ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘हे’ भारतीय गाणे चीनच्या पंतप्रधानासमोर का गातात ?
‘अतिथी देवो भव:’ अशी आपल्या कडील पद्धत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अतिथीला देवासारखी ट्रीटमेंट दिली जाते. यातून बऱ्याचदा गमतीदार प्रसंग घडतात. कधी कधी वेळ मारून न्यावी लागते. गायक तलत महमूद यांच्यावर एकदा असाच बाका प्रसंग आला होता. तसा हा खूप गमतीदार किस्सा आहे.
या प्रसंगात तलत. महमूदला चक्क मुकेशचे एक गाणे गावे लागले होते ! काय होत हा किस्सा? कोणते होते ते गाणे? हा किस्सा १९५६ सालचा आहे आणि स्पेसिफिक सांगायचे तर भारत चीन युद्धाच्या खूप आधीचा किस्सा आहे. त्यावेळी चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाई भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्याकाळात भारत आणि चीनमध्ये बऱ्यापैकी संबंध होते. ‘हिंदी चिनी भाई भाई’ असे लोकप्रिय नारे त्या वेळेला दिले जात होते. त्या काळातला हा किस्सा आहे. (Talat Mahmood)
या काळात चीन च्या पंतप्रधानाचा भारत दौरा होता. चीनच्या पंतप्रधानाच्या दौऱ्यात त्यांची जबरदस्त सरबराई करण्यात आली होती. दौरा शासकीय असल्याने कुठलीही उणीव भासू दिली जात नव्हती. मुंबईला आल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ मोठा शाही खाना देण्यात आला. त्यासोबतच एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती. संगीतमय कार्यक्रमांमध्ये तलत महमूद गीता दत्त यांची खास उपस्थिती होती. तेव्हा मुंबईचे राज्यपाल एम सी छागला होते. या कार्यक्रमाचे आयोजन टाइम्स ऑफ इंडियाचे जैन यांनी केले होते. (Talat Mahmood)
या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात तलत यांच्या एका गाण्याने झाली. त्यानंतर गीता दत्त यांनी देखील आपले गाणे गायले. पण त्यावेळी चीनचे पंतप्रधान राज्यपालांच्या कानात काहीतरी सांगत होते. राज्यपालांनी त्यांचे म्हणणे जैन यांना सांगितले. चीनच्या पंतप्रधानांनी ‘आवारा हू…’ या मुकेशच्या गाण्याची फर्माईश केली होती. कारण राज कपूरचा ‘आवारा’ रशिया आणि चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटातील ‘आवारा हू या गर्दिश मे हु आसमान का तारा हू….’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. चीनच्या पंतप्रधानांना नेमकं तेच गाणं ऐकायचं होतं. त्यांना हे गाणं कोणी गायलं आहे वगैरे काही माहिती नव्हतं. त्यांना फक्त गाणं माहीत होतं. आणि आता त्यांना ते गाणं ऐकायचे होते. या कार्यक्रमात मुकेश उपस्थित नव्हते. आता काय करायचे” पाहुण्यांची आवड, फर्माईश पूर्ण तर करायलाच पाहिजे. ‘अतिथी देवो भव:’
जैन साहेबांनी तलत महमूदला बोलावले आणि पाहुण्यांची आवड सांगितली. त्यावर तलत म्हणाला,” ते कसे शक्य आहे? ते गाणं मुकेश यांनी गायले आहे. मला ते गाण्याचे शब्द देखील माहित नाहीत!” त्यावर जैन साहेब हात जोडून म्हणाले,” शब्द कोणाला पाहिजेत? तुम्ही फक्त चाली मध्ये ते गाणं म्हणा. गाण्याच्या मध्ये कुठलेही शब्द टाका त्यांना काही कळणार नाही! आपल्याला त्यांच्या शब्दाचा मान ठेवायला पाहिजे. कारण ते भारताचे शाही पाहुणे आहेत !” तलत यांनी देखील तो बाका प्रसंग ओळखला. (Talat Mahmood)
============
हे देखील वाचा : भारतातील पहिला एक कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा
============
लगेच गीता दत्त आणि ते स्टेजसच्या मागे गेले आणि थोडीफार प्रॅक्टिस केली. मुखडा तर त्यांना माहीत होता. कडवे अजिबात माहीत नव्हते. आता काय करायचं? ते म्हणाले ,” कडवे राहू दे .मी माझ्या पद्धतीने गातो!” असे म्हणून तलत स्टेजवर गेले आणि ‘आवारा हू…’ हे गाणं सुरुवात केली. म्युझिशियन बरोबरीने पीस वाजवत होते. प्रेक्षकांनी देखील त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. संपूर्ण सभागृहांमध्ये एकच हंगामा झाला. चीन चे पंतप्रधान खुश झाले ते जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. गाण्याचा मुखडा तर झाला पण जेव्हा अंतराची वेळ आली. तेव्हा काय गायचे? तलत ने आयडिया केली. त्याने ‘आवारा हू…’ गाण्याच्या चालीमध्ये आपल्याच एका गाण्याचे शब्द घालून गायला सुरुवात केली. कोणालाच काही कळले नाही! वेळ मारून गेली पुन्हा तलत जेव्हा मुखड्यावर आला तेव्हा पुन्हा ‘आवारा हू…’ सभागृहात जोरदार हंगामा झाला ! (Talat Mahmood)
अशा पद्धतीने तलत महमूद नाही वेळ मारून नेली आणि आपल्या शाही पाहुण्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रम झाल्यानंतर जैन साहेब आणि राज्यपालांनी तलत महमूद यांचे स्पेशल आभार मानले. हा किस्सा तलत महमूद यांनी त्यांच्या एका डॉक्युमेंटरी मध्ये सांगितला होता.