अभिनेत्री परिणीती चोप्राचा नवरा आहे तरी कोण?
अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्डा यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होती. ते एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून समाजमाध्यमात चालू होत्या. त्या दोघांनीही मात्र अधिकृतरीत्या याची कधीच कबुली दिली नव्हती. आता मात्र त्यांनी साखरपुडा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) तिच्या कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. तिने ज्यांच्याशी साखरपुडा केला ते राघव चड्डा कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
११ नोव्हेंबर १९८८ साली नवी दिल्लीमध्ये जन्मलेल्या राघव चड्डाचं शालेय शिक्षण दिल्लीमध्येच पूर्ण झालं. दिल्ली विद्यापीठातून पदवीधर असलेल्या राघव चड्डा यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया मधून चार्टर्ड अकाउंटचे शिक्षण पूर्ण केले. पदवीत्तर शिक्षण त्यांनी लंडन स्कूल ऑफ एकोनोमिक्समधून पूर्ण केले. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम पाहिले.
२०११ साली अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात राघव चड्डानी सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान त्यांची अरविंद केजरीवाल यांच्याशी भेट झाली. आंदोलनानंतर केजरीवालांनी जेव्हा आम आदमी पक्षाची स्थापना करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी राघव यांनादेखील पक्षात सामील होण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राघव चड्डा आम आदमी पक्षाचे सदस्य बनले. २०१२ मध्ये अरविंद केजरीवालांनी त्यांच्यावर दिल्ली लोकपाल विधेयकाचा मसुदा बनवण्याची कामगिरी सोपवली, हे त्यांचं पहिलं राजकीय काम ठरलं. दृकश्राव्य माध्यामातून ते सातत्याने आम आदमी पक्षाची भूमिका मांडत राहिले. सर्वात कमी वयाचे पक्षप्रवक्ते म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरली.
२०१५ साली ‘आप’ने पहिल्यांदा दिल्लीची सत्ता काबीज केली तेव्हा त्यांनी सव्वीस वर्षीय राघव चड्डा यांची राष्ट्रीय कोषागार म्हणून नियुक्ती केली. २०१९ मध्ये ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दक्षिण दिल्ली लोकसभेच्या जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जनता पक्षाचे रमेश बिथूडी येथून विजयी झाले. पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी त्यांची पंजाबचा सहप्रभारी म्हणून पक्षाने नियुक्ती केली. या निवडणुकांमध्ये ‘आप’ने घवघवीत यश संपादन करत ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवत सरकार स्थापन केले. या विजयात राघव चड्डा यांचा मोलाचा वाट होता.
फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाग घेतला. राजेंद्र नगर मधून लढतांना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आरपी सिंग यांचा २००५८ मतांच्या फरकाने पराभव करत दिल्ली विधानसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवले. या निवडणुकीनंतर त्यांची दिल्ली जल बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
=======
हे देखील वाचा : The Kerela Story सिनेमातील अभिनेत्री अदा शर्माने अपघातानंतर दिली प्रतिक्रिया
=======
२१ मार्च २०२२ रोजी आपतर्फे त्यांची राज्यसभेवर पाठवणी करण्यात आली. वयाच्या तेहतिसाव्या वर्षी राज्यसभेचे खासदार होत त्यांनी सर्वात तरुण राज्यसभा सदस्य होण्याचा मान पटकावला. पंजाबमधील आपच्या घवघवीत यशानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांची स्वतःच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राघव चड्डा यांनी आता सिनेसृष्टीशी नाते जोडले आहे. दिल्लीमध्ये आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांनी अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिच्यासोबत साखरपुडा केला. सिनेसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.