
नॉनव्हेजिटेरियन असलेली Pooja Sawant अचानक का झाली ‘शाकाहारी’; अभिनेत्रीने स्वतःच सांगितले खर कारण !
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत ही केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या सौंदर्यामुळे, फिटनेस आणि नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखली जाते. विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांवर आपली खास छाप पाडली आहे. पण अलीकडेच ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे आणि ते म्हणजे तिचा आहारातील मोठा बदल. कोकणातल्या पारंपरिक मालवणी कुटुंबात वाढलेली पूजा सावंत, लहानपणापासून मासे व मांसाहार यांची सवय असलेली मुलगी. कोकणातील संस्कृती, अन्नपद्धती आणि जीवनशैलीचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर ठसा आहे. ती अनेक वेळा मुलाखतींमध्ये कोकणावरच्या प्रेमाचा उल्लेख करताना दिसते. मात्र, सध्या पूजा संपूर्णपणे शाकाहारी जीवनशैली स्वीकारलेली आहे आणि यामागचं कारण केवळ आरोग्य किंवा फिटनेस नसून तिचं निसर्गप्रेम आणि प्राण्यांप्रती असलेली आपुलकी आहे.(Actress Pooja Sawant)

नुकतेच एका मुलाखतीत पूजाने स्पष्टपणे सांगितलं की, ती पूर्वी खूप मोठी नॉनव्हेजिटेरियन होती. “जंगली” या सिनेमासाठी शूटिंग करत असताना, जंगलात आणि प्राण्यांमध्ये घालवलेला वेळ तिच्या मनावर खोल परिणाम करून गेला. त्या अनुभवांमधूनच तिला एक अंतर्मुख विचार सुचल, आपण एकीकडे प्राण्यांचे रक्षण करत आहोत, त्यांच्यावर प्रेम करत आहोत, पण दुसरीकडे त्यांच्या जीवावर आपला आहार टिकवतोय… ही विचारधारा तिला स्वीकारार्ह वाटली नाही. पूजा म्हणाली, “माझ्या मनात नेहमीच अपराधी भावना राहायची. एकीकडे मी प्राणी वाचवते, आणि दुसरीकडे त्यांनाच खाणं ही दुटप्पी भूमिका मला सतावत होती. त्यामुळेच मी नॉनव्हेज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला.”

शाकाहारी होणं पूजासाठी सोपं नव्हतं. मासे आणि मासाहार हे तिच्या वाढदिवसांपासून ते सणवारांपर्यंत प्रत्येक आनंदाच्या क्षणाशी जोडलेले होते. सुरुवातीला हे सोडणं कठीण गेलं, पण तिच्या मनातील स्पष्ट भूमिका आणि प्राण्यांप्रती असलेली सहवेदना तिला बळ देत गेली. आज ती पूर्ण शाकाहारी आहे, आणि त्यावर तिला अभिमान आहे. या निर्णयामागे पूजाच नाही, तर तिचं संपूर्ण कुटुंबही हळूहळू शाकाहारी होऊ लागलं आहे. पूर्वी रविवारी घरी चिकन, मासे, किंवा इतर नॉनव्हेज पदार्थ हमखास बनायचे, पण आता त्या ठिकाणी पुलाव, अळूवडी, उडदाची वडी अशा पारंपरिक शाकाहारी पदार्थांनी जागा घेतली आहे.(Actress Pooja Sawant)
================================
=================================
पूजाने सांगितलं, “माझ्या घरच्यांनी माझा निर्णय स्वीकारला, त्यांचं खूप आभार मानते. माझे भाऊ-बहीणही आता मुख्यत्वे शाकाहार पाळतात. कधी कधी खाल्लं तरी आमच्या घरात आता नॉनव्हेज शिजवलं जात नाही.” लोकांचा प्रश्न असतो की, “तू एकटी नॉनव्हेज सोडून काय फरक पडणार?” यावर पूजा म्हणते, “बदलाची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. निसर्ग आपल्याला इतकं काही देतो, मग आपण त्याला काहीच परत देणार नाही का? कधी ना कधी आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.” ‘जंगली’ सिनेमाच्या दरम्यान हत्तींसोबत घालवलेला वेळ, जंगलात राहून मिळालेला अनुभव, तिने निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. “माझं खरं शांतीचं स्थान तिथेच सापडलं झाडांमध्ये, मोकळ्या हवेमध्ये, प्राण्यांच्या सहवासात,” असं ती भावनिकपणे सांगते.