Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या

विजया मेहता- मराठी रंगभूमीवरील समृद्ध पर्व
सातत्यपूर्ण नव्या प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करणा-या रंगकर्मी म्हणजे विजया मेहता. त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शन म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेले दुहेरी वरदानच. तुज आहे तुजपाशी, शितू, हॅम्लेट, सुंदर मी होणार,मादी, यशोदा, एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, संध्याछाया, जास्वंदी,अखेरचा सवाल,हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष,हयवदन, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक अत्यंत गाजलेली नाटकं विजयाबाईंच्या नावाशी जोडलेली आहेत. विजयाबाईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नाट्यकारर्कीर्दीचा आढावा घेऊया.
१९५१ साली महाविद्यालयीन नाटकांतून विजया मेहता यांच्या नाट्यकारकीर्दीची सुरुवात झाली. अगदी उमेदीच्याच काळात नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशा दिग्गज मंडळींसोबत काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. ‘झुंझारराव’ सारख्या नाटकातील विजयाबाईंचं काम पाहून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतूनही बोलावणं आलं.पण त्यास नकार देत रंगभूमीची वाट त्यांनी चोखाळली. केवळ अभिनय करत राहणं हे त्यांचं ध्येय नव्हतं. इब्राहिम अल्काझींसारख्या दिग्गज रंगकर्मींकडे त्यांनी रितसर नाट्य प्रशिक्षण घेतलं. रुळलेल्या वाटेवरुन रंगभूमीवर नाटक सादर करण्याऐवजी वेगळी वाट निवडताना ‘रंगायन’ सारख्या नाटकाला वाहिलेल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेची त्यांनी निर्मिती केली. रंगभूमीवरील अनेक साचेबद्ध गोष्टी हद्दपार करण्याचा आणि जागतिक रंगभूमीचं भान मराठी रंगभूमीला देण्याचा मान रंगायनला जातो.

विजयाबाईंनी चाकोरीबाहेरची नाटकं रंगभूमीवर आणतानाच लोकमान्य रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.तत्कालिन काहीशा आव आणून केल्या जाणाऱ्या अभिनयापेक्षा हा त्यांचा अभिनय नैसर्गिक होता. संध्याछाया या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या नाटकात वयस्कर नानीची भूमिका त्या रंगवत. एकदा औरंगाबादला नाटक संपल्यावर दुसऱ्या दिवशी त्या मुंबईला निघत असताना एक तरुण जोडपं त्यांना भेटायला आलं. दोघांनी विजया बाईंना वाकून नमस्कार केला. आणि म्हणाले,” थॅन्क्स. एसटीचं तिकीट काढलंय.दुपारी कोकणात जातोय. दापोलीत आई एकटीच असते.७ वर्षं घरी गेलो नव्हतो.काल ‘संध्याछाया’ पाहिलं.तुमच्या रूपात आई दिसली. आज सकाळी तिकीट काढलं. तुमच्या मुद्दाम पाया पडायला आलोय.”
विजयाबाईंच्या सहज अभिनयाचे असे अनेक किस्से सांगता येईल. त्यांनी रसिकांना आनंद देतानाच नव्या पिढीच्या नाट्यजाणीवाही समृद्ध केल्या. अशा या रंगकर्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!