करिअरच्या शिखरावर असतांना विनोद खन्नांनी का घेतला होता संन्यास ….
विनोद खन्ना (Vinod Khanna) यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिकंदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती.
१९८२ साली करिअरच्या शिखरावर असतांना त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का दिला. सगळं काही सुरळीत सुरु असतानाही विनोद खन्ना यांचं मन संसारात रमत नव्हतं. शेवटी त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं आणि ते ओशोंनी सांगितलेल्या मार्गावर चालायला लागले.
गुरू ओशो रजनीश (Osho) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अध्यात्माचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांचा मुलगा अक्षय खन्ना त्यावेळी पाच वर्षांचा होता. संन्यास घेण्याच्या अनपेक्षित निर्णयामुळे कौटुंबिक आयुष्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुलांना काही समजतही नव्हते, अशावेळी ते कुटुंबाला एकटं सोडून ओशो आश्रमात राहिले. १९८२ मध्ये ते रजनीश आश्रमात जाऊन संन्यासी झाले. विनोद खन्नांनी ओशोंचे शिष्यत्व पत्करल्यानंतर ते बॉलिवूडपासून दुरावले होते.
कुटुंबाला एकटं सोडून विनोद खन्ना संन्यासी बनले होते. त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर त्यांचा मुलगा अक्षय खन्नाने त्यामागचे कारण सांगितले होते. विनोद खन्ना यांना अध्यात्माबद्दल आसक्ती निर्माण झाली होती. अशातच गुरू रजनीश ओशोंच्या विचारांनी ते प्रभावित झाले. गुरू ओशोंचा शिष्य होण्याच्या तीव्र इच्छेनेच त्यांनी संन्यास पत्करला आणि आश्रमवासी झाले.
पहिल्या पत्नीपासून त्यांना अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन मुलं आहेत. यानंतर १९९० मध्ये विनोद यांनी कवितासोबत दुसरे लग्न केले होते. या दोघांना साक्षी आणि श्रद्धा अशी दोन मुले आहेत. पुढे अजून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येते ती म्हणजे त्यांचा मुलगा साक्षीबद्दलची. साक्षी देखील आता ओशोंचा शिष्य बनला असल्याचे समोर आले आहे.
चित्रपटसृष्टीमधून अशाप्रकारे एक्झीट घेऊन संन्यास पत्करण्याचा विनोद खन्ना यांच्या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना दु:ख जरी झाले असले तरी खन्ना यांचा संतमार्गासारख्या अध्यात्माच्या वाटेवर जाण्याचा निर्णय चाहत्यांनी हळूहळू स्वीकारला!
शब्दांकन- शामल भंडारे