जेव्हा देव आनंद ‘मदर इंडिया’ चित्रपटाची तिकिटे ब्लॅक करतो!
देव आनंदचा धाकटा भाऊ विजय आनंद तथा गोल्डी हा एक जबरदस्त बॉलीवूड डायरेक्टर होता. त्याची सिनेमा दिग्दर्शित करण्याचे स्टाईल अफलातून होती. गाण्याची पिक्चरायजेशन करण्याची शैली अनोखी होती. तो स्क्रीन प्ले स्वतः लिहीत असल्यामुळे त्याच्या सिनेमावर त्याची अविट छाप पडलेली असायची. त्यामुळेच गाईड असेल, जॉनी मेरा नाम असेल किंवा ब्लॅक मेल, राम बलराम हे चित्रपट असतील आज देखील आपल्याला त्यातील वेगळेपणामुळे लक्षात राहतात. गोल्डीने पन्नासच्या दशकात एक चित्रपट दिग्दर्शित केला होता हा चित्रपट नव्हता, चित्रपटाचे नाव होतं ‘काला बाजार’(Kala Bazar). हा त्याचा दिग्दर्शनातील दुसरा चित्रपट होता. याआधी त्याने तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९५७ साली ‘नौ दो ग्यारह’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘काला बाजार’ (Kala Bazar) (१९८०) हा चित्रपट त्याकाळी खूप लोकप्रिय ठरला होता. देव आनंद आणि वहिदा रहमान यांच्या या चित्रपटात प्रमुख होत्या. या सिनेमांमध्ये गोल्डी विजय आनंदने महबूब यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाचा प्रीमियर दाखवला होता. ‘काला बाजार’ चित्रपटाचा नायक रघुवीर (देव आनंद) या ‘मदर इंडिया’ चित्रपटाचे तिकीट ब्लॅक करतो असे त्याला दाखवायचे होते.
‘काला बाजार’ (Kala Bazar) चित्रपटात मदर इंडिया चित्रपटाचा प्रीमियर पाहायला मिळणं हा प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का होता. तो पर्यंत हा प्रीमियर प्रेक्षकांना कुठे पाहता येत नसे. कारण तेव्हा टीव्ही नव्हता, सोशल मिडिया नव्हता. या प्रीमियरचे काही फोटोज वेगवेगळ्या चित्रपट मासिकांमधून येत असत. पण त्याचा व्हिडिओ शक्यतो पाहायला मिळतच नसायचा. गोल्डीच्या या अफलातून आयडियामुळे ‘मदर इंडिया’ चित्रपटाचा प्रीमियर ‘कालाबाजार’ या चित्रपटात दाखवला गेला. हे नेमके सुचले कसे?
जेव्हा त्यांनी ‘काला बाजार’ (Kala Bazar) या चित्रपटाचा विचार करायला सुरुवात केली. त्याच वेळेला त्यांनी एखाद्या गाजलेल्या सिनेमाच्या तिकिटाचे ब्लॅक करताना नायकाला दाखवायचे ठरवले होते आणि योगायोगाने त्याच काळामध्ये मदर इंडिया या चित्रपटाचा प्रीमियर होता. देव आनंद यांनी महबूब यांची ऑफिशियल परवानगी घेऊन या प्रीमियरच्या संपूर्ण शूट केला आणि तो आपल्याकडे ठेवला. नंतर दोन वर्षांनी जेव्हा ‘काला बाजार’ या चित्रपटाची शूटिंग सुरू केले तेव्हा या प्रीमियरच्या फुटेजचा त्यात वापर केला. हे सिंक्रोनायजेशन भन्नाट जमले होते. देव आनंद यात या सिनेमाचे तिकिटे ब्लॅक करतो असे दाखवले !
या प्रीमियरच्या वेळी तुम्हाला बॉलीवूडमधील अनेक कलावंत दिसतात. लता मंगेशकर कॅमेरा टाळत टाळत पांढऱ्या शुभ्र साडीत आपल्या कारमधून पळत पळत आत जाताना दिसतात. सोहराब मोदी दिसतात. मेहबूब, राजेंद्रकुमार, नर्गीस, सुनील दत्त, राजकुमार दिसतात. किशोर कुमार, रूमा घोष दिसतात. एका सिनेमात दुसऱ्या एका सिनेमाचा प्रीमियर दाखवण्याची भन्नाट आयडीया प्रेक्षकाना खूप आवडली.
देव आनंदला मेहबूब यांनी परवानगी कशी दिली असा प्रश्न अनेकाना पडला होता. परंतु देव आनंद आणि मेहबूब यांनी एकत्र एकही चित्रपट केला नसला तरी दोघांची खूप चांगली मैत्री होती. देव यांच्या नवकेतन या चित्रपटसंस्थेचे ऑफिसच मुळी मेहबूब स्टुडिओमध्ये होते. स्टुडीओमधील एक ग्रीन रूम त्यांनी देव आनंदसाठी दिली होती. त्या वेळी व्यावसायिक स्पर्धा नक्की होती पण परस्परांच्या कलेचा आदर होता. निरोगी स्पर्धा होती.
========
हे देखील वाचा : चंकी पांडे बनला बांगला देशाचा सुपरस्टार अमिताभ बच्चन !
========
९ सप्टेंबर १९६० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘काला बाजार’ (Kala Bazar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त बिजनेस केला. गंमत म्हणजे एक महिन्यापूर्वीच (५ ऑगस्ट १९६०) प्रदर्शित झालेल्या ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटाला देखील ‘काला बाजार’ने चांगली टक्कर दिली. या चित्रपटात चेतन आनंद, विजय आनंद आणि देव आनंद या तीन आनंद बंधूनी एकत्र काम केले. होते लता मंगेशकर त्या काळात सचिन देव बर्मनसोबत गाणे गात नसे त्यामुळे या चित्रपटातील गाणी आशा भोसले, गीता दत्त यांनी गायली होती.