
Welcome To The Jungle : तब्बल 20 वर्षानंतर एकत्र; ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज केलेल्या सिनेमाचा टीझरमध्ये दिसली झलक !
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) याने यंदाच्या ख्रिसमसला आपल्या चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. नाताळच्या शुभमुहूर्तावर त्याने आपल्या आगामी बहुचर्चित चित्रपटाचा, ‘वेलकम 3’ अर्थात ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. या टीझरसोबतच संपूर्ण स्टारकास्टने प्रेक्षकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत, हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. इतक्या मोठ्या कलाकारांच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना अक्षय कुमारने सांगितलं की, आजवरच्या कारकिर्दीत तो कधीच एवढ्या मोठ्या टीमचा भाग राहिलेला नाही. “फक्त मीच नाही, आमच्यापैकी कुणीही इतक्या भव्य टीमसोबत काम केलं नसेल,” असं म्हणत त्याने हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक खास गिफ्ट असल्याचंही स्पष्ट केलं.(Welcome To The Jungle Teaser)

या सिनेमाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे जवळपास दोन दशकांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन (Raveena Tondan) पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 1990 च्या दशकात या जोडीने अनेक गाजलेले चित्रपट दिले होते आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे या जोडीच्या पुनरागमनाने जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. टीझरमध्ये रवीना टंडन पारंपरिक अंदाजात दिसत असून अक्षय कुमार दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकतोय. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. इतक्या वर्षांनंतर रवीना आणि अक्षय पुन्हा एकत्र दिसणार असल्याने, त्यांच्या भूमिका नेमक्या कशा असतील याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमात सुनील शेट्टी, अरशद वारसी, परेश रावल, दिशा पाटनी, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, पुनीत इस्सर यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांचा समावेश आहे. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून तो आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. (Welcome To The Jungle Teaser)
===========================================
===========================================
एकूणच, मोठी स्टारकास्ट, जुनी हिट जोडी आणि विनोदी-अॅक्शनचा तडका यामुळे ‘वेलकम 3’ (Welcome 3) प्रेक्षकांसाठी एक धमाकेदार अनुभव ठरण्याची शक्यता आहे. आता फक्त 2026 ची वाट पाहावी लागणार आहे.