विधू विनोद चोप्रांची ३५ वर्षापूर्वीची क्लासिक मूव्ही: परिंदा
यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला मिळाला या सिनेमाचे दिग्दर्शक होते विधू विनोद चोप्रा (Vidhu Chopra). पस्तीस वर्षापूर्वी १९८९ साली याच दिग्दर्शकाने एक जबरदस्त हिंदी सिनेमा दिग्दर्शित करून बॉलीवूडमध्ये मोठी हवा निर्माण केली होती. हा चित्रपट होता ‘परिंदा’. या चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विधु विनोद चोप्रा (Vidhu Chopra) यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट येथे शिक्षण घेतले त्यांनी तिथे काही अप्रतिम चित्रपट देखील बनवले. १९८५ साली ‘ खामोश’ या नावाचा एक अप्रतिम चित्रपट त्यांनी बनवला. पण त्याला चांगले डिस्ट्रीब्युटर्स मिळाल्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुढे व्यवस्थित रित्या आला नाही.
त्यानंतर चोप्रा यांनी कमर्शियल सिनेमा निर्माण करण्याचे ठरवणे पण हा सिनेमा निर्माण करताना वास्तववादा ची कास सोडायची नाही असे त्यानी ठरवले. हा सिनेमा त्यांनी लूजली अश्विन आणि अमर नाईक या मुंबईतील दोन गँगस्टरच्या जीवनावर बेतला होता. अनिल कपूर याला सिनेमात घ्यायचे त्यांनी सुरुवातीपासून ठरवले होते. पण त्याच्या मोठ्या भावाची भूमिका कोणाला द्यावी याचा जेव्हा ते विचार करू लागले तेव्हा पहिले नाव त्यांच्या डोळ्यापुढे आले अमिताभ बच्चन यांचे. पण त्यावेळी अमिताभ राजकारणात व्यस्त असल्यामुळे त्यांनी नम्र नकार दिला.
त्यानंतर या भूमिकेसाठी नसरुद्दीन शाह, सुरेश ओबेराय , अजित वाच्छानी यांचा देखील विचार झाला. नासीर ने ‘खामोश’ या चित्रपटात काम केले होते पण या दोघांची केमिस्ट्री काही जुळली नाही. अनिल कपूरच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत कुमार गौरवला घ्यावे असा देखील विचार झाला. पण कुमार गौरव ची रोमँटिक इमेज इथे आडवी आली. नंतर अनिल कपूरनेच जॅकी श्रॉफ चे सुचवले. त्या दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले होते. त्याच वेळी सुभाष घई यांचा ‘राम लखन’ चे शूट पण चालू होते. पण जॅकी ने काम करायला नकार दिला.
एकदा अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ हे कारमधून जात असताना अनिल कपूर एक धुन गुणगुणली त्यावर लगेच जॅकीने हे कुठले गाणे तू गुणगुणतो आहेस असे विचारले. त्यावर अनिल कपूर म्हणाला ‘हे गाणे अजून बनायचे आहे. पण मी जो आगामी चित्रपट करत आहे त्यात हे गाणे असणार आहे.” जॅकी ने विचारले ,”कोणता चित्रपट?” त्यावर अनिल कपूर म्हणाला,” ज्या चित्रपटाला तू नकार दिला तो चित्रपट!” जॅकी श्रॉफ ने कपाळाला हात मारला.तो म्हणाला ,” अरे यार इतके सुंदर गाणे या चित्रपटात असेल तर हा सिनेमा नक्कीच चांगला होणार.” मग अनिल कपूरने चोप्रासोबत जॅकी श्रॉफची मिटिंग फिक्स केली. जॅकी ने चित्रपटाचे कथानक ऐकले आणि होकार दिला. पण तरीही तो अनिल कपूरला फोन करून म्हणाला,” तुझ्या मोठ्या भावाची भूमिका करत करत मी एक दिवस बॉलीवूड मधून आऊट होऊन जाईल!” त्यावर अनिल कपूर सांगितले “असे काही होणार नाही.”
