दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कोणत्या निर्मात्याने तोडले माला सिन्हा सोबतचे कॉन्ट्रॅक्ट
पन्नास आणि साठच्या दशकातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री माला सिन्हा हिचा सुरुवातीचा मुंबईमधील स्ट्रगल फार मोठा होता कारण एका मोठ्या चित्रपट निर्मात्याने तिला बंगालमधून खास बोलावून तीन सिनेमासाठी कॉन्ट्रॅक्ट तिच्यासोबत केले होते. पण नंतर तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्याने तिच्यासोबत चे कॉन्ट्रॅक्ट चक्क तोडले गेले! आणि माला सिन्हा अक्षरशः बेकार झाली. तिला पुन्हा मार्गावर आणण्याचे काम एका गायिका अभिनेत्रीने केले आणि माला सिन्हा ची भरकटलेली करीयरची गाडी पुन्हा एकदा जोरात धावू लागली! कोण होते ते चित्रपट निर्माते? का तोडले त्यांनी तिच्या सोबतचे कॉन्ट्रॅक्ट? हा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. (Mala Sinha)
माला सिन्हा (Mala Sinha) ही मूळची नेपाळची जरी असली तरी तिचा जन्म कलकत्त्याला झाला. ती ख्रिश्चन. अल्डा सिन्हा हे तिचे मूळ नाव. परंतु लहानपणापासूनच ती बंगाली चित्रपटांमध्ये अभिनय करू लागल्यामुळे तिने चित्रपटासाठी माला सिन्हा हे नाव घेतले. ती सुरुवातीला आकाशवाणी वर गात देखील असे. बालकलाकार म्हणून तिची चित्रपटात वर्णी लागली आणि वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ती बंगाली सिनेमाची नायिका देखील बनली. बंगालमध्ये तिचे सर्व ठीक ठाक चालू होते. तिचे देखणे रूप छायाचित्रकारांना देखील आकर्षित करत होते. बंगालमधील एका छायाचित्रकाराने तिचे एक छायाचित्र मुंबईच्या सिने मासिकात छापून आणले आणि ते दृष्टीस पडले चित्रपट निर्माते अमिया या चक्रवर्ती यांच्या. अमिया चक्रवर्ती त्याकाळी फार मोठे नाव होते. त्यांनीच दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ दिग्दर्शित केला होता तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या’ दाग’ या चित्रपटासाठी दिलीप कुमार यांना पहिला फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला होता.
अमिया चक्रवर्ती सारखा मातब्बर निर्माता दिग्दर्शक जेव्हा माला सिन्हाला कलकत्त्याहून मुंबईला बोलवून घेतो त्यावेळेला सहाजिकच ते हरखून गेली आणि मोठ्या आनंदाने तिने कलकत्ता सोडले. ती माया नगरीत आली इथे आल्यावर अमिया चक्रवर्ती यांनी तिला प्रदीप कुमार यांच्या काम करण्याची संधी दिली. पण त्यापूर्वीच त्यांनी माला सिन्हा सोबत तीन चित्रपट करण्याचा करार देखील केला. माला सिन्हा (Mala Sinha) आता सातव्या आसमान वर होती. कारण एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नसताना हातात तीन-तीन चित्रपटाचे करार आले होते ते देखील अमिया चक्रवर्ती सारख्या मातब्बर चित्रपट निर्मात्याच्या प्रोडक्शन हाऊस कडून ! त्यामुळे ती प्रचंड खुश होती.
