‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आत्महत्या करायला निघालेल्या रोशन यांना कुणी सावरले ?
अवघे पन्नास वर्षे आयुर्मान लाभलेल्या संगीतकार रोशन (जन्म १४ जुलै १९१७ निधन १६ नोव्हेंबर १९१७) यांच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळेस चा एक भावस्पर्शी किस्सा आपल्याला दिग्दर्शक किदार शर्मा यांच्या ‘One and lonly kidar sharma’ या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळतो. संगीतकार रोशन यांनी सुरुवातीला दहा वर्ष ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी केल्यानंतर चित्रपटाला संगीत देण्यासाठी मुंबई महानगरीमध्ये आले. संगीतकार बनताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. (Singer Roshan)
संगीतकार हुस्नलाल भगतराम यांच्यासोबत राहू लागले. काम मात्र काही केल्या मिळत नव्हते. अंगी प्रतिभा होती परिश्रम करण्याची तयारी होती पण संधी काही मिळत नव्हती. त्यांची गाठ एकदा दादर रेल्वे स्टेशनवर दिग्दर्शक किदार शर्मा यांच्याशी पडली. तेव्हा त्यांनी आपण संगीतकार आहोत आणि आपल्याला जर संधी मिळाली तर आपण नक्कीच चांगले करू असे सांगितले. किदार शर्मा यांना हुस्नलाल भगतराम यांच्याकडून रोशन यांच्याबाबतची माहिती होतीच. त्या वेळी ते ‘नेकी और बदी’ हा चित्रपट तयार करत होते. त्यांनी रोशन (Singer Roshan) यांच्यावर विश्वास टाकून त्यांना चित्रपटाचे संगीत करायची संधी दिली.
रोशन अर्थातच खूप खुश झाले. खूप मेहनत घेऊन त्यांनी या चित्रपटाला संगीत दिले. या पहिल्या चित्रपटात अमीरबाई कर्नाटकी,राजकुमारी, फिरोझ दस्तूर यांचे स्वर होते. मधुबाला, गीताबाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण एवढी मेहनत घेऊन देखील हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला. अजिबात चालला नाही. रोशन यांना अर्थातच खूप दुःखी झाले. रोशन खूप संवेदनशील व्यक्ति होते. पहिल्याच प्रयत्नातील अपयशाने ते पुरते खचले आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येवू लागले.(Singer Roshan)
ते दुसऱ्या दिवशी केदार शर्मा यांच्या ऑफिस मध्ये गेले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. शर्मांनी विचारले ,”काय झाले?” तेव्हा ते म्हणाले,” मी समुद्रात जाऊन जीव देण्याचा विचार करतो आहे आपण एवढ्या विश्वासाने माझ्याकडे संगीत दिले.एवढा पैसा खर्च केला. पण आपल्या विश्वासाला पात्र ठरू शकत नाही. माझ्यामुळे हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला. आता जगण्याला काय अर्थ आहे? मी समुद्रात जावून जीव देतो!” त्यावर किदार शर्मा म्हणाले,” तुम्ही आत्महत्या करण्याला माझी काहीच हरकत नाही. तुम्ही आत्महत्या करू शकता. फक्त कुठे करणार ते सांगा.
हाजी अली ला करणार की, वर्सोवा बीच वर करणार? विचार करा. कारण वर्सोवा बीच हे जास्त खोल आहे!!”आपल्याला सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी केदार शर्मा यांचे हे वक्तव्य करताहेत हे पाहून रोशन आणखीनच दुःखी झाले आणि ते रडू लागले. त्यावर किदार शर्मा यांनी खडसावून विचारले,” काय मृत्यू हा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे का? मित्रा आयुष्यात हे प्रसंग वारंवार येतात. हि चित्रपटाची मायानागरी आहे. तिथे फक्त दहा टक्के चित्रपट चालतात. (Singer Roshan)
जर तुझ्याप्रमाणे सगळेजण आत्महत्या करू लागले तर थोड्या दिवसात निम्म बॉलीवूड रिकामा होऊन जाईल! तेव्हा आत्महत्या सारखा मूर्खासारखा विचार करू नकोस. आयुष्य जगण्यासाठी असतं. मरण्यासाठी नाही. एक चित्रपट फ्लॉप झाला म्हणून काय झालं? पुढे आयुष्य आहे. तू गेल्यानंतर तुझा एक वर्षाचा मुलगा राकेश आहे त्याने कोणाकडे पाहायचे? तुझी पत्नी इरा तिनं आयुष्य कसं जगायचं? तेंव्हा मित्रा जे झालं तो भूतकाळ झाला. सगळे व्यवस्थित होईल. डोके शांत ठेवा. मी पुढच्या चित्रपट बनवायला घेतोय. याचे संगीत देखील तूच करणार आहेस. मला माहिती आहे तू चांगला संगीतकार आहेस. तू चांगलं संगीत देतो. उद्याच आपण आपल्या नव्या चित्रपटाचा मुहूर्त करणार आहोत. चित्रपटाचे नाव आहे बावरे नैन!” (Singer Roshan)
===========
हे देखील वाचा : ‘आराधना’च्या यशात गुलशन नंदा यांचे क्रेडिट काय होते ?
==========
दिग्दर्शक किदार शर्मा यांनी रोशन यांना वेळीच समज दिल्यामुळे ते सावरले आणि पुन्हा कामाला लागले. ‘बावरे नैन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘खयालो मे किसी के इस तरह आया नही करते’,’ सून बैरी बलम सच बोल इब क्या होगा’,’ तेरी दुनिया में दिल लगता नही वापस बुला ले’ ही गाणी जबरदस्त लोकप्रिय ठरली. राज कपूर आणि गीता बाली यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. रोशन यांना खरी लोकप्रियता साठच्या दशकात लाभली. गीतकार साहीर लुधियानवी सोबत त्यांची खूप चांगली जोडी जमली. ‘बरसात की रात’ या चित्रपटातील तेरा मिनिटांच्या कव्वालीने रोशन यांचे नाव सर्वत्र पोहोचले. पुढे तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये हमखास कव्वाली असू लागली. साठच्या दशकातील मुस्लिम सामाजिक चित्रपटांना रोशन यांनी बहारदार संगीत दिले. १९६३ सालच्या ‘ताजमहल’ या चित्रपटाने सुवर्ण महोत्सवी यश मिळवले!