‘आराधना’च्या यशात गुलशन नंदा यांचे क्रेडिट काय होते?
दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा आराधना हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील एक माईल स्टोन सिनेमा होता या सिनेमाने भारताला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना मिळवून दिला. तसेच पार्श्वगायक किशोर कुमारचा जमाना या चित्रपटापासून सुरू झाला. रोमँटिक चित्रपटाची नवी लाट या सिनेमापासून सुरू झाली. दिलीप- राज- देव या सदाबहार त्रिकुटाच्या नंतर राजेश खन्नाचा झंजावात सुरू झाला. अनेक अर्थाने ‘आराधना’ हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण असा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की ‘आराधना’ हा चित्रपट एका क्षणी आपण बनवू नये या मनस्थितीमध्ये दिग्दर्शक शक्ती सामंत आले होते! त्यांनी जवळपास हा चित्रपट पॅक अप करून टाकण्याची तयारी केली होती. पण अशा वेळी एक देवदूत त्यांना भेटला आणि सर्व काही व्यवस्थित झाले. शक्ती सामंत यांनी पुन्हा या चित्रपटाची नव्याने आखणी केली. आणि चित्रीकरण सुरू झाले. कोण होता तो देव दूत आणि काय झाले होते नक्की ? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. (Aradhana)
‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’ (१९६७) या चित्रपटाच्या नंतर शक्ती सामंत शर्मिला टागोरला घेऊन नवीन सिनेमाची आखणी करत होते. सचिन भौमिक यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. चित्रपटाचा नायक म्हणून त्यांनी राजेश खन्नाला घेतले होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती . याच काळात शक्ती सामंत यांना सुरेंद्र कपूर यांनी आपल्या नव्या सिनेमाच्या ट्रायल पाहण्या साठी बोलवले. चित्रपट होता ‘एक श्रीमान एक श्रीमती’ या चित्रपटाची ट्रायल पाहिल्यानंतर शक्ती सामंत यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांच्या आगामी ‘आराधना’ या चित्रपटाचा आणि ‘एक श्रीमान एक श्रीमती’ या सिनेमाचा क्लायमॅक्स तंतोतंत सारखा होता ! (Aradhana)
याचे कारण होते या दोन्ही सिनेमाची कथा पटकथा सचिन भौमिक यांनी लिहिलेली होती. शक्ती सामंत प्रचंड नाराज झाले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी हा आराधना चित्रपट बंद करण्याचा मनोमन निर्णय घेतला. ते खूपच डिप्रेशन मध्ये गेले होते कारण त्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण दुसऱ्या दिवशी एक चांगली घटना घडली. त्यांना भेटायला लेखक गुलशन नंदा आले. ते त्यांची एक कथा डिस्कस करण्यासाठी आले होते. गुलशन नंदा यांनी शक्ती सामंत यांना नाराज बघितल्यानंतर त्यांनी त्यांची विचारपूस केली. शक्ती सामंत यांनी कालचा संपूर्ण इन्सिडन्स त्यांना सांगितला. सुरुवातीला गुलशन नंदा म्हणाले ,” असं असेल तर तुम्ही हा चित्रपट बनवू नका. मी एक नवीन कथा तुम्हाला ऐकवतो.” असे म्हणून त्यांनी एक नवे कथानक त्यांना ऐकवले पण ही कथा ऐकवता ऐकवता गुलशन नंदा यांचे असे लक्षात आले की ‘आराधना’ चे जे कथानक आहे त्याला जर आपण ट्विस्ट दिला तर तो एक चांगल्या पद्धतीने चित्रपट होऊ शकतो.(Aradhana)
नवीन सांगत असलेली कथा त्यांनी बाजूला ठेवून ‘आराधना’ च्या कथेला एक ट्विस्ट द्यायचे ठरवले. त्यांनी शक्ती सामंत यांना सांगितले की,” तुमच्या चित्रपटाचा नायक मध्यंतरापूर्वी मारतो. मध्यंतरानंतर तुम्ही त्याच नायकाला मुलाच्या भूमिकेमध्ये दाखवा म्हणजे बाप आणि मुलगा हा डबल रोल होईल आणि कहाणी ला वेगळा अँगल येईल. वेगळे वेटेज प्राप्त होईल!” शक्ती सामंत यांना हा बदल खूप आवडला. आणि त्यांनी चित्रपट बनवायचे पुन्हा ठरवले. चित्रपटावर पुन्हा एकदा काम सुरू झाले आता सचिन भौमिक त्यांच्यासोबत गुलशन नंदा देखील त्यांच्या मदतीला आले. (Aradhana)
===========
हे देखील वाचा : सत्यजित रे ‘हा’ चित्रपट काढताना कन्फ्युज होते ?
===========
त्याचप्रमाणे मधुसूदन कालेलकर यांनी देखील या कामी भरपूर मदत केली. सर्वांच्या मेहनतीचे फळ दिसून आले. ‘आराधना’ हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला. त्या दिवशी गुलशन नंदा जर शक्ती सामंत यांच्याकडे आले नसते तर कदाचित शक्तिदांनी आराधना हा चित्रपट काढलाच नसता! मग राजेश खन्नाचे काय झाले असते ?? याच जर तर मध्ये खूप गंमत असते. गुलशन नंदा त्या दिवशी जी स्टोरी शक्ती सामंत यांना सांगायला आले होते त्यावर नंतर शक्ती सामंत यांनी नंतर चित्रपट बनवला. तो चित्रपट होता ‘कटी पतंग’!