याचित्रपटातील महत्त्वाची व्यक्तिरेखा होती नाना पाटेकर यांची. त्याने रंगवलेला अण्णा हा खलनायक टेरर होता. ही भूमिका नाना पाटेकरला कशी मिळाली? एकदा विधू विनोद चोप्रा (Vidhu Chopra) मुंबईत शिवाजी मंदिरला जयवंत दळवी यांनी लिहिलेले ‘पुरुष’ हे नाटक पाहत होते. त्यातील नानाची भूमिका पाहून ते नानाच्या प्रेमातच पडले आणि त्यांनी या चित्रपटासाठी साईन केले. अनिल कपूरची नायिका म्हणून आधी डिंपल चा विचार झाला होता पण तोवर ‘तेजाब’ रिलीज होऊन अनिल माधुरीची जोडी प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे माधुरीची सिनेमात एन्ट्री झाली.
हा चित्रपट अवघ्या सहासष्ट दिवसात पूर्ण झाला. या चित्रपटासाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर केला गेला. हिंदी सिनेमासाठी हा सर्वार्थाने नवीन प्रकार होता. या सिनेमाचे छायाचित्रण बिनोद प्रधान यांनी केले होते. या चित्रपटात नाना पाटेकरचा जो अड्डा दाखवला आहे; तो मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीचा आहे. विधू विनोद चोप्रा यांनी मुंबई महानगरपालिके कडून ती जागा भाड्याने घेतली. चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांचे होते. यातील ज्या गाण्याची धून ऐकून जॅकी ने चित्रपट स्वीकारला ते गाणे होते ‘तुमसे मिलकर ऐसा लगा तुमसे मिलकर….’ वस्तुतः हे गाणे चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित वर चित्रित केले होते. चित्रपटाचा प्लॉट जबरदस्त होता. पटकथा साचेबंद आणि बंदिस्त होती. या चित्रपटाचे बॉलीवूडचा चेहरा मोहरा बदलवून टाकला. वास्तववादी कमर्शियल मुव्ही कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ या चित्रपटाने सुरू केला.
==========
हे देखील वाचा : किस्सा शम्मी कपूरच्या पहिल्या वहिल्या कारचा!
==========
या सिनेमाचा प्रभाव अनेक चित्र कर्मींवर पडला. महेश मांजरेकर, रामगोपाल वर्मा, दिवांकर बॅनर्जी. निखिल आडवाणी, अनुराग कश्यप या सर्वांनी ‘परिंदा’ चे तोंड भरून कौतुक करताना या सिनेमाने आम्हाला सिनेमा कसा बनवावा याचं शिक्षण दिल्याचे सांगितले. ३ नोव्हेंबर १९८९ या दिवशी दिवाळी स्पेशल रिलीज म्हणून हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. या चित्रपटाचे नाव आधी ‘ कबूतर खाना’ ठरवण्यात आले होते पण नंतर त्याचे नाव बदलले गेले.
या चित्रपटाला पाच फिल्म फेअरची आणि दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. १९९० सालच्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड साठी भारताची ही ऑफिशियल एंट्री होती. पण दुर्दैवाने त्याला नॉमिनेशन मिळाले नाही. या चित्रपटाचा प्रभाव पुढच्या दोन पिढ्यांवर जाणवला. २०१५ साली या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Chopra) यांनी हाच चित्रपट हॉलीवुड मध्ये जाऊन ‘ब्रोकन हॉर्सेस’ या नावाने बनवला. मधल्या काळात विधू विनोद चोप्रा (Vidhu Chopra) यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडीयट्स, पिके, संजू हे सुपरहिट सिनेमे दिले. यावर्षी ‘ट्वेल्थ फेल’ हा त्यांचा चित्रपट जबरदस्त गाजतो आहे.