
Prem Chopra यांना आयुष्यात आत्मविश्वास कुणी मिळवून दिला?
सुप्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांनी विविध भारतीवरील एका मुलाखतीत त्यांच्या जीवनातील एक सत्य सांगितले होते. खरंतर हे सत्य म्हणजे त्यांना लहानपणापासून दोन्ही कानांनी ऐकायला थोडंसं कमी येतं होतं. लहानपणी त्यांना एकदा विषमज्वर झाला होता तेव्हापासून त्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. असं नव्हतं की त्यांना अजिबातच ऐकू येत नव्हते पण समोरच्याचं बोलणं ऐकून घेण्यासाठी त्यांना जीवाचा ‘कान’ करून ऐकावं लागे. त्यांना लहानपणापासून हे ‘न्यूनत्व’ वाटायचे. त्यामुळे त्यांनी हे कोणाला सांगितलं नव्हतं. समोरच्याच्या लीप मुव्हमेंट पाहून ते त्याला उत्तर द्यायचे त्यांना आपल्याला ऐकू कमी येतं हे आपल्या आयुष्यातील कमतरता वाटायची , उणेपण वाटायचे आणि आपल्याला समाज बहिरा म्हणेल याची लाज देखील वाटायची! म्हणून त्यांनी कधीच कोणाला काहीच सांगितले नाही. मात्र समोरच्याचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकण्याचे तंत्र त्यांनी शिकून घेतले. त्यामुळे कोणाला कधीही तसा काही संशय आला नाही.
कॉलेजमध्ये सिमला येथे असताना पन्नास च्या दशकात त्यांनी काही नाटकांमधून भूमिका करायला सुरुवात केली. त्या काळात रंगभूमीवर सर्वजण जोर जोरात बोलत असल्यामुळे त्यांच्या कमी ऐकण्याच्या प्रॉब्लेम ला फारसा त्रास झाला नाही. नंतर साठच्या दशकामध्ये प्रेम चोप्रा मुंबईला आले काही चित्रपटातून आणि नाटकातून भूमिका देखील त्यांनी केल्या. अभिनयाचे करिअर फारसे यशस्वी होणार की नाही अशी शंका जाणवल्यावर त्यांनी मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात मार्केटिंग विभागात नोकरी देखील केली. त्या निमित्ताने त्यांना भारतभर प्रवास करावा लागायचा . अभिनयाचा किडा मात्र डोक्यात सारख्या वळवळत होताच. राज खोसला यांच्या ‘वह कौन थी?’ या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली आणि लोक त्यांना ओळखू लागले. मनोज कुमारला देखील त्यांचे काम खूप आवडले म्हणून त्याने त्यांच्या पुढच्या ‘शहीद’ (१९६५) या चित्रपटात प्रेम चोप्राला घेतले. यात प्रेम चोप्राने सुखवीर ची भूमिका केली होती तर शहीद भगतसिंग ची भूमिका मनोज कुमार यांनी केली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मात्र प्रेम चोप्रा यांचे ऐकू कमी येण्याचे बिंग फुटले!
याचे कारण मनोज कुमार मुळातच हळू आवाजात बोलणारा कलाकार होता. त्यात एका शॉट मध्ये तो पाठमोरा होऊन बोलत होता. त्यामुळे त्याचे लिप्ससिकींग प्रेम चोप्राला दिसत नव्हते. तेव्हा त्या तो शॉटला तो वारंवार रिटेक करत होता. कारण मनोज कुमार चा डायलॉग कधी संपतो आणि आपल्याला कधी बोलायचं हेच त्याला कळत नव्हतं. मनोज कुमारला हे खटकत होतं. म्हणून त्याने एका असिस्टंट डायरेक्टरला त्याचा स्वतःचा डायलॉग संपल्यानंतर प्रेम चोप्राला हळूच काठीने टच करायला सांगितले आणि डायलॉग बोलायला सांगितले. अशा पद्धतीने तो शॉट ओके झाला!
मनोज कुमारने नंतर प्रेम चोपडाला स्पष्टच विचारले तुला ऐकायचा प्रॉब्लेम आहे का? त्यावर प्रेम चोप्रा खूपच नाराज झाला आणि त्याने आपले दुःख मनोज कुमारला सांगितले आणि कृपया मला चित्रपटातून काढू नका असे देखील सांगितले. मनोज कुमारने त्याला जवळ घेतले आणि सांगितले,” अरे मित्रा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आपण उद्याच डॉक्टर कडे जाऊत आणि औषधोपचार सुरू करू. तू इतके दिवस का थांबलास?” त्यावर प्रेम चोप्रा म्हणाला,”माझी हिम्मतच होत नव्हती. मला वाटले ते ऑपरेशनने माझे पूर्णच ऐकणे थांबले तर?” त्यावर मनोज कुमार हसला म्हणाला,” आता विज्ञान प्रगती करते आहे. आपण उद्याच इ एन टी स्पेशालिस्ट कडे जाऊ.” त्याप्रमाणे ते दोघे दुसऱ्या दिवशी कानाच्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी तपासलेआणि एक छोटे ऑपरेशन करायला सांगितले आणि ऑपरेशन नंतर प्रेम चोप्राला ऐकण्याची क्षमता वाढली. त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास देखील वाढला. साठच्या च्या दशकाच्या अखेरीस तो आघाडीचा खलनायक बनला सत्तरच्या दशकात तर तो महत्त्वाचा खलनायक बनला. राजेश खन्ना सोबत तब्बल सोळा चित्रपटात त्याने खलनायकाच्या भूमिका केल्या होत्या.
================================
हे देखील वाचा : एका गैरसमजामुळे भांडण; Shah Rukh Khan आणि Sunny Deol मध्ये ३० वर्ष होता अबोला!
================================
मनोज कुमारने वेळीच प्रेम चोप्राला मदतीचा हात दिला त्याच्यातील न्यूनगंडावर मात करण्याची ताकद दिली म्हणून प्रेम चोपडा अभिनयाची मोठी खेळी खेळू शकला. या दोघातील मैत्री आजही कायम आहे. मनोज कुमारच्या प्रत्येक सिनेमात प्रेम चोप्रा ची भूमिका असतेच. २०१२ साली प्रेम चोप्राचे आत्मचरित्र ‘प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोप्रा !’ प्रसिद्ध झाले त्यात देखील त्याने याचा उल्लेख केला आहे.