सलीम आणि जावेद यांची ‘पहली मुलाकात‘ कुठे आणि कशी झाली?
हिंदी सिनेमामध्ये सलीम जावेद (Salim javed) या जोडीने डायलॉग रायटर या कम्युनिटीला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. कारण तोपर्यंत या महत्वाच्या डिपार्टमेंटकडे फारसं कुणी सिरीयसली पाहतच नव्हतं. सलीम जावेद या दोघांनी जेव्हा एकत्र काम सुरू केलं त्यानंतर पोस्टरवर सुद्धा ‘रिटर्न बाय सलीम जावेद’ असं मोठ्या अक्षरात लिहिलं जाऊ लागलं. लेखकाच्या लेखणीला खऱ्या अर्थाने न्याय या जोडीने मिळवून दिला असं नक्कीच म्हणावं लागेल. या दोघांची जोडी नेमकी जमली कुठे? पहिल्यांदा हे कुठे भेटले? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
‘रिटर्न बाय सलीम जावेद’ या पुस्तकात याचा तपशीलवार उल्लेख केला आहे. १९६५ साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याच्या निर्मितीच्या वेळचा हा किस्सा आहे. चित्रपटाचं नाव होतं ‘सरहदी लुटेरा’ हा सिनेमा एस एम सागर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शेख मुख्तार यांची प्रमुख भूमिका होती. हा एक बी ग्रेड सिनेमा होता. अतिशय मारधाड असलेला हा सिनेमा क्लासेससाठी बनवला नव्हता तर मासेससाठी बनवला होता. त्या काळी देशात टुरिंग टॉकीजचे मोठे प्रस्थ होते. तिथे असले सिनेमे मोठे गर्दी खेचत. तसेच यात्रा जत्रा उरूस या उत्सवी काळात, ग्रामीण भागात / निमशहरी भागात अशा चित्रपटांना मोठा प्रेक्षक वर्ग असायचा. त्यामुळे असे सिनेमे त्या काळात खूप मोठ्या संख्येने बनायचे.
या ‘सरहदी लुटेरा’ या चित्रपटात सलीम खान यांनी एक भूमिका केली होती. ही भूमिका मुख्य अभिनेत्याची नव्हती. मुख्य अभिनेते तर शेख मुख्तार होते. सलीम (Salim javed) यांची या चित्रपटात छोटीशी होती. काही वर्षांपूर्वी इंदोर हून अभिनेता बनण्यासाठी मुंबईला आले होते. परंतु चार-पाच वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की ऍक्टर तर आपण काही होवू शकत नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या तील अंगभूत कला ओळखून स्क्रिप्ट रायटिंग आणि डायलॉग रायटिंग यामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली.
परंतु इथे देखील मोठा संघर्ष होता. हे काम सहजासहजी मिळणे शक्य नव्हते. म्हणून सलीम खान यांनी अब्रार अल्वी ( अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्त यांचे लेखक,पटकथाकार) यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या काळात बऱ्याच लेखकांकडे असे असिस्टंट असायचे. या सहायकांना पैस तर मिळायचे. पण क्रेडिट अजिबात मिळायचं नाही. सर्व क्रेडिट मुख्य लेखकाला. त्यामुळे सलीम खान त्या काळात काम जरी करत असले तरी इंडस्ट्रीमध्ये कुणालाही माहीत नव्हते की सलीम खान नावाची कुणी व्यक्ती स्क्रिप्ट रायटिंग करते आहे. आपण काम करतो आहे पण त्याचा क्रेडिट आपल्याला मिळत नाही हे शल्य सलीम खान यांच्या उरात कायम सलत असायचे. (Salim javed)
पण याच काळात त्यांना चित्रपट मिळाला ‘सरहदी लुटेरा’. या चित्रपटासाठी कुणीही ऑथेंटिक स्क्रीन प्ले रायटर किंवा डायलॉग रायटर नव्हता. निर्मात्याच्या भोवती अनेक लेखक फिरत असायचे . त्या पैकी कोणाला तरी बोलावून पर डे सॅलरीवर ते काम दिले जायचे. त्यामुळे चित्रपटांमध्ये एक जिणसीपणा राहायचा नाही. कारण रोज रायटर बदलले जायचे. हे सुद्धा सलीम खान यांना अजिबात आवडत नव्हते. पण काही इलाज नव्हता. एका दिवशी मात्र त्यांचा कडेलोट झाला. त्यांच्या हातात जे डायलॉग दिले होते; ते अतिशय वाईट होते. ते सरळ दिग्दर्शकाकडे गेले आणि म्हणाले, ”हे काय डायलॉग आहेत का? मुळात हा सीनच चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे !
यापुढे आता माझे सीन मी स्वतः लिहीन आणि माझे डायलॉग देखील मी स्वतः लिहीत जाईल. तुम्ही काळजी करू नका.” त्यावर दिग्दर्शकाला थोडीशी शरम वाटली आणि ते म्हणाले,” नाही. असं करू नका. मी बघतो काय करायचं.” असं म्हणून त्यांनी आपल्या प्रोडक्शन क्रू कडे पाहिले आणि एका क्लॅपर बॉय ला जवळ बोलावले आणि त्याला विचारले,” अरे तू काल सांगत होतास ना? तू चांगले लिहितो.” तो हो म्हणाला. त्यावर दिग्दर्शक म्हणाले, ”हा सीन घे आणि उद्याचा सिन आणि डायलॉग मला लिहून दे.” त्याने तो सीन अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिला आणि त्याचे संवाद देखील उत्कृष्ट लिहीले.
=======
हे देखील वाचा : सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा…
=======
तो सीन आणि डायलॉग पाहून सलीम खान देखील खूश झाले. त्यांनी त्याचे अभिनंदन केले दिग्दर्शकाला देखील त्या क्लॅपर बॉयचे काम आवडले आणि त्यांनी त्याला चक्क शंभर रुपये महिना या पगारावर ‘सरहदी लुटेरा’ या चित्रपटाच्या डायलॉग रायटिंग साठी ठेवले. सलीम खान आणि त्या क्लॅपर बॉय ओळख इथेच झाली. हा क्लॅपर बॉय म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून जावेद अख्तर होता. तो देखील स्ट्रगल करत होता. त्याचा स्ट्रगल हा जास्त मोठा होता. (Salim javed)
या दोघांची मैत्री तिथूनच झाली आणि पुढे ‘अधिकार’ (दि. एस एम सागर) या चित्रपटापासून ते दोघे एकत्र आले. राजेश खन्नाच्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. सत्तरच्या दशक हे खऱ्या अर्थाने सलीम जावेद यांचे होते. अमिताभ बच्चन यांच्या यशस्वी कारकिर्दीला या दोघांचा फार मोठा सहभाग होता.