
यश चोप्रा त्यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना का कचरले ?
सत्तरच्या दशकापासून हिंदी सिनेमातील प्रेम कथांचा चेहरा मोहरा बदलणारे दिग्दर्शक यश चोप्रा यांचा उल्लेख रोमँटिक सिनेमाचा बादशहा असा केला जातो. त्यांनी प्रेमपट बनवताना प्रेमाची परिभाषाच बदलवून टाकली. त्याचं अफलातून दिग्दर्शन त्यांचं सादरीकरण, त्यातील प्रेमाची उत्कटता, त्यांच्या चित्रपटातील संगीत, त्यांच्या चित्रपटातील शूटिंग लोकेशन्स यामुळे यश चोप्रा हे बॉलीवूड मधील यशस्वी चित्रपट दिग्दर्शक बनले. त्यांच्या दाग, त्रिशूल, दिवार, सिलसिला. चांदनी, वीर-झारा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश कमावले. (Yash Chopra)
पण तुम्हाला माहित आहे का ? त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या वेळी त्यांच्या समोर फार मोठे आव्हान निर्माण झाले होते. तो चित्रपट दिग्दर्शन करायला ते कचरत होते. ते चक्क बॅकफूटवर चालले होते. पण त्यांचे बंधू बी आर चोप्रा यांनी त्यांना हिम्मत दिली आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे ते एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शक बनू शकले. त्यांच्या या पहिल्या डायरेक्शनल डेब्यू चा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. आपले मोठे बंधू बी आर चोप्रा यांच्यासोबत अनेक वर्ष सहाय्यकाची भूमिका निभावल्या नंतर त्यांना १९५९ साली ‘धूल का फूल’ हा चित्रपट स्वतंत्र पणे दिग्दर्शन करण्यासाठी मिळाला.

हा त्यांचा दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात ची कथा त्या काळाच्या मानाने खूपच बोल्ड होती. विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेली अनौरस संतती, त्यातून निर्माण झालेले प्रश्न हा विषय या चित्रपटात हाताळला. काळाच्या मानाने हा खूप पुढचा विषय होता. कुमारी मातेचा प्रश्न देखील यामध्ये होता. त्यामुळे यश चोप्रांसाठी (Yash Chopra) हा हाय होल्टेज ड्रामा चित्रपट दिग्दर्शन करणे हे एक आव्हानच होते. या चित्रपटाची स्टार कास्ट होती. राजेंद्र कुमार, माला सिन्हा, नंदा आणि राजकुमार ! राजकुमार हे नाव वाचून तुम्ही म्हणाल या चित्रपटात राजकुमार कुठे होता ? बरोबर आहे तुमचं म्हणणं. या चित्रपटात आधी राजकुमारला देखील भूमिका होती. परंतु नंतर त्याच्या जागी अशोक कुमारला घेण्यात आले. नेमकं काय कारण झालं होतं राजकुमारला या चित्रपटातून काढून टाकण्याचे ?
हा चित्रपट जेव्हा राजकुमार ने साईन केला तेव्हा त्याला हा चित्रपट बी आर चोपडा दिग्दर्शित करणार आहेत असेच वाटले. पण जेव्हा त्यांना कळाले की हा चित्रपट बी आर चोप्रा नाही तर त्यांचे धाकटे बंधू यश चोप्रा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तेव्हा ते बी आर चोप्रांना म्हणाले,” ते सर्व ठीक आहे. चित्रपट मी करेनच. पण सेटवर तुम्ही उपस्थित असणार ना?” तेव्हा बी आर चोप्रा म्हणाले,” नाही! हा चित्रपट माझा भाऊ दिग्दर्शित करीत आहे. त्यात मी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही.” ते ऐकून राजकुमारला थोडेसे आश्चर्य वाटले आणि यश चोप्रा (Yash Chopra) हा चित्रपट दिग्दर्शित करू शकेल का याची शंका देखील त्याने बोलून दाखवली. यश चोप्राला जेव्हा राजकुमारचे आपल्या बाबतचे हे मत कळाले तेव्हा ते बी आर चोप्रांना म्हणाले,” राजकुमार म्हणतो ते बरोबर आहे. एवढा मोठा विषय मी हाताळू शकेल का? याची शंका मला देखील आहे. कृपा करून तुम्ही स्वतः या चित्रपटाचे दर्शन करा किंवा दुसरा कुणी दिग्दर्शक म्हणून घ्या. मी त्यांना सहाय्य करेल.” त्यावर बी आर चोप्रा म्हणाले,” हे बघ मी खूप विचार करून हा चित्रपट तुला दिग्दर्शनासाठी देत आहे. कोण काय म्हणत आहे याच्याकडे लक्ष देऊ नकोस. सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. आता या चित्रपटाचा नायक बदलू शकतो, नायिका बदलू शकते, संगीतकार बदलू शकतो पण आता दिग्दर्शक कुठल्याही परिस्थितीत बदलू शकत नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन तूच करणार आहेस आणि मला खात्री आहे तू चांगल्या पद्धतीने चित्रपटाचे दिग्दर्शन करशील !”
इतके ठाम आणि स्पष्ट मत ऐकल्यानंतर यश चोप्रांना आत्मविश्वास आला आणि ते दिग्दर्शनाला तयार झाले परंतु राजकुमारचे नाराजी कायमच होती. त्यामुळे बी आर चोप्रांनी तो महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यांनी राजकुमार याला चित्रपटातून काढून टाकत त्याच्या जागी अशोक कुमारला चित्रपटात घेतले. कुमारी माता, विवाहपूर्व संबंधातून जन्माला आलेले मूल, एका मुस्लिम व्यक्तीने या मुलाला सांभाळणे ही सर्व इंटरेस्टिंग स्टोरी पंडित मुखराम शर्मा यांनी लिहिली होती. (त्यांना या चित्रपटासाठी फिल्मफेअर चा पुरस्कार देखील मिळाला.) यश चोप्रानी मोठ्या आत्मविश्वासाने चित्रपट दिग्दर्शित केला आणि सिनेमाला मोठे यश लाभले. चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी पार्टीला राजकुमार ने देखील हजेरी लावली आणि त्याने तोंड भरून यश चोप्रांचे कौतुक केले आणि आपला गैरसमज झाला होता असे देखील सांगितले. सर्वांनी परस्परांना माफ केले. आणि राजकुमारला पुढच्या वक्त या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका यश चोप्रा यांनी दिली !
============
हे देखील वाचा : ‘कहो ना.. प्यार है’ या फिल्मची चोविशी…
=============
अशा प्रकारे यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या दिग्दर्शनातील पहिलाच प्रयोग असलेल्या ‘धूल का फूल’ ला मोठे यश मिळाले आणि त्यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. या चित्रपटातील गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर त्याला संगीत एन दत्ता यांनी दिली होती. ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’, ‘तू मेरे प्यार का फुल है’, ‘झुकती हवा गाती घटा सापाने सजाये‘, ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ ही सर्वच गाणी जबरदस्त गाजली. त्यामुळेच हा चित्रपट एक ऑल टाईम हिट सिनेमा बनला आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनी पहिल्याच चित्रपटात द्वारे सणसणीत षटकार ठोकून आपले कर्तृत्व सिद्ध केले.