पण दुर्दैवाने तिचा प्रदीप कुमार सोबतचा पहिलाच चित्रपट ‘बादशाह’ हा अक्षरशः सुपर फ्लॉप झाला. अमिया चक्रवर्ती यांना देखील खूप आश्चर्य वाटले. कारण तेव्हा त्यांच्या नावाला एक ग्लॅमर आले होते आणि असे असताना हा चित्रपट फ्लॉप होऊ झाला. हे त्यांच्याकरिता नक्कीच शुभ संकेत देणारे नव्हते. त्यांनी या सिनेमाच्या अपयशाचे खापर आपली नवीन अभिनेत्री माला सिन्हा (Mala Sinha) हिच्यावर फोडले! आणि तिच्या सोबत असले पुढच्या दोन चित्रपट चे कॉन्ट्रॅक्ट चक्क कॅन्सल करून टाकले. अमिया चक्रवर्ती यांनी पुढे हे दोन चित्रपट बनवले पण या चित्रपटाची नायिका माला सिन्हा नव्हती. हे दोन्ही चित्रपट अतिशय गाजले. हे चित्रपट होते नूतन आणि बलराज सहानी यांचा ‘सीमा’ आणि वैजयंतीमाला आणि यांचा ‘कठपुतली’. हे दोन महत्त्वाचे सिनेमा माला सिन्हा च्या हातून गेल्यामुळे साहजिकच ती नाराज झाली आणि पुन्हा सर्व बाड बिस्तारा गुंडाळून कलकत्त्याला निघून जावे असा विचार तिच्या मनात आला. त्या पद्धतीने तिने तशी तयारी देखील सुरू केली. पण अशा या कठीण प्रसंगी दुर्गादेवी तिला पावली! एका बंगाली निर्माता दिग्दर्शकाने तिला बेकार केले तर दुसरा बंगाली निर्माता दिग्दर्शक तिच्या मदतीला आला.
बंगालमध्ये दुर्गा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मुंबईमध्ये आलेल्या काही बंगाली समुदायांमध्ये देखील दुर्गा महोत्सव त्याकाळी मोठ्या जल्लोषात साजरा व्हायचा. शशिधर मुखर्जी यांनी अशाच एका दुर्गा महोत्सवाचे आयोजन मुंबई मध्ये केले होते. या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. या समारंभात माला सिन्हाने एका नाटकात भूमिका करावी अशी इच्छा गीता दत्त यांनी व्यक्त केली. त्या पद्धतीने माला सिन्हा ने एका बंगाली नाटकात काम केले हे नाटक पाहण्यासाठी गीता दत्त आपले पती गुरुदत्त यांना देखील घेऊन आली. गुरुदत्त यांना मालां सिन्हा (Mala Sinha) भूमिका आणि तिचा अभिनय खूप आवडला. आणि ताबडतोब त्यांनी तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून ‘प्यासा’ या चित्रपटातील मुख्य नायिकेची भूमिका ऑफर केली.
अशा पद्धतीने कलकत्त्याला जाता जाता माला सिन्हा इथे राहिली. राहिली ती राहिलीच! ती मुंबईची झाली. गुरुदत्त यांनी माला सिन्हाला (Mala Sinha) आपल्या सिनेमात घेतले ही खबर कर्णोपकर्णी सगळीकडे पोहोचली आणि तिच्याकडे चित्रपटा निर्मात्यांचे लक्ष गेले. रमेश सैगल यांनी ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या कलाकृतीवर आधारित ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटात राजकपूर सोबत कास्ट केले. त्याचप्रमाणे सोहराब मोदी यांनी ‘नौ शेरवाने आदिल’ या चित्रपटात तिला नायिकीची भूमिका दिली.
==========
हे देखील वाचा : गुरुदत्त-वहिदा च्या पहिल्या भेटीची इंटरेस्टिंग स्टोरी !
==========
बलराज सहानी यांनी संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन केले तो चित्रपटाचा होता ‘लाल बत्ती’ या चित्रपटातील नायिका देखील माला सिन्हा होती. बी आर चोप्रा यांच्या ‘धूल का फुल’ ची नायिका मालाच होती. हे सर्व चित्रपट 57- 58 या सालात प्रदर्शित झाले. ‘प्यासा’ या चित्रपटातील माला सिन्हा ने साकारलेली मीना ची भूमिका समीक्षकांना देखील खूप आवडली. ही भूमिका पाहूनच बी आर चोप्रा यांनी त्यांच्या ‘धूल का फूल’ या चित्रपटात तिला घेतले आणि या चित्रपटापासून माला सिन्हा ची यशस्वी सिनेमाची कारकीर्द सुरू झाली. १९५८ ते १९६२ या काळामध्ये तिचे अनेक चित्रपट आले त्यामध्ये दुनिया न माने , हरियाली और रास्ता, दिल तेरा दिवाना, अनपढ, जहां आरा… हे ते चित्रपट होते. साठच्या दशकातील तर ती हुकमी यशाची नायिका होती. दुर्गा पूजेत साकारलेल्या बंगाली नाटकातील भूमिकेने माला सिन्हा च्या करीयर पुन्हा दिशा मिळाली !