Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

Marathi Movies : मराठी चित्रपटसृष्टीचं नेमकं अडतंय कुठे?
साऊथवाले एकट्या मुंबईत २०० कोटी कमावतात… मग मराठी भाषेचे चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात इतकी कमाई का करू शकत नाही ? असा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही माहित नाही. पण अधून मधून मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले किंवा मराठी प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळला अशी वाक्यं ऐकू येतात… पण खरंच मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचं स्वतंत्र अस्तित्व आहे का? तर याचं उत्तर कदाचित नाही असंच दुर्दैवाने आहे… कारण, मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात बॉलिवूडचं वर्चस्व आहे आणि यात भर म्हणून आता दाक्षिणात्य चित्रपटांची देखील भर पडली आहे… त्यामुळे मुंबईत मराठी चित्रपट मागे राहतो आणि बॉलिवूड-टॉलिवूड पुढे निघून जातात हे वर्षानुवर्ष सुरुच आहे… अशातच एकाच दिवशी २-३ मराठी चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत… आता इथे आपली बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांशी शर्यत तर आहेच अशातच आपण एकमेकांमध्येही स्पधा करु लागलो तर मराठी चित्रपटांचं भविष्य निश्चितच धोक्यात आहे… (Marathi movies 2025)

मुळातच मराठी चित्रपटसृष्टी ही संख्येने फार लहान आहे… आपल्याकडे उत्कृष्ट कलाकार आणि अप्रतिम आशय, विषय जरी असले तरी बिग बजेट चित्रपटांच्या पुढ्यात आपण लहानच पडतो… दुसरी महत्वाची बाब म्हणजे वर्षानुवर्ष मराठी चित्रपटांचं बजेट हे वाढत नाही ही ओरढ दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मातेही करताना दिसतात.. पण त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी म्हणून आपण किती प्रयत्न करतो? मराठी चित्रपट जर का जगवायचे असतील तर मुळात वेगवेगळ्या निर्मिती संस्थानी एकत्र येत चित्रपट करणं फार गरजेचं आहे… तसेच, दिग्दर्शक, निर्माते यांचा एकमेकांशी संवाद वाढणं देखील तितकच गरजेचं आहे… एकीकडे एकाच दिवशी बॉलिवूड आणि साऊथचे चित्रपट रिलीज होतात आणि एकट्या मुंबईत २०० कोटींचा टप्पा पार करतात… यात मराठी चित्रपट कुठेच दिसत नाही… मग अशावेळी मराठी मेकर्सनी मार्केटचा अंदाज घेत, डिस्ट्रीब्युटर्सशी संवाद साधून इतर भाषिक चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा शक्यतो मराठी चित्रपटांसोबत होणार नाहीत याची दक्षता बाळगली पाहिजे…

मराठी मेकर्सने प्रेक्षकांना Quantity की Quality यापैकी काय द्यायचं हे जर का एकजूट होऊन ठरवलं तर नक्कीच मराठी चित्रपट जे १०-१२ कोटींमध्ये अडकले आहेत त्यातून बाहेर पडतील…दुर्दैवाची बाब म्हणजे एका वर्षात जवळपास ५०च्या पुढे मराठी चित्रपट रिलीज होतात; परंतु, ‘सैराट’, ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’, ’नटसम्राट’ असे केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच चित्रपट २०-३० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर पार करतात… हे गणित कुठेतरी बदलणं फारच महत्वाचं असून याकडे मनोरंजनाच्या दृष्टीसोबतच व्यावसायिक दृष्टीने देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे…
====================================
हे देखील वाचा : Ramayana वर आधारित दाक्षिणात्य कलाकृतींचा भांडार!
====================================
दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी ही कथानकांमुळे समृद्ध आहे… परंतु, एकाच दिवशी जर का २ मराठी चित्रपट रिलीज झाले तर एखाद्या चित्रपटाकडे प्रेक्षकांची नक्कीच पाठ वळते आणि त्यातही जर का ‘पुष्पा’, ‘कांतारा’, ‘जवान’ (Jawan) सारखे बड्या कलाकारांचे आणि बजेटचे चित्रपट रिलीज झालेच तर प्रेक्षकांचं प्राधन्य नक्कीच इतर भाषिक चित्रपटांकडे वळतं जे फार दुर्दैवी आहे… प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवू नये यासाठी मुळात मल्टिप्लेक्समध्ये प्राईम शो मिळवणं आणि त्यासोबतच सिंग स्क्रिन थिएटर्स पुन्हा सुरु करत त्यात केवळ मराठी चित्रपटांचे शो लावणं यासाठी पुढाकार घेणं फार गरजेचं आहे…(Bollywood News)

यानंतर सगळ्यात शेवटची बाब म्हणजे मराठीतही बॉलिवूड सारखं ग्रुपिजम तयार झाल्याचं चित्र आहे… काही ठराविक कलाकार अमुक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चित्रपटातच कामं करताना दिसतात… किंवा अमुक कलाकार म्हटलं की आपसूकच अरे याच दिग्दर्शकाचा हा चित्रपट असेल असं विचार करणं स्वाभाविक झालं आहे… आणि हाच लोकांचा विचार बदलणं गरजेचं असून संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी ही एक आहे हे लोकांना दाखवणं काळाची गरज झाली आहे…

फार लांब नाही जरा अलीकडचचं उदाहरण घेऊयात… १२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘दशावतार’ (Dashavatar), ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हे ३ मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले… नावावरुनच प्रत्येक चित्रपटाचं कथानक हे वेगळं असणार याची कल्पना येतेच…परंतु, केवळ या तीन पैकी दशावतार हा एकच चित्रपट तुलनेने बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि बाकी २ चित्रपट मात्र मागे राहिले… महत्वाचं म्हणजे या दिवशी कुठलाही बॉलिवूड किंवा साऊथचा मोठा चित्रपट रिलीजच झाला नव्हता… म्हणजेच काय तर एकाच दिवशी दोन मराठी चित्रपट जरी रिलीज झाले तरी मराठी चित्रपटच धोक्यात आहे ही सत्य परिस्थिती समोर येते… मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी देखील एकाच दिवशी बरेच मराठी चित्रपट रिलीज होणं चुकीचं आहे अशी मतं व्यक्त केली आहेत… आता इंडस्ट्रीतील लोकं गांभीर्याने याचा विचार करतात का? हे पाहणं भविष्यात फार गरजेचं आहे…
-रसिका शिंदे-पॉल
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi