इटलीमध्ये सोनालीचे पैंजण हरवले तेव्हा तिला मिळाला एक सुखद धक्का
सोनाली कुलकर्णी! मराठी चित्रपटसृष्टीला सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) नावाच्या एक नाही तर दोन सुंदर अभिनेत्री लाभल्या आहेत. परंतु या लेखामध्ये आपण यापैकीच एकाच सोनाली कुलकर्णीच्या हरवलेल्या पैंजणाची हकीकत वाचायला मिळणार आहे; ती सोनाली म्हणजे मुक्ता, दोघी, प्रकाश बाबा आमटे, मिशन काश्मीर, दिल चाहता है अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. ही सोनाली कुलकर्णी कोण हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
सोनाली मूळची पुण्याची. पुण्यातल्या अभिनव शाळेमध्ये शालेय शिक्षण आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पॉलिटिकल सायन्स सारख्या क्लिष्ट विषयात पदवी घेतलेली सोनाली प्रचंड नम्र आणि मेहनती आहे. वडील इंजिनिअर, आई गृहिणी, दोन मोठे भाऊ; एक मेकॅनिकल इंजिनिअर आणि दुसरा आता मनोरंजनाच्या क्षेत्रातच कार्यरत आहे.
सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेली सोनाली लहानपणापासूनच प्रचंड हुशार होती. तिने भरतनाट्यम मध्ये ‘अरंगेत्रम’ पूर्ण केलं असून गाण्यांचाही दोन परीक्षा झालेल्या आहेत. कला क्षेत्राची आवड असताना स्पोर्ट्समध्येही रुची असणारी व्यक्ती अभावानेच आढळते, त्यापैकीच एक म्हणजे सोनाली. शाळेमध्ये असताना स्पोर्ट्समध्येही हुशार असणाऱ्या सोनालीने त्यावेळी पी.टी.उषासारखं स्पोर्ट्समध्येच करिअर घडवायचा विचार केला होता. भारतात कलाक्षेत्रही खुणावत होतंच. सोनालीच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला तो पंडित सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेमध्ये. इथेच तिला ‘अभिनय’ म्हणजे काय हे कळलं.
कॉलेजमध्ये असताना सोनाली (Sonali Kulkarni) नाटकांमध्ये काम करायची. याच दरम्यान तिला पहिला ब्रेक मिळाला तो गिरीश कर्नाड यांच्या ‘चेलुवी’ या कन्नड चित्रपटामधून. १९९२ साली कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्यावर्षीचा पर्यावरण संवर्धन/संरक्षण या विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच दिल्लीतील २४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता. हा चित्रपट नंतर हिंदीमध्येही डब करण्यात आला.
सोनालीच्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला. मात्र तिने मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, इंग्लिश आणि इटालियन अशा अनेक भाषांमधील चित्रपटामध्ये काम केलं. दुसऱ्या भाषेमध्ये काम करत असताना सर्वात मोठं आव्हान असतं ते भाषेचं खास करून भाषेच्या लहेजाचं. त्यामुळे सोनालीने नेहमीच भाषेकडे लक्ष दिलं. ज्या भाषेत काम करायचं आहे ती भाषा आत्मसात करायचा प्रयत्न केला.
सोनालीने (Sonali Kulkarni) गिरीश कर्नाड, जब्बार पटेल, मणिरत्नम, सुमित्रा भावे, सुनील सुखटणकर, समृद्धी पोरे, विधू विनोद चोप्रा अशा मोठ मोठया दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. दोघी, मिशन काश्मीर, देवराई, कच्चं लिंबू या चित्रपटांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘दोघी’ व ‘देवराई’ चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, तर प्रतिबिंब, कच्चं लिंबू या चित्रपटासाठी झी गौरव पुरस्कार मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे २०१५ साली तिला व्ही शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.
त्यावर्षी सोनाली कान्स फेस्टिव्हलसाठी इटलीला गेली होती. त्यावेळी तिच्या पायातील पैंजण हरवले. ती तिच्यापरीने शोध घेत होतीच, पण जगभरातली माणसं या फेस्टिव्हलला आली होती. एवढ्या गर्दीत आपले पैंजण मिळणार नाहीत, हे जवळपास निश्चितच होतं. पण अचानक एक व्यक्ती तिला शोधत तिच्याजवळ आली आणि म्हणाली, “हे पैंजण मला मिळाले आहेत, एका साडी नेसलेल्या स्त्रीचे हे पैंजण आहेत, हे मी ओळखलं म्हणून तुम्हाला शोधत होतो”, असं म्हणून त्या व्यक्तीने ते पैंजण सोनालीच्या (Sonali Kulkarni) हातात दिले. पैंजण पाहून सोनालीला आनंद तर झालाच, पण तिला प्रचंड आश्चर्यही वाटलं.
एका अनोळखी देशात, जगभरातील नामवंत कलाकार जिथे जमले आहेत जिथे प्रचंड गर्दी आहे अशा ठिकाणी एका व्यक्तीने साडी नेसलेल्या स्त्रीचे पैंजण आहेत, हे बरोबर ओळखलं आणि ती साडी नेसलेली स्त्री लक्षात ठेवून तिचे पैंजण तिला आणून दिले. या गोष्टीमुळे ती हरखून गेली होती.
=====
हे देखील वाचा – दिवाना: जेव्हा दिव्या भारती घाबरून तब्बल एक तास गाडीत बसून राहिली…
=====
पुढे सोनालीने इटालियन चित्रपटातही काम केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सोनाली इटलीला राहत होती. तिथे राहत असताना तिला भारताची प्रचंड आठवण येत होती. याबद्दल एका मुलाखतीमध्ये सोनालीने सांगितलं की, शेवट शेवट तर तिला भारताची इतकी आठवण यायला लागली की, तिच्या मनात फक्त सावरकरांच्या कवितेचे शब्द घोळत होते, “ने मजसी ने परत मातृभूमीला…”
सोनालीचं (Sonali Kulkarni) आपल्या देशावर नितांत प्रेम आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये यशस्वी होऊनही लहानपणी झालेले मध्यमवर्गीय मराठी संस्कार आजही तिच्या वागण्या – बोलण्यातून जाणवत असतात. तिला आपल्या मातृभूमीच्या आणि संस्कारांचा सार्थ अभिमान आहे म्हणूनच आजही तिचे पाय जमिनीवर आहेत.