मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?
सध्या मराठी वाहिन्यांचा विचार करता नि:संशयपणे स्टार प्रवाह ही ‘टॉप’ची वाहिनी आहे. कारण टीआरपी रेटिंगमध्ये अव्वल असणऱ्या बहुतांश मालिका या स्टार प्रवाहवरच्याच मालिका आहेत. खरंतर प्रादेशिक भाषांमध्ये स्वतंत्र वाहिनी सुरु करण्याची मूळ संकल्पना ही झी टीव्हीची होती. त्यानुसार ‘झी’ने सर्वात आधी प्रादेशिक वाहिन्या सुरु केल्या. (TRP rating of Marathi channels)
याची सुरुवात झाली १९९९ पासून. यावर्षी झी टीव्हीने झी मराठी (पूर्वी अल्फा टीव्ही मराठी) आणि झी बांगला (पूर्वी अल्फा टीव्ही बांगला) या दोन प्रादेशिक वाहिन्या सुरु केल्या. या दोन्ही वाहिन्या प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्यांनतर झी ने तेलुगू, कन्नड, तामिळ ओडिया, भोजपुरी या भाषांमध्ये प्रादेशिक वाहिन्या सुरु केल्या. इतकंच नव्हे तर, प्रादेशिक चित्रपटांसाठी स्वतंत्र वाहिन्याही सुरु केल्या. याचीही सुरुवात झी टॉकीज या मराठी चित्रपट वाहिनीने झाली. त्यावेळी झी हा मनोरंजन क्षेत्रामधला सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड होता. मग अचानक असं काय झालं की, झी या शर्यतीत मागे पडलं?
इतर प्रादेशिक वाहिन्यांचा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवूया. पण सध्याच्या मराठी मालिकांचा विचार केल्यास झी मराठीवरील एकमेव मालिका टॉप १० मध्ये आहे; ती म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. श्रेयस तळपदे या अभिनेत्याने खूप मोठ्या ब्रेकनंतर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेचं कथानक काहीसं वेगळ्या धाटणीचं आहे. शीर्षक गीतही सुंदर आहे. शिवाय श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे असे बडे स्टारकास्ट यामध्ये असतानाही मालिका टीआरपी मध्ये ‘नंबर वन’ तर सोडाच टॉप ५ मध्येही नाहीये.
झी ने २०१६ साली सुरु केलेल्या ‘झी युवा’ या वाहिनीची अवस्थाही फारशी चांगली नाहीये. ‘युवा’ या नावावरून इथे तरुण मुलांसाठीचे कार्यक्रम प्रसारित केले जातील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही. सुरुवातीच्या काही मालिका सोडल्या, तर इतर मालिका नेहमीच्याच साच्यातल्या होत्या. सध्या झी युवाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. (TRP rating of Marathi channels)
‘झी मराठी’नंतर वर्षभरातच सुरु झालेल्या ‘इ टीव्ही मराठी’ म्हणजेच आत्ताच्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीनेही झी मराठीला तगडी स्पर्धा निर्माण केली होती. पण तरीही झीने मात्र दर्जेदार कार्यक्रम देऊन आपला अव्वल नंबर टिकवून ठेवला होता. पण आता मात्र स्टार प्रवाहने या दोन्ही वाहिन्यांना मागे टाकत मराठी वाहिन्यांमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. खरंतर झी नंतर तब्बल ९ वर्षांनी स्टारने प्रादेशिक वाहिन्यांमध्ये पाऊल टाकलं. पण तरीही आज मराठीमध्ये तरी स्टार प्रवाह अव्वल स्थानावर आहे. काय आहे याचं कारण? मार्केटिंग की कंटेंट? की दोन्ही?
BARC (2020) च्या अहवालानुसार स्टार प्रवाह ही वाहिनी महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीने २०२१ मध्येही आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यावर्षी ही वाहिनी सर्वाधिक म्हणजे ४४.४ अब्ज मिनिटे पाहिली गेली. आता २०२२ मध्येही स्तर मराठीची लोकप्रियता कायम आहे.
