‘या’ कारणासाठी लताजींनी हेमामालिनीसाठी पार्श्वगायन करायला नकार दिला होता.
हेमामालिनी म्हणजे बॉलिवूड मधली ड्रिमगर्ल. १९६८ साली ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटाद्वारे हेमामालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिचा नायक होता शो मॅन राज कपूर. हा चित्रपट आला तेव्हा हेमामालिनीने फक्त २० वर्षांची होती, तर राज कपूर यांचे वय होते ४४, म्हणजे तब्बल २४ वर्षांनी मोठा नायक! अर्थात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला पण, हेमामालिनीच्या रूपाने बॉलीवूडला ‘ड्रीमगर्ल’ सापडली.
‘भरतनाट्यम’ मध्ये विशारद असणाऱ्या हेमामालिनीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात प्रादेशिक चित्रपटांपासून केली होती. सन १९६३ साली आलेल्या ‘इधू साथियम’ नावाच्या तमिळ चित्रपटातून तिने नृत्यांगना म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
तिच्या कारकिर्दीची सुरुवात काही फारशी आकर्षक नव्हती. सन १९६४ साली तमिळ चित्रपट दिग्दर्शक, सी.व्ही.श्रीधर यांनी तिला आपल्या चित्रपटामध्ये घेण्यास नकार दिला होता. कारण हेमाला अभिनय जमत नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं.
बॉलिवूडमध्येही तिचा पहिला चित्रपट अपयशी झाला असला, तरी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविण्यात ती यशस्वी झाली होती. त्या काळातल्या अनेक टॉपच्या अभिनेत्यांसोबत तिला काम करायची संधी मिळाली. यामध्ये धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, संजीव कुमार, अमिताभ बच्चन या नायकांसोबतची तिची जोडी लोकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
हेमामालीनीने ही एकमेव अभिनेत्री आहे जिने पडद्यावर कपूर खानदानातील ‘पाच’ कपूरांसोबत काम केलं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला राज कपूर (सपनो का सौदागर), १९७१ मध्ये शम्मी कपूर (अंदाज) केले, १९७४ मध्ये रणधीर कपूर (हाथ की सफाई) १९७८ मध्ये शशी कपूर (त्रिशूल) तर, १९८६ मध्ये ऋषी कपूर (एक चादर मैली सी) सोबत तिने काम केलं आहे.
हेमामालिनी त्या काळातील ‘हायस्ट पेड ॲक्टरेस’ मानली जात असे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या स्वप्नसुंदरीने कित्येकांना घायाळ केले होते. बॉलिवूडमधले तीन प्रमुख अभिनेतेही तिच्या प्रेमात पडले होते. जितेंद्र आणि संजीव कपूरसारखे नायकही तिच्या होकाराची आतुरतेने वाट बघत होते. परंतु, हेमामालिनीने अगोदरच विवाहित असणाऱ्या धर्मेंद्रची निवड केली.
हेमामालीनीने आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच वेगळे ठेवले होते. तिचं सौंदर्य, तिचा अभिनय याचप्रमाणे तिचा इंडस्ट्रीमधला वावरही अगदी सहजसुंदर होता. तर अशा या गोड हेमामालिनीसाठी पार्श्वगायन करायला लता दीदींनी चक्क नकार दिला होता.
लता मंगेशकर म्हणजे साक्षात स्वरसम्राज्ञी तर, हेमामालिनी म्हणजे स्वप्नसुंदरी. हेमामालिनीच्या कित्येक समकालीन, ज्युनिअर व सिनिअर अभिनेत्रींनसाठी लता दीदींनी पार्श्वगायन केलं होतं. खुद्द हेमामालिनीसाठीही लता दीदींनी अनेक गाणी गेली आहेत. परंतु, हेमामालिनीच्या ‘मीरा (१९७९) या चित्रपटासाठी पार्श्वगायन करायला लता दीदींनी नकार दिला.
====
हे ही वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…
====
मीरा हा चित्रपट संत मीराबाईंच्या जीवनावर आधारित होता. हेमामालिनीला ‘मीरा’ मधील गाण्यासाठी लता दीदींचाच आवाज हवा होता. तिने लताजींना भेटून तसा आग्रहही केला. परंतु, लताजींनी नकार दिला आणि त्याचं कारण होतं, “१९७४ रिलीज झालेल्या एका अल्बममध्ये संत मीराबाईंनी गायलेली भजन गीते समाविष्ट करण्यात आली होती. हा अल्बम हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतावर आधारित होता आणि यामधील मीराबाईंची भजन लताजींच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली होती. या अल्बमनंतर लताजींनी शपथ घेतली होती की, यापुढे मीराबाईंची भजन मी इतर कोणासाठीही गाणार नाही.” इथे लताजींची आपल्या वचनावरची निष्ठा निश्चितच थक्क करणारी आहे.
पुढे मीरा चित्रपटासाठी वाणी जयराम यांनी पार्श्वगायन केले. या चित्रपटातील “मेरे तो गिरधर गोपाल” या गाण्यासाठी वाणी जयराम यांना १९८० साली फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
====
हे देखील वाचा : साक्षात्कार लता नावाच्या स्वर संस्काराचा!
====
अर्थात, या घटनेमुळे ना हेमामालिनी लताजींवर नाराज झाली ना लताजींनी मनात ‘किंतु परंतु’ ठेवलं. पुढे हेमामालिनीच्या अनेक चित्रपटांसाठी लताजींनी पार्श्वगायन केलं.