
राजकपूर यांनी चायनाचे निमंत्रण का नाकारले?
कलावंत आणि रसिकांचं अतूट असं नातं असतं. रसिकांच्या मनातील आपली इमेज जपण्याचा प्रयत्न प्रत्येक कलाकार हा कायम करत असतो. मग तो कलाकार आपल्या देशातील असो किंवा परदेशातील. कलावंताचे आपल्या रसिकांवर आणि रसिकांचे आपल्या लाडक्या कलावंतावर अतूट प्रेम असते. मात्र यातून कधीकधी काही गमतीशीर प्रसंग देखील अनुभवायला मिळतात.

ग्रेटेस्ट शोमॅन राजकपूर (Raj Kapoor) यांच्याबाबतचा हा एक मजेदार किस्सा आहे. हा किस्सा मजेदार जरी असला तरी त्यातून कलावंतांची रसिकाप्रति असलेली प्रेमाची भावना यातून लक्षात येते. राजकपूर (Raj Kapoor) यांचे चिरंजीव रणधीर कपूर यांनी एका कार्यक्रमात ही आठवण सांगितली होती. साधारणत: सत्तरच्या दशकाच्या अखेरीस एकदा अटल बिहारी वाजपेयी राजकपूर यांना भेटले होते आणि त्यांनी सांगितले की, ”चीनमध्ये तुमची आणि तुमच्या सिनेमांची लोकप्रियता प्रचंड आहे!” 22 फेब्रुवारी १९७९ रोजी परराष्ट्र मंत्री या नात्याने ते चीनला गेले होते. तेंव्हा त्यांनी तिथल्या जनतेचा कल्चरल मूड बघितला होता. हे ऐकून राजकपूर यांना खूप आनंद झाला.
नंतर काही दिवसांनी चीन मधील एका सांस्कृतिक मंडळाकडून राजकपूर यांना तिथे एका कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण आले. राजकपूर (Raj Kapoor) खूप खूष झाले. आपल्या चाहत्यांकडून आलेल्या या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला आणि घरी सर्वांना सांगितले की, ”आपण सर्वजण आता चीनला जाणार आहोत. तिथल्या माझ्या रसिक चाहत्यांनी मला बोलावले आहे!” घरी सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. चीनला जाण्याची प्राथमिक तयारी देखील सुरू झाली. पण त्यानंतर काही दिवसांनी राजकपूर यांनी सांगितले की.”आपण चीनला नको जायला!!” घरच्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले.

रणधीर कपूर म्हणाले,”पापा जी आप ही ने तो कहा था. आप कितने खुश थे उस दिन.” त्यावर राज कपूर म्हणाले,”बरोबर आहे. त्या दिवशीची माझी ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पण नंतर मी विचार केला की, चीनमधील माझे रसिक मला ओळखतात ते माझ्या आवारा, श्री 420, अनाडी, चोरी चोरी या चित्रपटातील इमेजला. त्यांच्या मनातील राजकपूर (Raj Kapoor) हा तरुण, स्लिम अँड ट्रिम आहे. आज माझी साईज पहा. केवढा जाड आणि बेढब झालो आहे. अशा या बेढब शरीराने घेऊन मी त्यांच्या मनातील चांगल्या इमेज वर का आक्रमण करू? त्यांच्या मनातील माझी जी इमेज आहे तीच राहू द्यायला पाहिजे. त्यामुळेच मी चायनाला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे!”

रणधीर कपूर म्हणाले, ”तुम्ही रशियाला तर कितीदा जाता. अजूनही जाता.” त्यावेळेला ते म्हणाले, ”मी रशियाला दरवर्षी जात असतो. तिथल्या लोकांना माझी बदलती वाढती साईज माहित आहे. त्यांनी माझी सगळी रूपे पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना माझं हे जाडजूड शरीर पाहून काही वाटत नाही. त्यामुळे मी तिथे जात असतो. पण चायनाचे तसे नाही. त्यामुळे मी कॅन्सल करत आहे.” या कार्यक्रमात रणधीर कपूर म्हणाले की, ”चायना मधून राजकपूर (Raj Kapoor) यांना त्या नंतर ही खूपदा निमंत्रण आली पण प्रत्येक वेळी पापाजींनी ती नाकारली.
============
हे देखील वाचा : ‘मुसाफिर हूं यारो…’ गाण्याच्या निर्मितीचा भावस्पर्शी किस्सा!
============
आयुष्यात पापाजी कधीही चायनाला गेले नाहीत पण राज कपूरचे (Raj Kapoor) सर्व सिनेमे चायना मध्ये प्रचंड लोकप्रिय होते, आहेत. खरं तर आम्ही कधीही चायनाला चित्रपट दिले नाहीत. रशिया मधील वितरक आमचे सिनेमे चायनाला पाठवत. आणि तिकडे प्रदर्शित. भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने चायनामध्ये मार्केट राज कपूर यांच्या सिनेमानी मिळवून दिले!”आज चायना मध्ये भारतीय सिनेमे अधिकृतरित्या प्रदर्शित होतात. आमीर खान यांच्या ‘दंगल’ या सिनेमे चायनात करोडो रुपये कमावले होते.