अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया भादुरी यांचा पहिला हिट सिनेमा ‘जंजीर’ जरी असला तरी त्यांची खऱ्या अर्थाने केमिस्ट्री ज्या सिनेमांमध्ये जुळलेली दिसली तो म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘अभिमान’. आज पन्नास वर्षानंतर ‘अभिमान’ एक कल्ट क्लासिक मूवी म्हणून ओळखला जातो. या सिनेमाच्या क्लायमॅक्स शूटिंगसाठी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांना त्यांचा हनिमून अर्धवट सोडून लंडन होऊन भारतात परत यावे लागले होते. मोठा गमतीशीर किस्सा आहे.
अमिताभ (Amitabh Bachchan) आणि जया यांचे लग्न ४ जून १९७३ रोजी झाले. त्यानंतर लगेच ते हनिमूनसाठी लंडनला गेले. परंतु ऋषिकेश मुखर्जी यांनी त्यांना फोन करून सांगितले की ‘अभिमान’ सिनेमाचा क्लायमॅक्सचा फक्त एक शॉट आपल्याला चित्रित करायचा आहे. हा शॉट झाला तरच आपला सिनेमा पूर्ण होईल आणि सेन्सर बोर्डाकडे दाखल करता येईल. सिनेमाच्या रिलीजची तयारी त्यांच्याकडून झाली होती. २७ जुलै १९७४ या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार होता. त्यामुळे वेळ हाताशी खूपच कमी होता. या कारणामुळे जया भादुरी आणि अमिताभ बच्चन तातडीने आपला हनिमून अर्धवट सोडून ते भारतात परत आले!
भारतात आल्यानंतर एअरपोर्टवरून ते दोघेही आपल्या घरी न जाता थेट शूटिंग लोकेशनला गेले आणि तिथे केवळ एक शॉट चित्रित करायचा राहिला होता तो पूर्ण केला. हा शॉट होता ‘तेरे मेरे मिलन की रैना’ या गाण्यानंतर दोघे थिएटरच्या बाहेर येतात आणि लोकांच्या घोळक्यामध्ये दिसतात. अमिताभ (Amitabh Bachchan) आणि जया पुन्हा एकत्र आल्याचे सगळेजण पाहतात. हाच तो शॉट होता. हा शॉट जोगेश्वरीच्या एका चित्रपटगृहाच्या बाहेर घेतला होता.
ऋषिकेश मुखर्जी यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. अमिताभ (Amitabh Bachchan) जया आल्या आल्या त्यांनी हा शॉट लगेच चित्रित केला आणि एडिटिंग करून ताबडतोब हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची २७ जुलै १९७३ ही तारीख त्यांना गाठता आली.
आता तुम्ही म्हणाल अमिताभ (Amitabh Bachchan) जया यांनी हनिमून अर्धवट टाकून एका शॉटसाठी येण्याचे नक्की कारण काय हेच होतं का? याचं आणखी महत्त्वाचे एक कारण असं होतं की या चित्रपटाला प्रोड्युस अमिताभ आणि जया यांनी केला होता. तुम्ही जर ‘अभिमान’ या चित्रपटाचे पोस्टर बारकाईने पाहिलं तर तिथे तुम्हाला ‘अमिया प्रेझेंट्स’ असे दिसेल. अमिया म्हणजे अमिताभ मधला ‘अमि’ आणि जया मधील ‘या’. जसे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा शॉर्ट फॉर्म विरूष्का असा होतो तसाच काहीस प्रकार होता.
‘अभिमान’ हा चित्रपट अमिताभ आणि जया यांनी प्रोड्यूस जरी केला असला तरी ऑफिशियली त्यांनी त्यांचे नाव कुठेही टाकले नव्हते. या सिनेमाचे निर्माते म्हणून त्यांनी त्यांच्या पर्सनल सेक्रेटरी यांचे नाव तिथे दिलं होतं. पवन कुमार आणि सुशीला कामत या त्यांच्या स्वीय सचिवांची नावे निर्माता म्हणून दिली होती. परंतु त्यावेळी पेपरवर्क स्ट्रॉंग नसल्यामुळे आज अमिताभ आणि जया म्हणू शकत नाही की हा चित्रपट आम्ही प्रोड्युस केला होता! पण या सिनेमासाठी त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले होते. ते पैसे लवकर रिकव्हर व्हावे म्हणून ती दोघे हनिमून अर्धवट सोडून मुंबईला आले होते.
==========
हे देखील वाचा : बॉबी सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी नशीब बलवत्तर म्हणून प्राण यांचे प्राण वाचले!
==========
या सिनेमाचे नाव आधी ‘राग रागिनी’ असे ठेवले होते. या सिनेमाचे कथानक ऋषिकेश मुखर्जी यांनी १९५५ सालीच ठरवले होते. असे म्हणतात किशोर कुमार आणि त्यांची पहिली पत्नी रुमादेवी यांच्या जीवनावर आधारित ही कथा होती. तर काहीजण म्हणतात पंडित रविशंकर आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावर हे कथानक आहे. आपल्या समाजातील पुरुषी अहंकाराचे चांगले चित्रण या सिनेमात केले होते. या चित्रपटातील ‘तेरे मेरे मिलन की ये रैना…’ हे गाणं एका रवींद्र संगीतावरून (जोदी तारे नई चीनी गो शेकी..) घेतलं होतं याच रवींद्र संगीतावरून पुढे बारा वर्षांनी बप्पी लहरी यांनी ‘झूठी’ या चित्रपटातील ‘चंदा देखे चंदा…’ हे गाणं बनवलं होतं.
आता पुन्हा कधी तुम्ही हा चित्रपट पाहाल किंवा त्याचे पोस्टर पाहाल तेव्हा त्याकडे बारकाईने पहा तिथे तुम्हाला अमिया या प्रेझेंट्स असे दिसेल. अमिया या म्हणजे अमिताभ आणि जया!