‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आमीर खानने ‘सरफरोश‘ सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यात का बदल केले?
आमीर खानच्या सरफरोश या चित्रपटाने या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत! मिस्टर परफेक्टनिस्ट ही बिरुदावली मिळवणारा अभिनेता आमिर खान आपल्या चित्रपटांच्या बाबत खूपच सिरीयस असतो. कुठलाही चित्रपट बनवताना तो आपले अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही. चित्रपटाचा स्वत: निर्माता / दिग्दर्शक असो किंवा नसो आपली प्रत्येक कलाकृतीही परफेक्टच असावी हा त्यांचा आग्रह असतो. ३० एप्रिल १९९९ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ (Sarfarosh) या चित्रपटाच्या बाबतचा एक किस्सा आमिर खानने स्वतः एका उपग्रह वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर टेस्ट ऑडीयंसला दाखवल्यानंतर या चित्रपटात तीन नव्याने सिन्स टाकले गेले होते. या तीन सीन्समुळे चित्रपटाला पूर्णत्व आले आणि सिनेमा सुपरहिट झाला. कोणते होते हे तीन सीन्स आणि काय होता हा किस्सा?
आमिर खान सुरुवातीपासूनच आपल्या चित्रपटांच्या बाबत खूप सिरीयस असतो. ‘सरफरोश’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन यांनी केले होते. यात आमिर खानची नायिका सोनाली बेंद्रे होती. नसिरुद्दीन शहा यांची एक प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. क्रॉस बॉर्डर टेररिझम हा विषय खूप चांगल्या पद्धतीने या चित्रपटात हाताळला गेला होता. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आमिर खानने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने त्याचे रफकट स्क्रीनिंग आपल्या ठराविक ऑडिअंस समोर केले.
या प्रेक्षकांमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा समावेश असतो. ‘सरफरोश’ (Sarfarosh) चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही होती की, ”हा चित्रपट एसीपी राठोड यांची कहाणी सांगणार आहे पण या चित्रपटात पोलीस कुठे दिसत नाही. याचा नायक पोलीस कमिशनर जरी असला तरी तो गझल ऐकतो, रोमँटिक सीन करतो त्यामुळे ही पोलीस मूवी वाटत नाही!” आमीर खान ला आश्चर्य वाटले कारण या अँगलने त्यांनी कधी विचारच केला नव्हता. एक तर एसीपी राठोड या सिनेमात कुठेच पोलीस युनिफॉर्म मध्ये कुठे दाखवला नव्हता कदाचित त्यामुळे प्रेक्षकांना असे वाटत असेल असे सुरुवातीला त्यांना वाटले. परंतु एक नाही, दोन नाही तर अनेक प्रेक्षकांनी हीच प्रतिक्रिया दिल्यानंतर आमिर खान आणि त्याच्या टीमला नक्कीच कुठेतरी गडबड झाली आहे याची जाणीव झाली!
त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटाची स्क्रिप्ट काढली आणि प्रेक्षकांनी सांगितलेल्या सूचनेनुसार यातील कमजोर कडी ओळखायला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटातील तीन स्पॉट ओळखले जिथे आपल्याला नक्कीच काहीतरी ॲडिशन करावे लागेल असे त्यांनी ठरवले. या तीन ठिकाणी त्यांनी नव्याने तीन तीन सीन्स लिहिले आणि तिथे टाकले. पहिला सीन एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडे आमिर खान जाऊन त्याची कान उघाडणी करतो आणि मुंबईच्या रस्त्यावर सोनाली बेंद्रेसोबत असताना, एका गुंडाचा पाठलाग करून तो त्याला पकडतो.
दुसऱ्या सीनमध्ये गुंड सुलेमानच्या आईच्या घरी जाऊन तिला समजावण्याचा होता तर तिसरा सीन ताब्यात असलेल्या गुंडांकडून अधिकची माहिती काढून घेण्याचा होता. या गुन्हेगाराची भूमिका नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी केली होती तो त्याचा पहिलाच स्क्रीन अॅपीअरन्स होता. आमिर खानने सांगितले, ”आम्हाला हे काहीच माहिती नव्हते. ‘तलाश’ चित्रपटाच्या वेळी जेव्हा नवाजुद्दीन माझ्यासोबत काम करत होता तेव्हा त्याने सांगितले की मी तुमच्यासोबत यापूर्वी देखील ‘सरफरोश’मध्ये (Sarfarosh) एक छोटी भूमिका केली होती!”
हे तीन सीन्स टाकल्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट ऑडियन्ससमोर स्क्रीनिंग करण्यात आले. आता मात्र ऑडियन्सला हा चित्रपट आवडला. ”मी माझ्या पहिल्या चित्रपटापासून म्हणजे ‘कयामत से कयामत तक’ पासून अशा प्रकारचे स्क्रीनिंग करतो. त्यातून मला प्रेक्षकांपर्यंत आपल्याकडून दिला जाणारा मेसेज व्यवस्थित जातो आहे की नाही हे टेस्ट करायचा असते. मी प्रत्येकाशी बोलतो. त्यांचं म्हणणं ऐकून घेतो. प्रत्येक वेळी मौलिक सूचना मिळेलच याची खात्री नसते. पण यातून बऱ्याचदा मला चांगला फीडबॅक मिळते.”
=========
हे देखील वाचा : शहीद: मनोजकुमारचा पहिला देशभक्तीपर चित्रपट!
=========
आमिर खान कधीच एकावेळी दोन चित्रपटाचे शूटिंग करत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, ”असं केल्याने माझ्यातील अभिनेत्याला आम्ही कन्फ्युज करत असतो. फक्त एकदाच असे झाले होते की ‘धूम थ्री’ आणि ‘पी के’ या दोन चित्रपटाच्या शूटिंग एकाच वेळी चालू होते. शक्यतो आमिर खान एकावेळी एकाच सिनेमाची शूटिंग करतो आणि त्यातून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर नवीन चित्रपटाचे प्लॅनिंग सुरू करतो. त्याच्या या परफेक्ट वागण्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणतात.
१९९९ साली आमिर खानचा ‘सरफरोश’ (Sarfarosh) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सुपरहिट सिनेमा सोबतच या वर्षी आमिर खानचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते १९४७ ‘अर्थ’ आणि ‘मन’. आमिर खानच्या संपूर्ण कला किर्दीत १९९९ हे एकमेव वर्ष होते ज्यावेळी त्याचे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. अर्थात या तीन ही सिनेमाचे शूटिंग हे वेगवेगळ्या वेळी झाले होते. योगायोगाने त्यांचे प्रदर्शन एकाच वर्षी झाले.