जेव्हा नाना पाटेकरांनी दिला प्रेक्षकांना दम
नाना पाटेकर म्हणजे हिंदी मराठी नाट्य सिनेसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्व. काही नटांच्या वावरण्यातच एकप्रकारे हुकुमत असते. खणखणीत अभिनय आणि आवाजाच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी प्रेक्षकमनावर अनेक वर्षं राज्य केलं आहे. नानांचं मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे जयवंत दळवी लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित ‘पुरुष’. या नाटकाच्या बाबतीत घडलेला हा किस्सा.
पुरुष या नाटकात नाना गुलाबराव ही व्यक्तिरेखा साकारत.एका गांधीवादी विचारसरणीत वाढलेल्या अंबिका नामक तरुणीवर हा गुलाबराव बलात्कार करतो आणि त्या अन्यायाने पेटलेली अंबिका त्याचा बदला घेते असं साधारण या नाटकाचं कथानक होतं. अंबिकाची भूमिका अभिनेत्री रीमा लागू साकारत.नाना ही भूमिका इतकी जिवंत वठवत की प्रत्येक प्रयोग खणखणीत रूपयासारखा वाजायचा. ‘पुरुष’ नाटकाचे जवळपास २००० प्रयोग त्या काळात झाले. या भूमिकेने हिंदी चित्रपटसृष्टीचं लक्ष नाना पाटेकर नामक नटाकडे वेधलं.
नानांचा “अंकुश” सिनेमा त्याच दरम्यान प्रदर्शित झाला आणि त्यातल्या भूमिकेवर जीव ओवाळून टाकणारा प्रेक्षकवर्ग ‘पुरुष’ नाटकाला गर्दी करू लागला.केवळ नानांना पहायला लोकं गर्दी करू लागली. त्याचा परिणाम असा झाला की नानांच्या खलनायकाच्या तोंडच्या वाक्यांना टाळ्या,शिट्ट्या यायच्या. तो आरडाओरडा इतका मोठा असायचा की चंद्रकांत गोखले, रीमा लागू या सहकलाकारांचे संवाद ऐकू येईनासे व्हायचे. किंबहुना नाटकाच्या उद्देशाविरोधात बलात्कारी खलनायकाला लोकं डोक्यावर घेऊ लागले.
अशावेळी नाना पाटेकर यांनी त्यांच्या शैलीत एक मार्ग शोधला.तिसरी बेल झाल्यावर पडदा उघडण्याआधी नाना पडद्याबाहेर येऊन प्रेक्षकांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधत. त्याचा साधारण आशय असा असायचा, ” मी नाना पाटेकर.मला पहायला आलेल्या मंडळींनी मला नीट पाहून घ्यावे.टाळ्या शिट्ट्यांसहीत.पडदा उघडल्यावर मात्र गडबड एकदम बंद. तुमचा गोंधळ म्हणजे माझ्या सहकलाकारांचा, जाणकार प्रेक्षकांचा आणि माझाही तो अपमान आहे. नाटकात तुम्ही पाहत आहात तो नाना पाटेकर नव्हे.तो ‘गुलाबराव’ आहे. प्रयोग आवडला नाही तर आपण निघू शकता.पण कोणालाही त्रास होता कामा नये.”
गंमत म्हणजे नाना पाटेकर यांच्या त्या खास आवाजाच्या पट्टीतील आणि शैलीतील ही जरबयुक्त सूचना ऐकल्यावर प्रेक्षकही लहान मुलांसारखे शांत बसून प्रयोग पहात.
मराठी रंगभूमीचं हे खरंच भाग्य की कलाकार आणि प्रेक्षक यांचं इतकं मजेशीर तरी घट्ट आणि सुंदर नातं तिला नानांसारख्या कलावंतामुळे अनुभवता आलं.
– रश्मी वारंग