ऑरमॅक्स मीडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील अरुधंती ही व्यक्तिरेखा सर्वात आवडती व्यक्तिरेखा ठरली आहे. ही मालिका स्टार जलसा या बंगाली वाहिनीवरील श्रीमोयी (Sreemoyee) या मालिकेचा रिमेक आहे. स्टार प्रवाहवरील अनेक लोकप्रिय आणि टीआरपी रेटिंग्जवर टॉपला असणाऱ्या मालिका ‘स्टार’च्याच इतर प्रादेशिक वहिनींवरील लोकप्रिय आणि टीआरपी रेटींग्जमध्ये टॉपला असणाऱ्या मालिकांवरून घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ, रंग माझा वेगळा (करुथमुथु – मल्याळम), सुख म्हणजे नक्की काय असतं (के आपों के पोर – बंगाली), मुलगी झाली हो (मौना रागम – तेलुगू), सहकुटुंब सहपरिवार (पांडियन स्टोअर्स -तमिळ), फुलाला सुगंधा मातीचा (दिया और बाती हम – हिंदी). (TRP rating of Marathi channels)
‘स्टार’ने जो कंटेंट इतर प्रादेशिक वाहिन्यांवर लोकप्रिय ठरला तोच कंटेंट त्याचा प्रादेशिक ‘टच’ बदलून मराठीमध्ये प्रसारित केला. कारण जरी संस्कृती, भाषा अथवा भौगोलिक रचना वेगळी असली तरी प्रत्येक राज्यांमधील ‘संस्कार’ मात्र थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. त्यामुळे एका राज्यात लोकप्रिय ठरलेला कंटेंट दुसऱ्या राज्यात लोकप्रिय होण्याची शक्यता तुलनेनं जास्त असते. इथे लोकप्रियतेची जवळपास ५०% खात्री सहज देता येते.
दुसरं म्हणजे प्रादेशिक वाहिन्यांवरील कार्यक्रम हे शक्यतो स्थानिक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे असतील, तर त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. हे मर्म स्टार वाहिनीने बरोबर ओळखलं आणि लोकप्रिय कंटेंटमध्ये स्थानिक संस्कृतीचा विचार करून आवश्यक ते बदल केले. उदा. वेस्टर्न गाऊनला थोडा देशी टच मिळाला आणि त्याचा ‘अनारकली’ झाला. हा अनारकली धार्मिक कार्यक्रमांमध्येही वापरला जाऊ लागला. पण वेस्टर्न गाऊन कोणीही धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरला नसता / वापरत नाहीत. हाच ‘फॉर्म्युला’ मालिकांच्या बाबतीत लागू पडला आणि यशस्वीही ठरला. परिणामतः स्टार प्रवाहावरच्या मालिका टीआरपी खेचू लागल्या. (TRP rating of Marathi channels)
सामान्यतः स्त्रीप्रधान मालिका मोठ्या प्रमाणावर टीआरपी खेचतात. पण सध्या मालिका बघणारा बहुतांश प्रेक्षकवर्ग हा मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. यातही महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्त्रीप्रधान, पण या वयोगटाला ‘टार्गेट’ करणारी मुख्य स्त्री व्यक्तिरेखा ही स्टार प्रवाहावरच्या मालिकांमध्ये आवर्जून असतेच असते. हे गणितही स्टारने आपल्या मालिकांमध्ये व्यवस्थित जुळवलं आहे. (TRP rating of Marathi channels)
============
हे देखील वाचा – थ्री इडियट्स: जेव्हा आमिर दारू पिऊन चित्रीकरण करत होता आणि रिटेकवर रिटेक झाले तेव्हा…
============
‘स्टार’चा हा ‘फॉर्म्युला’ अजून किती दिवस यशस्वी ठरेल याबद्दल काही अंदाज बांधणं कठीण असलं तरी प्रेक्षकांची मानसिकता स्टारने चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे स्पर्धेत अव्वल क्रमांकावर राहायचं तर, स्टार अजून एखादा फॉर्म्युला शोधून काढेलच. अर्थात आता मागे पडलेल्या कलर्स मराठी आणि झी मराठी या वाहिन्या यामधून काही शिकणारा का, तसंच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिन्या आता काही नवीन ‘फॉर्म्युला’ शोधणार का, हे मोठे प्रश्न आहेत.