Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा झळकली १९८४ साली राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटात. सिनेमा लो बजेट होता आणि फार चालला देखील नाही. त्यामुळे तिची दखल फारशी कुणी नाही घेतली. अपवाद फक्त छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष. त्याला माधुरीचा चेहरा फोटोजनिक तर वाटतच होता शिवाय सिनेमा या माध्यमासाठी अगदी परफेक्ट आहे असे त्याचे सुरुवाती पासून मत होते. पहिला सिनेमा अपयशी ठरला तरी माधुरीला हे माध्यम आवडलं होतं.
त्यानंतर आवारा बाप, स्वाती, हिफाजत, उत्तर दक्षिण, मोहरे, खतरो के खिलाडी या चित्रपटांमध्ये अगदी छोट्या छोट्या भूमिकेत ती पडद्यावर दिसत होती. तिच्यातील टॅलेंट खरं ओळखलं होतं गौतम राजाध्यक्ष यांनी. तिचे सिनेमे जरी अपयशी होत असले तरी तिच्या अनेक अप्रतिम छायाचित्रांनी त्या काळातील सिनेमासिके सजली गेली. यातूनच माधुरी ला एन चंद्रा यांचा ‘तेजाब’ आणि फिरोझ खान चा ‘दयावान’ हे सिनेमे मिळाले. एक – दीड महिन्याच्या अंतरानी हे दोन्हीए सिनेमे झळकले. (Madhuri Dixit)

२९ सप्टेंबर १९८८ रोजी ‘दयावान’ झळकला. सिनेमाचा सगळा फोकस विनोद खन्ना वर जरी असला तरी माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या प्रदीर्घ चुंबन दृश्याने सिनेमा चर्चेत राहिला. माधुरीवर या शॉट वरून भरपूर टीका देखील झाली. ११ नोव्हेंबर १९८८ दिवाळीच्या मुहूर्तावर ‘तेजाब’ रिलीज झाला. (या दिवशी माधुरी भारतात नव्हती तर अमेरिकेत होती.)‘तेजाब’ ला देशभर प्रचंड यश मिळाले. माधुरीच्या ‘एक दोन तीन…’ या गाण्यावर सारा देश थिरकू लागला. एका चित्रपटाने एका झटक्यात माधुरी लाखो रसिकांच्या दिलाची राणी बनली!
यानंतर तिच्या यशाचा मार्ग प्रशस्त झाला. सुभाष घई (Subhash Ghai) यांच्या ‘कर्मा’ या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका केली होती एका गाण्यापुरती. त्या वेळेस त्यांनी तिला शब्द दिला होता “तुला लवकरच मी माझ्या नव्या प्रोजेक्टमध्ये घेईल.” त्यांनी तो शब्द पाळला आणि १९८९ सालच्या ‘राम लखन’ या चित्रपटात तिला प्रमुख नायिकेची भूमिका दिली. यानंतर इंद्रकुमार यांच्या ‘दिल’ (१९९०) या चित्रपटात तिचा नायक होता अमीर खान (Amir Khan).
या सिनेमातील भूमिकेसाठी माधुरीला पहिले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. नंतर तिच्या हिट सिनेमांची रांगच लागली. साजन, प्रहार, बेटा (यातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून दुसरे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले), खलनायक, हम आपके है कौन (यातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून तिसरे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले).. यानंतर मात्र माधुरीच्या चित्रपटांना अनपेक्षितपणे अपयशाचा सामना करावा लागू लागला. (Madhuri Dixit)
लागोपाठ तिचे सिनेमे अपयशी ठरू लागले मग तो ऋषी कपूर सोबतचा याराना असो किंवा प्रेम ग्रंथ, शाहरुख सोबतचा कोयला असो, अयुब खान सोबतच मृत्युदंड असो किंवा संजय कपूर सोबतचा ‘राजा’ असो. त्यामुळे आता मिडीया मध्ये तिच्यावर टीका सुरू झाली. १९९५ ते १९९७ हे तीन वर्षे अशी अपयशाच्या गर्तेत गेली. समीक्षकांनी ती फक्त डान्स मध्ये पारंगत आहे इथपर्यंत म्हणायला सुरुवात केली. माधुरीने त्यावेळी एका मुलाखतीत सांगितले होते की,” या टीकेने मी फार काही दुःखी झाले नाही. पण इरीटेट मात्र नक्की झाले.” समीक्षकांनी तर आता माधुरी लवकरच पॅकअप करून सिन इंडस्ट्रीतून बाहेर पडणार इथपर्यंत सांगायला सुरुवात केली.

पण त्याच वेळी ३० ऑक्टोबर १९९७ रोजी यश चोप्रा यांचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट आला. या सिनेमाने प्रचंड मोठे यश मिळवले. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि माधुरी या जोडीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या सिनेमातील भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला सर्वोत्कृष्ट नायिकेचा फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी माधुरी जेव्हा स्टेजवर गेली आणि हातात माईक घेऊन तिने सांगितले,” हा पुरस्कार मी माझ्या क्रिटीक्सला टीकाकारांना समर्पित करते.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
जे लोक माझ्या पॅकअप ची वाट पाहत होते कदाचित या पुरस्कारानंतर आता त्यांची माझ्या बाबतची मते आता तरी बदलतील अशी मी आशा करते. अर्थात तुमच्या टिकेतूनच मी पुन्हा एकदा सक्षमपणे उभे राहिले आहे हे नक्की. त्यामुळेच हा पुरस्कार मी तुम्हा समीक्षकांना समर्पित करते. तुमचे आभार देखील मानते.” यानंतर पुन्हा माधुरीचा जलवा सुरू झाला. १७ ऑक्टोबर १९९९ रोजी तिने डॉक्टर श्रीराम मेने यांच्यासोबत लग्न केले. पुढे काही दिवस तिने सिनेमासाठी ब्रेक घेतला पण नंतरच्या काळात तिचा ‘देवदास’ (२००२) हा चित्रपट आला. या सिनेमासाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) मिळाला.
माधुरीच्या (Madhuri Dixit) यशामध्ये तिच्या नृत्याचा नक्कीच वाटा होता.(पण ती चांगली अभिनेत्री होती.) सरोज खान या कोरिओग्राफरला तिने कायम याचे श्रेय दिले. माधुरीचे डान्स नंबर आज देखील पॉप्युलर आहे तिच्या अनेक गाण्यांचे रिमिक्स झाले आहेत काही गाणे नव्याने पुन्हा नवीन कलावंतांवर चित्रित देखील झालेले आहेत. जसे ‘एक दोन तीन’ तेजाब चे गाणे जॅकलीन वर चित्रित झाले. तर ‘तम्मा तम्मा लोगे..’ हे गाणे आलिया भट आणि वरून धवन यांच्यावर चित्रित झाले होते. माधुरीच्या नृत्याचा तिच्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे. आज देखील माधुरीची एक दोन तीन (तेजाब) मेरा पिया घर आया (याराना) तू शायर है (साजन) हम पे ये किसने हरा रंग डाला (देवदास) ही गाणी रसिक विसरलेले नाहीत.