
‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं; म्हणाली,”कलाकार स्वतःमध्येच…”
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या चर्चेत आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतली आहे, तेही स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेद्वारे. या मालिकेतील ‘नंदिनी’ ही तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावते आहे. काही प्रेक्षक म्हणतात, “अशीच बायको हवी,” तर काही म्हणतात, “अशीच सून घरी यावी!”(Actress Mrunal Dusanis)

मृणालने यापूर्वीही अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेद्वारे तिची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा तिचा पहिला पगार फक्त १०,००० रुपये महिना होता. मात्र, तिच्या अभिनयातून तिने स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. ‘तू तिथे मी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. कामात यश मिळवूनही, मृणालने अभिनय क्षेत्रातून काही काळ विश्रांती घेतली. नीरज मोरे या अमेरिकेत नोकरी करणाऱ्या तरुणाशी तिचं लग्न झाल्यानंतर ती काही काळ परदेशात स्थायिक झाली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ती भारतात परतली आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे.

भारतात परतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्यातील काही खास बाबी उघड केल्या. लोकमत फिल्मी या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, तिने इंडस्ट्रीमधल्या कोणाशी लग्न का केलं नाही? त्यावर मृणालने अतिशय प्रामाणिक उत्तर दिलं, “मला असं कोणी मिळालंच नाही. कलाकार हे स्वतःमध्येच इतके गुंतलेले असतात की त्यांच्याकडे दुसऱ्याला वेळ देण्याची क्षमता नसते. मी नीरजला नेहमी म्हणते, ‘तू माझ्यासोबत कसा राहतोस?’ कारण मी स्वतः कलाकार आहे आणि मला माहितीय की आमचं आयुष्य खूप बिझी असतं.”(Actress Mrunal Dusanis)
============================
============================
तिचं म्हणणं होतं की, ”तिला इंडस्ट्रीमधून कुणी नको होतं असं नव्हतं, पण असा कोणी समोर आलाच नाही, ज्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा होतील, नातं जुळेल. आणि मग आयुष्यात अचानक नीरज आला.” आज मृणाल पुन्हा आपल्या आवडत्या क्षेत्रात सक्रीय आहे. तिचं कमबॅक जितकं जोरदार आहे, तितकंच तिचं प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वही लोकांच्या मनात घर करत आहे.