राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali चा भावूक अनुभव !
Star Pravah च्या ‘माऊली महाराष्ट्राची’ या भक्तिपर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा अनुभव मिळतोय. पण फक्त प्रेक्षकच नाही, तर स्टार प्रवाहचे कलाकारसुद्धा प्रत्यक्ष वारीत सहभागी होत आहेत आणि त्या प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयात साठवत आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता अमित भानुशाली यंदा स्वतः वारीचा भाग बनला आणि तो अनुभव त्याच्या शब्दांत मांडताना तो स्वतःही भावूक झाला. (Actor Amit Bhanushali)

“वारीचं नाव घेतलं की अंगावर रोमांच उभे राहतात,” असं सांगत तो म्हणतो , “पंढरपूरची वारी ही केवळ चालण्याची यात्रा नाही… ती आत्म्याच्या शोधाची, भक्तीच्या एकतानतेची आणि माणसाच्या खर्या ओळखीची यात्रा आहे. शरीर चालतं, पण पोहोचतं ते थेट हृदयाच्या गाभाऱ्यात.” वारीची सुरुवात झाली ती आळंदीहून, त्या पवित्र भूमीतून, जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. त्या मातीशी त्याचं जुने नातं आहे. “लहानपणी आळंदीत दरवर्षी जायचो… ती माझ्यासाठी दुसरं घरच होतं,” असं सांगताना त्याच्या आवाजात नकळत ओलावा जाणवतो. “त्या गल्ल्यांतून अनवाणी फिरणं, समाधीसमोर शांत बसणं, पायऱ्यांवर पूजापाठ करणं , सगळं मनात कोरलं गेलं होतं. पण मोठं होताना, करिअरच्या धावपळीत आळंदी मागे पडली… आणि माऊलीही जणू दूर गेली.”

पण यंदा, ‘माऊली महाराष्ट्राची’ निमित्ताने पुन्हा एकदा आळंदीचं वासरं झालं. “त्या मंदिरात पाय ठेवताच असं काहीसं जाणवलं, जे शब्दांपलीकडचं होतं. अंगावर काटा आला. आणि अचानक जाणवलं की माऊली म्हणाली असावी, ‘किती वर्षं झाली बाळा, तू आलाच नाहीस… पण मी वाट बघत होते!’” डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, गर्दीत असूनही फक्त विठोबा दिसत होता. (Actor Amit Bhanushali)
==============================
==============================
वारीच्या वाटेवर हजारो वारकरी, टाळ-मृदंगाचा नाद, आभाळातल्या पावसाचा शिडकावा, चिखलात भिजलेले पाय, पण अमित म्हणतो, “त्या क्षणी कोणताही त्रास जाणवत नव्हता. वाटेत चालत होतो, पण थकत नव्हतो. जणू प्रत्येक पावसाचा थेंब विठोबाचं आशीर्वाद बनून अंगावर पडत होता.”हातात वीणा, मुखात ‘विठ्ठल विठ्ठल’चा अखंड गजर आणि मन – ते तर हरवून गेलं होतं त्या एकतानतेत. “वारीमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवते,” तो सांगतो, “इथे कोणी अभिनेता, डॉक्टर, अधिकारी, किंवा उद्योगपती नाही… इथे सगळे एकसमान – सगळे फक्त ‘वारकरी’. इथे माणसाची खरी ओळख उरते – भक्त!” वारीचा हा अनुभव अमितसाठी केवळ भक्तीचा नव्हता , तो होता एका हरवलेल्या नात्याचा पुन्हा गवसलेला स्पर्श. “अशा निर्मळ, प्रेममय आणि शुद्ध अनुभवाचं भारावलेपण मी कधीच अनुभवलं नव्हतं,” तो शेवटी नम्रपणे म्हणतो.