विरासत: दिलीपकुमारने नाकारला पण प्रेक्षकांनी स्वीकारला !
१९९७ साली ‘ विरासत’ (Virasat) या चित्रपटाने क्लास आणि मास या दोन्ही क्षेत्रातील रसिकांना खूष करून टाकले होते. एक जबरदस्त फिल्म बनली होती. हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. चित्रपटाची कथा कमल हसन यांनी लिहिली होती. त्यांनी स्वतः या तमिळ चित्रपटात भूमिका केली होती. मूळ तमिळ चित्रपटाचे नाव थेवर मगन होते. या तमिळ चित्रपटांमध्ये कमल हसनच्या वडिलांची भूमिका शिवाजी गणेशन या बुजुर्ग अभिनेत्याने केली होती. या चित्रपटाला इलाया राजा यांचे सुमधुर संगीत होते.
‘विरासत’ (Virasat) या चित्रपटाने भरपूर पारितोषिक मिळवली होती. राष्ट्रीय पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाला. जेव्हा तमिळ सिनेमाचा रिमेक हिंदी मध्ये करण्याचा विचार कमल हसन यांनी केला तेव्हा त्याने मूळ तमिळ चित्रपटातील वडिलांची भूमिका दिलीप कुमार यांनी करावी अशी इच्छा व्यक्त केली.
दिलीप कुमार आणि त्यांचा मुलगा कमला हसन हे कॉम्बिनेशन खरंतर खूप ग्रेट बनलं असतं; पण दिलीप कुमार यांनी चित्रपटात काम करायला असमर्थता दर्शवली. कारण त्यांनी त्यावेळेला बऱ्यापैकी रिटायरमेंट घेतली होती. दिलीप कुमार यांनी नकार दिल्यानंतर कमल हसन
यांचा हा चित्रपट हिंदीत बनवण्याचा इंटरेस्ट संपला. नंतर त्यांनी या चित्रपटाचे रिमेक करायचे हक्क मुशीर रियाज यांच्याकडे दिले. निर्माते मुशीर रियाझ यांनी या चित्रपटात ‘लाडला’(१९९४) या हिट चित्रपटाची टीम रिपीट करायचे ठरवले. अनिल कपूर, श्रीदेवी आणि रविना टंडन! पण श्रीदेवी आणि रवीना या दोघी त्या काळात प्रचंड बिझी असल्यामुळे त्यांनी या चित्रपटात काम करायला असमर्थाला दर्शवाली. त्यामुळे हा प्रोजेक्ट मागे पडतो की काय असं वाटू लागले.
दरम्यानच्या काळात मूळ तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक भारतन यांनीच या चित्रपटातील दिग्दर्शन करावे असे देखील ठरले. भारतन यांनी अनिल कपूरच्या वडिलांची दमदार भूमिका राजकुमार या हिंदी सिनेमातील जेष्ठ कलाकाराने करावीअशी इच्छा व्यक्त केली. पण नंतर काही कारणाने भारतन स्वत:च या सिनेमातून बाहेर पडले नंतर या सिनेमाचे दिग्दर्शन जेपी दत्ता करणार असे ठरले. पण जेपी दत्ता आणि राजकुमार यांच्यातील बोलणे फिसकटल्याने राजकुमार या सिनेमातून दूर झाले. जेपी दत्ता त्यावेळी त्यांच्या महत्त्वकांशी ‘बॉर्डर’ सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त होते.
नंतर मुशीर रियाज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट यांनी करावे असे सुचवले. महेश भट यांनी होकार दिला पण नायिकेची भूमिका त्यांची मुलगी पूजा भट करेल असे सांगितले .त्याच प्रमाणे सिनेमाचे संवाद जावेद अख्तर लिहितील असे देखील सांगितले. पण पुन्हा निर्माता दिग्दर्शक यांच्यात काही वाद झाल्यामुळे महेश भट या सिनेमा पासून दूर झाले! आणि तिथे फायनली दिग्दर्शक प्रियदर्शन यांची वर्णी लागली. प्रियदर्शन यांनी यापूर्वी हिंदीमध्ये ‘मुस्कुराहट’ आणि ‘गर्दीश’ हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते. दोन्ही चित्रपटांना फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘विरासत’ हा सिनेमा त्यांनी तब्येतीने बनवायचे ठरवले.
अनिल कपूरच्या वडिलांची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अमरीश पुरी यांना दिली. अमरीश पुरी यांनी या सिनेमात अतिशय सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले. हा चित्रपट १९९६ साली पूर्ण झाला. आणि ३० मे १९९७ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला रसिकांनी गर्दी केली. या सिनेमात तब्बू आणि पूजा बात्रा यांनी नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. पूजा बात्रा हिचा आवाज पद्मिनी कोल्हापुरे यांनी डब केला होता. जुही चावला देखील या सिनेमासाठी इंटरेस्टेड होते अशी पण बातमी होती.
हे देखील वाचा : एका कुलीने मारलेल्या हाकेमुळे मिथुनचा आत्मविश्वास वाढला
अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा सिनेमा ठरला. या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. ‘पायली छुन मून छुन मून’ या चित्रा यांनी गायलेल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गंमत म्हणजे याच गाण्याच्या तमिळ व्हर्शन ला देखील त्याकाळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता! या चित्रपटाला अनु मलिक आणि एस पी वेंकटेश यांनी संगीत दिले होते. यातील सर्वच गाणी जबरदस्त होती. ढोल बजने लगा, तारे है बाराती हि गाणी मस्त जमली होती.
विरासत (Virasat) या चित्रपटाला फिल्मफेअरचे तब्बल १५ नामांकन मिळाली होती त्यापैकी सात पारितोषिके या सिनेमाला मिळाली सर्वोत्कृष्ट नायक (अनिल कपूर) सर्वोत्कृष्ट नायिका (तब्बू ) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (अमरीश पुरी) सर्वोत्कृष्ट खलनायक (मिलिंद गुणाजी) सर्वोत्कृष्ट कथानक (कमल हासन) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (रवि चंद्रन) सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन (फराह खान) आज विरासत प्रदर्शित होवून २५ वर्षे झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनात अजून ताजा आहे!