मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
सुरैय्याने दिलीप कुमार काम न करण्याचा निर्णय का घेतला?
सिनेमाच्या दुनियेत खूप योगायोगाचे आणि गमतीचे प्रसंग घडतात. अभिनेता दिलीप कुमार आणि गायिका अभिनेत्री सुरैया (Suraiya) हे दोघे तसे समकालीन. पण या दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही. खरं तर या दोघांना घेऊन एका चित्रपटाची निर्मिती सुरू झाली होती. शूटिंग देखील सुरू झाले होते. पण नंतर असे काय घडले की हा चित्रपट बंद पडला? आणि या सिनेमाच्या सेटवरच सुरैय्याने आयुष्यात कधीही दिलीप कुमारसोबत काम करायचे नाही अशी शपथ घेतली ! असा कोणता प्रसंग घडला काय होता? हा किस्सा गमतीदार आहे. कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हा प्रसंग घडला होता?
गायिका अभिनेत्री सुरैय्या (Suraiya) ही चाळीसच्या दशकाच्या अखेरीस आणि पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला टॉपची अभिनेत्री होती. तिचा चित्रपट म्हणजे हमखास यशाची हमी असायची. तिच्याकडे कुठलाही निर्माता आला की त्याची कथानक सुरुवातीला तिची आई आणि आजी ऐकायची. त्या दोघी सुरैय्या बाबत खूप दक्ष असायच्या. सुरेय्याने चित्रपटात अजिबात अंगप्रदर्शन करू नये, तिच्या सौंदर्याचा कुणी गैरफायदा घेवू नये यासाठी त्या डोळ्यात तेल घालून सेट वर वावरत. कथानक आवडल्या नंतर त्या ग्रीन सिग्नल द्यायच्या आणि सुरैय्याला म्हणायच्या, ”बेटी, दे दो इसको भी एक जुबली हिट सिनेमा !“ याचा अर्थ सुरैय्याने काम केलेला प्रत्येक चित्रपट हा कमीत कमी सिल्वर जुबली होणार याची खात्री त्या दोघींना असायची.
अभिनेता दिलीप कुमार पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला हळूहळू लोकप्रिय स्टार होत होता. के असिफ यांच्यासोबत १९५१ साली त्याचा एक चित्रपट आला होता ‘हलचल’. या सिनेमाला चांगले यश मिळाले. या सिनेमापासून के आसिफ आणि दिलीप कुमार यांची चांगली मैत्री झाली. दिलीप एकदा असिफ यांना म्हणाला की, ”माझी एक तमन्ना आहे मला सुरैय्यासोबत एखादा चित्रपट करायला मिळाला पाहिजे!” मित्राची इच्छा ऐकल्यावर असिफने लगेच सुरैय्याला गाठले आणि दिलीप कुमारसोबत एका चित्रपटाची निर्मिती करायची ठरवले.
चित्रपटाचे नाव ठरले जानवर. दिलीप आणि सुरैय्याचा हा पहिलाच सिनेमा होता. त्यामुळे या सिनेमाची मिडीयात हवा झाली होती. १९५२ साली या सिनेमाचे रीतसर शूटिंग सुरू झाले. या चित्रपटात पहिलाच शॉट असा होता ज्यात नायिका सुरैय्या हीच्या पायाला जंगलात एक सर्प दंश करतो. नायक दिलीप कुमार लगेच तिच्या पायाला जिथे सापाने दोष केला आहे तो भाग आपल्या ओठाने चोखून त्यातील विषारी रक्त बाहेर टाकतो असा प्रसंग होता. सर्पदंश नेमका सुरैय्याच्या (Suraiya) पोटरीला होतो असे दाखवले होते. त्यामुळे दिलीप कुमार तिच्या पोटरीला ओठाने चोखत होता. बरं या शॉटची रिहर्सल तब्बल दोन दिवस चालली. तरी शॉर्ट काही ओके होत नव्हता. दिवसभर हाच एक शॉट होत होता.
हळूहळू आता सुरैय्या असे वाटू लागले की दिलीप कुमार मुद्दाम या सिच्युएशनचा गैरफायदा घेत आहे आणि या इंटीमेट सीनमध्ये तो मजा देखील घेत आहे. दिग्दर्शक के आसिफ यांची देखील त्याला साथ आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा हाच शॉट सुरू झाला तेव्हा मात्र सुरैय्या (Suraiya) रागाचा पारा चढला आणि तिने दिलीप कुमारला भरपूर झापले. सुरैय्याचा काका जहूर तर दिलीप कुमारला मारायला धावला. के असिफमध्ये पडला आणि अनर्थ टळला. सेटवर खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले. असे म्हणतात रागाच्या भरात सुरैय्याने आपला हात दिलीप कुमारवर साफ करून घेतला!
========
हे देखील वाचा : हरिहरन: गायकीवर प्रचंड हुकूमत असलेला प्रतिभा संपन्न कलाकार
========
सुरैय्याने (Suraiya) रागाच्या भरात, ”मी हा चित्रपट सोडत आहे आणि आयुष्यात मी पुन्हा कधी दिलीप कुमारसोबत काम करणार नाही!” असे सांगितले आणि ती सेटवरून ताडकन निघून जायला लागली. के असिफ यांनी थांबण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. शेवटी ते म्हणाले, ”पण या सिनेमाचा माझा जो काही खर्च झाला आहे त्याचे काय?” त्यावर पर्समधून तिने चेकबुक काढले आणि ब्लॅक चेक सही करून त्याच्या तोंडावर फेकला! आणि ती तावातावाने सेट वरुन निघून गेली.
आयुष्यात पुढे कधीच तिने दिलीप कुमारसोबत काम केले नाही! अर्थात बऱ्याच वर्षांनी एका सिने मासिकाला मुलाखत देताना तिने सांगितले की, ”खरंतर मी थोडा राग आवरायला हवा होता.” पण तरुणाईतील तो बेफाम राग तिला आवरता आला नाही आणि दिलीप कुमारसोबत तिचा एकही चित्रपट आला नाही!