नुसरत फतेह अली यांना पाहून आनंद बक्षी यांचे डोळे का पाणावले?
कधी कधी आयुष्यात आपण कळत नकळतपणे विनाकारण कुणाबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतो आणि त्या पद्धतीने तसेच वर्तन देखील करतो पण सत्य परिस्थिती लक्षात आल्यानंतर मनाला खूपच वेदना होतात! पुढे आयुष्यभर हि ठसठसणारी जखम ठरते. असाच काहीसा प्रकार गीतकार आनंद बक्षी (Anand Bakshi) यांच्या बाबत झाला. त्यांच्या पुस्तकात ही आठवण नमूद केली आहे. कुणाबाबत त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला होता? आणि काय होता एकंदरीत हा किस्सा?
ही घटना नव्वदच्या दशकातील आहे. या काळात आनंद बक्षी (Anand Bakshi) हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील गीतकारांच्या दुनियेतील बॉस होते. त्यांनी लिहिलेली गाणी चित्रपटात असावी असे प्रत्येक निर्मात्याला वाटत होते. १९९६ साली दिग्दर्शक मिलन लुथ्रिया ‘कच्चे धागे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. हा त्यांचा दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला संगीत पाकिस्तानी संगीतकार नुसरत फतेह अली खान यांचे होते. हे संगीत देण्यासाठी ते मुंबईला आले होते. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी लिहिणार होते.
संगीतकार नुसरत फतेह अली खान यांचा मुक्काम मुंबईच्या एका हॉटेलमध्ये होता. तिथूनच ते काम करीत होते. त्यावेळी त्यांची तब्येत बरी नसायची ते ओव्हरवेट झाले होते. तब्बल १४० किलो वजन त्यांचे झाले होते. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर खूप मर्यादा येत होत्या. तरी देखील ते मोठ्या उत्साहात काम करत असायचे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांना हॉटेलवर भेटायला बोलावले. आनंद बक्षी (Anand Bakshi) त्यावेळेला स्टार गीतकार होते. त्यांचा थोडा इगो हर्ट झाला. एक पाकिस्तानी संगीतकार मला बोलावून घेतो हे त्यांना तितकेसे आवडले नाही.
त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि घरूनच गाणी लिहून त्यांच्याकडे पाठवून दिली. त्यांनी पाठवलेल्या गाण्यांमध्ये नुसरत फतेह अली खान यांना काही बदल हवे होते म्हणून त्यांनी काही टेप्स रेकॉर्ड करून त्यांच्याकडे पाठवल्या. आनंद बक्षी (Anand Bakshi) यांनी पुन्हा त्यावर काही गाणी लिहून पाठवले. पण हे असं दूर राहून काम करणं शक्य नव्हतं. पंधरा-वीस दिवस झाले एकही गाणं तयार होत नव्हतं. नुसरत फतेह अली खान वैतागले. शेवटी ते त्यांच्या साथीदारांना म्हणाले, ”मला उचला आणि आनंद बक्षी यांच्या घरी घेऊन चला!” त्या पद्धतीने सात आठ जणांनी नुसरत फतेह अली यांना अक्षरशः उचलून आनंद बक्षी यांच्याकडे घेऊन गेले.
तेव्हा बक्षी पहिल्या मजल्यावर राहत होते. थोडीशी हालचाल करतानाही त्यांना प्रचंड वेदना होत होत्या आणि त्यांचा अवजड देह उचलून आणताना त्यांच्या सहकाऱ्यांना देखील प्रचंड त्रास होत होता. अशा आजारी अवस्थेतील नुसरत फतेह अली खान यांना पाहिल्यानंतर आनंद बक्षी (Anand Bakshi) यांचे डोळे उघडले आणि ते प्रचंड खजील झाले. आपण काय समजलो होतो आणि आता काय पाहत आहोत हे समजल्यावर त्यांना प्रचंड मनस्ताप झाला.
नुसरत फतेह अली खान म्हणाले,”याच कारणामुळे मी तुमच्याकडे येत नव्हतो.” आनंद बक्षी (Anand Bakshi) यांच्या मनाला खूपच लागले ते म्हणाले,” माफ करा. मला तुमची परिस्थिती माहीत नव्हती. चला आता मीच हॉटेलमध्ये राहायला येतो!” असे म्हणून ते दोघे पुन्हा हॉटेलमध्ये गेले आणि पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये त्यांनी चित्रपटाची सर्व गाणी तयार केली! आज ‘कच्चे धागे’ हा चित्रपट कुणाला आठवत जरी नसला तरी नव्वदच्या दशकातील हा एक म्युझिकल हिट सिनेमा म्हणून त्याची नोंद झाली होती. भलेही चित्रपटाला व्यवसायिक यश फारसे मिळाले नाही पण यातली गाणी मात्र खूप काळ गाजत होती.
यातील एक गाणे हंस राज हंस यांनी गायले होते ते त्यांचे पहिलेच गाणे होते. या गाण्यासाठी फतेह अली यांनी त्याला खास बोलवून घेतले. गाण्याची ट्यून ऐकून हंस राज हंस खूप घाबरले ते म्हणाले,” हे गाणे खूपच वरच्या पट्टीतील आहे! मला जमेल का?” त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यावर नुसरत फतेह अली खान म्हणाले “आता याचा तू विचार करू नको. इथे आता किती तरी सिंगर मुंबईमध्ये आहे. पण मी तुला का बोलावले? कारण मला तुझी क्वालिटी माहित आहे. आता चांगले गा आणि माझे नाव खराब करून नकोस.” हे गाणे होते ‘खाली दिल नही जान भी मंगदा’.
===========
हे देखील वाचा : सिनेमात सिच्युएशन आणि गाण्यात लॉजिक नसताना ही, दोन्ही झाले सुपर हिट!
===========
या चित्रपटात लता मंगेशकर यांनीदेखील दोन गाणी गायली होती. सुखविंदर सिंग, कुमार सानू, अलका याज्ञिक यांचीदेखील या चित्रपटात गाणी होती. या सिनेमातील सर्वच गाणी पंजाब आणि पाकिस्तानातील लोक संगीतावर आधारलेली होती. दुर्दैवाने नुसरत फतेह अली खान यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे संगीत देतानाच त्यांचे निधन झाले. यातली काही गाणी त्यांच्या मृत्यूनंतर रेकॉर्ड करण्यात आली. आनंद बक्षी (Anand Bakshi) यांना मात्र आपण विनाकारण एखादयाव्यक्ती सोबत गैरसमज करून घेतला आणि इगो ठेवून वागत राहिलो याचा पश्चाताप खूप वर्ष होत होता!