‘या’ सिनेमामुळे सुचित्रा सेन यांचा घटस्फोट झाला होता का?
चित्रपट निर्मितीच्या दरम्यान असे अनेक किस्से घडतात की ज्यामुळे चित्रपट जरी विस्मृतीत गेला असला तरी त्या दरम्यान घडलेल्या काही गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांच्याबाबत असाच एक प्रसंग घडला होता जो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिला. १९६० साली राज खोसला यांनी ‘बंबई का बाबू’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सुरुवातीला या चित्रपटाचे स्टार कास्ट देवानंद आणि मधुबाला अशी होती. परंतु मधुबालाची प्रकृती त्या काळात बिघडल्याने तिने हा चित्रपट सोडला आणि तिच्या जागी मग सुचित्रा सेन यांची वर्णी लागली. या चित्रपटाचे शूटिंग कुलू मनाली येथे होत होते. (Suchitra Sen)
सिनेमाचे जवळपास ९०% शूट पूर्ण झाले होते. आता उरलेले शूटिंग मुंबईत करायचे राज खोसला यांनी ठरवले. कुलू मधील शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्या रात्री राज खोसला यांनी आपल्या सर्व ग्रुप मेंबर्सला एक शानदार पार्टी देण्याचे ठरवले. त्या रात्री सर्व क्रू मेंबर्स एकत्र आले आणि मोठ्या जल्लोषात पार्टी सुरू झाली. अभिनेत्री सुचित्रा सेन (Suchitra Sen) आपल्या पती सोबत शूटिंगला आली होती. ती आणि तिचे पती मात्र या पार्टीमध्ये सामील झाले नाही. ते त्यांच्या रूम मध्ये जाऊन आराम करू लागले. परंतु पार्टी मधील मोठमोठ्या आवाजाने त्यांना खूप डिस्टर्ब होत होते.
मिस्टर सेन यांनी बाहेर येऊन राज खोसलांना सांगितले ,”पार्टीतील हा आवाज कमी करा. आम्हाला शांतता हवी आहे.” त्यावर राज खोसला यांनी सेन यांना सॉरी म्हटले आणि पार्टीतील लोकांनादेखील आवाज कमी करायला सांगितले. पण हि शांतता काही काळच राहिली. पुन्हा पार्टीचा शोर गुल सुरु झाला. गोंधळ,आवाज काही कमी होत नव्हता. तेव्हा सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांचे यांचे पती खूपच चिडले आणि ते बाहेरू येवून राज खोसला यांना जोरजोरात बोलून सांगू लागले. लोकांचा पार्टीचा मूड होता. दोन्हीकडून आवाज वाढत गेले आणि शेवटी सुचित्रा सेन आणि त्यांचे पती मध्यरात्री हॉटेलमधून बाहेर पडले आणि थेट कलकत्ताला निघून गेले. जाताना सुचित्रा सेन यांचे पती रागारागात राज खोसला यांना म्हणाले,”आता तुमचा चित्रपट कसा पूर्ण होतो तेच मी बघतो!” (Suchitra Sen)
सिनेमाची संपूर्ण टीम नंतर मुंबईला परत आली. आता चित्रपटातील फक्त एका गाण्याचे शूटिंग बाकी होते. ‘चल री सजनी अब क्या सोचे…’ या गाण्यासाठी पुन्हा एकदा सुचित्रा सेन यांची गरज होती. राज खोसला यांनी टेलिग्राम करून सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांना तसेच सांगितले. पण सुचित्रा सेन यांच्या पतीने आता मुंबईला जायचा विरोध केला आणि उलट टपाली “आता तुम्ही दुसरी हीरोइन बघा!” असे सांगितले. चित्रपटाचे जवळपास नव्वद टक्के शूटिंग झाले होते. आता नवीन हीरोइन कशी शोधणार?
शेवटी राज खोसला यांनी आयडिया केली. त्यांनी एका दुसऱ्या मुलीला घुंघट घेवून उभे करायचे ठरवले. शॉट लग्नाचा होता त्यामुळे घुंघट घेऊन शूटिंग पूर्ण करणे अवघड नव्हते. पण ही बातमी सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांना कलकत्ता येथे कळाली. राज खोसला यांच्याशी त्यांच्या पतीचे भांडण झाले होते. सुचित्रा यांचा काही संबध नव्हता. तिने ताबडतोब फ्लाईटने मुंबईला गाठली आणि थेट सेटवर अवतरली! तिने त्या गाण्याच्या शूटमध्ये भाग घेतला. चित्रपट पूर्ण झाला. गाणी चालली पण सिनेमा पडला.
================
हे देखील वाचा : मुसाफीर : ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट!
================
पण इकडे कलकत्त्याला मिस्टर सेन प्रचंड संतापले. त्यांचा पुरुषी इगो दुखावला. त्यांना सुचित्रा सेन (Suchitra Sen)यांची ही कृती अजिबात आवडली नाही. त्या दोघांमध्ये इथून मतभेदाला सुरूवात झाली आणि असे म्हणतात याच कारणामुळे त्या दोघांचा १९६३ साली घटस्फोट देखील झाला. घटस्फोटाचं नेमकं हेच कारण होतं की नाही माहीत नाही पण अनेक कारणांपैकी हे कारण नक्की असावं. (Suchitra Sen)
जाता जाता: ‘बंबई का बाबू’ हा सिनेमा ओ हेन्री यांच्या ‘अ डबल डाइड डीसिव्हर’ वर बेतला होता. १९७५ सालचा अमिताभ-सायरा अभिनीत बी.आर.चोप्रा यांचा ‘जमीर; याच कथानकावर आधारीत होता.तो देखील फ्लॉप झाला.