या.
आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास संगीत मैफली झाल्या. अनेक जुन्या संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना, रेवती अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. रंगतदार, ढंगदार गायकीबरोबरच त्यांचे लयीवरदेखील प्रभुत्व दिसून येई. तबला व पखवाज वाजवण्यातही त्या निपुण आहेत.
कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या ज्येष्ठ भगिनींच्या ‘संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्ती शिलेदार यांनी केले. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि बदलत्या काळानुसार नाविन्याचा अंतर्भाव त्यांच्या संगीत नाटकात आणि संगीतातही दिसतो.
‘चंद्रमाधवी’ या नाटकाच्या संगीतासाठी त्यांना ‘झी’चा ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पुरस्कार मिळाला. विद्याधर गोखल्यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होय. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली. तमाशातल्या मैनेपासून शास्त्रीय संगीत गाणार्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या अनेक छटा दाखविण्यासाठी कीर्ती शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेऊन ही भूमिका ताकदीने सादर केली.
कीर्ती शिलेदारांनी ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध लिहिला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन.एस.डी.तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच, ‘संगीत शारदा’ या नाटकाचा हिंदी नाट्यांशही त्यांनी सादर केला.
कीर्ती शिलेदार यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं होतं. मराठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या कीर्ती शिलेदार यांना नाट्य संमेलन अध्यक्षपदाचा मान मिळाला तेव्हा संगीत रंगभूमीचीच नव्हे, तर एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट होती.
“नाटक प्रत्यक्ष अनुभवणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मराठी माणसाचे नाटकावर प्रेम आहे. या नाटकवेड्या प्रेक्षकाची केवळ संगीत नाटकाचीच नव्हे, तर सर्व प्रकारची नाट्यविषयक जाणीव समृद्ध करणे मला आवश्यक वाटते.” ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी केलेलं हे विधान नक्कीच जबाबदार आणि आश्वासक असे आहे.
आजचे संगीत कसे आहे? या प्रश्नावर नेहमीच त्यांना विविध माध्यमांमध्ये बोलतं करण्यात आलं होतं. “अभिजात भारतीय संगीत हे मनाला स्थैर्य, उभारी आणि शांती देणारे संगीत आहे. आपले संगीत हे चिरकाल टिकणारे आहे. स्वरविलास कितीही चांगला असला तरी रसनिष्पत्ती करत गायलेले गाणे अधिक खोलवर रुजते. आज कर्णकर्कश, कानठळ्या बसवणाऱ्या पाश्चात्त्य संगीताचा जोर वाढला आहे. त्याने बहिरेपण येईल की काय, अशी भीती वाटते. या सगळ्या गदारोळात भारतीय संगीत मनातील अस्वस्थता, चंचलता दूर करेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले संगीत आपल्याला भानावर आणेल, त्याचे कर्णमाधुर्य मनाला आनंद देईल. हा आनंद धकाधकीच्या जीवनात जपून ठेवायचा असेल, तर ही संगीतपरंपरा आपण जपायला हवी, तो वारसा आपण पुढे न्यायला हवा”, असे आग्रही मत त्या मांडायच्या.
=====
हे ही वाचा: लता मंगेशकर यांचा स्वर आणि ओ पी नय्यर यांचे सूर का जुळले नाहीत?
हे ही वाचा: अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
=====
संगीत रंगभूमीचे पुढे काय होणार, याविषयी चिंता व्यक्त केल्यावर कीर्ती ताई आग्रही मत व्यक्त करत म्हणायच्या, “असं कधीच होणार नाही. रंगभूमी कोमेजून जाईल की काय, अशी भीती वरचेवर व्यक्त केली जाते. मात्र ही भीती वृथा आहे. नव्याचा स्वीकार करत संगीत नाटकांची जपणूक करायला हवी.”
महाराष्ट्रात संगीत नाटकांची परंपरा आहे. जिथे भेसळ असते ते टिकत नाही. मात्र जे अभिजात असते त्याला कधीही मरण नसते. ते टिकावं म्हणून दर्दी रसिक, कलावंत त्याच्या शोधात पुढे येतो. त्यात प्रयोगशीलता आणतो. संगीत नाटकाबद्दलही दमदार कलावंत असे प्रयोग करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची ही परंपरा लोप पावणार नाही, तर अधिक लखलखत्या हिऱ्यासारखी झळाळून निघेल, हा विश्वास त्यांच्या शब्दांमध्ये कायमच ओतप्रोत भरलेला असायचा.
कीर्ती ताई महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्या होत्या. संगीत रंगभूमीचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार (२०१४) ही त्यांना देण्यात आला होता