Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

‘साधना’ चित्रपटासाठी Vyjayanthimala यांनी रात्री १२ वाजता सही का केली होती?
गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांनी आपली अमिट छाप उमटवली आहे… त्यापैकीच एक म्हणजे उत्कृष्ट नृत्यांगना आणि अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंतीमाला बाली ( Vyjayanthimala)… आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास आणि काही अनोखे किस्से…

१३ ऑगस्ट १९३६ रोजी तामिळनाडूतील एका गावात तामिळ अय्यंगर ब्राह्मण कुटुंबात वैजयंती माला यांचा जन्म झाला. त्यांची आई वसुंधरा देवी यादेखील ४०च्या दशकातील तामिळ अभिनेत्री. वैजयंती यांनी अगदी लहानपणापासून भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. एकीकडे नृत्याचे धडे घेत असताना, दुसरीकडे वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी १९४९ साली त्यांनी ‘वाकझाई’ या तामिळ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीचा प्रवास सुरु केला. त्यानंतर १९५० साली ‘जीविथम’ या तेलुगू आणि त्याच वर्षात ‘विजयाकुमारी’ या तामिळ चित्रपटात त्यांनी काम केले. तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून नावारुपास आल्यानंतर त्यांची पावलं हिंदी चित्रपसृष्टीकडे वळली.

१९५१ वैजयंती यांनी ‘बहार’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे ‘देवदास’, ‘नागिन’, ‘आम्रपाली’, ‘मधुमती’, ‘नया दौर’, ‘संगम’, ‘लीडर’, ‘ज्वेल थीफ’, ‘गंगा जमुना’, ‘जिंदगी’ व ‘साधना’ हे वैजयंती माला यांचे काही गाजलेले चित्रपट. ‘देवदास’ या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली…वैजयंती माला यांनी १९६४ साली आलेल्या ‘लीडर’ आणि ‘संगम’ या दोन हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी कॉरिओग्राफी केली होती. तसेच १९६७ साली वैजयंती यांनी ‘हतै बजारे’ या बंगाली चित्रपटासाठी मृणाल चक्रवर्ती यांच्या सोबतीने बंगाली भाषेत पार्श्वगायन केले होते. याशिवाय १९८२ साली एका तामिळ चित्रपटाची सहनिर्मितीदेखील त्यांनी केली होती. कलाविश्वातील प्रत्येक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिल्यानंतर १९७० साली ‘गनवार’ या हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर वैजयंती माला यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली.
================================
हे देखील वाचा : Sholay हीट झाला आणि इंडस्ट्रीच बदलली…
=================================
वैजयंती माला यांनी अनेक हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या. त्यांचा गाजलेला एक चित्रपट म्हणजे ‘साधना.’ या चित्रपटाची एक खास गोष्ट आहे. पंडित मुखराम शर्मा यांच्या कथानकावर आधारित अनेक हिंदी चित्रपट त्याकाळी मोठ्या पडद्यावर येत होते. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी ‘साधना’ चित्रपटाचे कथानक ऐकले आणि यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.. सुरुवातीला या चित्रपटात भारत भूषण आणि मधुबाला यांनी अभिनय करावा, अशी शर्मा यांची इच्छा होती. परंतु, चोप्रा यांना दिलीप कुमार आणि निम्मी यांनी चित्रपटात काम करावं अशी इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव अभिनेत्री निम्मीदेखील या चित्रपटातून बाद झाल्या आणि वैजयंती माला यांचा विचार या भूमिकेसाठी करण्यात आला.

चोप्रा यांनी वैजयंतींची भेट घेत, त्यांना चित्रपटाचे कथानक ऐकवले आणि त्यांनी लागलीच होकार कळवला. पण, चित्रपट करण्यापूर्वी त्यांनी एक अट घातली. ती अट अशी होती की, “या चित्रपटाच्या कागदपत्रांवर मी माझ्या घरातील इष्टदेवतांसमोर रात्री १२ वाजता सही करेन”. याचे कारण चोप्रा यांनी विचारले असता वैजयंती म्हणाल्या की, “मला हिंदी चित्रपसृष्टीत येऊन सात-आठ वर्षं झाली, आजवर मला नृत्यांगना असल्यामुळे त्याच पद्धतीच्या भूमिका मिळाल्या. परंतु, या चित्रपटातील भूमिका माझ्यातील अभिनय कलागुणांना पाहून मिळाली आहे, याचा मला आनंद आहे आणि त्याचमुळे माझ्या गुरुंनी मला सांगितल्याप्रमाणे मी देवासमोर सही करण्याचा प्रस्ताव तुमच्यासमोर मांडला.” त्यानंतर वैजयंती यांच्या या श्रद्धेचा मान ठेवून, चोप्रा यांनी ती अट मान्य केली आणि ‘साधना’ चित्रपटात वैजयंती माला झळकल्या.
================================
हे देखील वाचा : Uma Devi : बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडी क्वीनचं वेदनादायी आयुष्य….
=================================
बरं, ६०च्या दशकात अभिनेत्री चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना बऱ्याच मर्यादा पाळत असत… पण याच काळात वैजयंती माला यांनी धाडसाने राज कपूर यांच्या ‘संगम’ या चित्रपटात स्विमसूट परिधान केला होता… Ahed Of Time असणाऱ्या वैजयंती माला यांचं नृत्यावर नितांत प्रेम आहे… आजही वयाच्यी नव्वदी पार केली असली तरी त्या नृत्य करतात… त्यामुळे आपल्या नृत्य आणि अभनिय कौशल्याने भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या वैजयंती माला यांना कलाकृती मीडियातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi