विजय ची विजयी गाथा…
साऊथचे चित्रपट जी मंडळी आवडीनं बघतात त्यांनी विजय हे नाव नुसतं ऐकलं तरी त्यांचा चेहरा खुलतो. टिव्हीवर या वियजचा डब केलेला कुठलाही चित्रपट असेल, तर तो बघितला जातो. अर्थात या विजय नावाच्या हिरोचा महिमाच तसा आहे. त्याने आत्तापर्यंत केलेल्या बहुधा सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर करोडोची कमाई केली आहे. त्याचा थेरी असूदे की थलायव्हा असूदे. की भागवती असू दे. विजयचे सर्वच चित्रपट सॉलिड सुपरहीट झाले आहे. त्यामुळेच त्याचे चाहते त्याला थलापती म्हणतात. म्हणजेच सरदार. सरदार विजय. पांढरा शुभ्र शर्ट आणि लुंगी घातलेला विजय जेव्हा पडद्यावर येतो. तेव्हा या थलापतीच्या स्वागतासाठी सर्व थेअटर दणाणून जातं….
तामिळ चित्रपटात रजनीकांतला एक वेगळं स्थान आहे. सर्वाधिक मानधन घेणारा हा सुपरस्टार एक आयकॉन ठरला आहे. रजनीकांत पाठोपाठ सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार म्हणजे विजय. विजय म्हणजे तामिळ सिनेमांचा सुपरस्टार. चेन्नईतील रोमन कॅथलिक कुटुंबात विजय यांचा जन्म झाला. त्यांचे खरं नाव जोसफ विजय आहे. विजयचे चाहते मात्र त्याला थलापती म्हणतात. विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. विजयची आई शोभा या गायिका आहेत. विजयला विद्या नावाची बहिणही होती. पण या त्याच्या बहिणीचा वयाच्या दुस-या वर्षी मृत्यू झाला. विजय अद्यापही आपल्या बहिणीला विसरु शकले नाहीत. आता विजय बहिणीच्या नावाने अनेक सामाजिक संस्थांना मदत करतात. आपल्या लाडक्या बहिणीची कथा सांगणारा सुकरान नावाचाचित्रपट सुद्धा काढला आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नावही आपल्या बहिणीच्या नावावरुन ठेवले आहे.
तरुणींच्या गळ्यातील ताईत असणा-या या हिरोनं आपल्या एका चाहतीबरोबर लग्न केलं. त्यांची पत्नी संगिता ही श्रीलंकन हिंदू असून या दोघांची लंडनला भेट झाली. जासन संजय आणि दिव्या साशा अशी त्यांच्या दोन्हीही मुलांनी त्यांच्यासोबत चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केलं आहे.
आता विजय सुपरस्टार पदावर असले तरी त्यांनाही तामिळ चित्रपटात आपलं स्थान मिळवण्यासाठी चांगलेच परिश्रम करावे लागले. विशेष म्हणजे विजय स्वतः उत्तम गायक असून आपल्या आईचा शास्त्रीय गाण्याचा वारसा त्यांनी जपला आहे. आत्तापर्यंत तीसहून अधिक चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत. या चित्रपट सृष्टीत स्टार होण्यासाठी आणखी एक कला लागते, ती म्हणजे नृत्य. विजय हे उत्कृष्ठ नृत्यकलाकार आहेत. त्यांच्या नृत्याची स्टाईल ही साऊथमध्ये आयकॉन झाली आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून बालकलाकर म्हणून चित्रपटात काम करायला त्यांनी सुरुवात केली. सुपरस्टार रजनीकांतबरोबरही त्यांनी काम केलं. अठराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात हिरो म्हणून काम केलं. आज जगातील 18 देशात त्याचे चित्रपट पाहिले जातात. 100 करोडच्या पुढे बॉक्स ऑफीस गाजवलेले अनेक चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांचे चित्रपट मल्यालम, तेलगू, हिंदी, अगदी चिनी भाषेत सुद्धा डब झाले आहेत. आत्तापर्यंत शंभरावर चित्रपट करणा-या या अभिनेत्यांनं अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. त्यामध्ये तामिळनाडू राज्या पुरस्काराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे विजय यांचा फोर्ब्स मासिकाच्या इंडीया सेलिब्रिटी 100 या यादीमध्ये आतापर्यंत सातवेळा समावेश झाला आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट संघ चेन्नई सुपर किंग्जचे राजदूत म्हणूनही विजय यांचा गौरव करण्यात आला आहे.
विजय फक्त अभिनयातच सरदार पदापर्यंत पोहचलेले आहेत, असं नाही तर समाजसेवेमध्येही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी विजय पीपल ऑर्गनायझेशन नावाची संस्था स्थापना केली आहे. याशिवाय तामिळनाडूतील शैक्षणिक आणि संशोधन संस्था डॉ. एमजीआरआर तर्फे विजय यांनी समाज कल्याणासाठी केलेल्या योगदानाबद्दल आणि चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाच्या सन्मानार्थमानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला आहे.
विजय खरोखरच सेनापती आहे. आज हिंदी अनेक गाजलेले हिंदी चित्रपट या विजयच्या सुपर डूपर चित्रपटांचा रिमेक आहेत. आजही साऊथमध्ये अनेक विजय, नागा, महेशबाबूसारखे अनेक स्टार आपली जादू चालवत असले तरी या सरदाराचे स्थान अबाधित आहे.
सई बने…