
या कारणासाठी शर्मिला टागोर यांनी राजेश खन्नांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला..
राजेश खन्ना म्हणजे सत्तरच्या दशकातील बॉलिवूडचा सुपरस्टार. त्या काळात कित्येक तरुणी राजेश खन्नासाठी वेड्या झाल्या होत्या. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ही जोडी तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती. आराधना चित्रपटानंतर तर या जोडीला लोकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपटातील मेरे सपनो कि रानी, रूप तेरा मस्ताना.. ही गाणी आजही आवडीने ऐकली आणि पहिलीही जातात. या चित्रपटासाठी शर्मिला टागोरला सर्वोत्कृष्ट नायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.
शर्मिला टागोर शिवाय राजेश खन्ना यांची अजूनही काही नायिकांसोबतची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मुमताज, टिना मुनीम, आशा पारेख आणि हेमामालिनी या नायिकांसोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती, पण ‘राजेश-शर्मिला’ ही जोडी प्रेक्षकांसाठी नेहमीच खास होती. मुमताजसोबत दो रस्ते, सच्चा झूठा, आप कि कसम, प्रेम कहानी, असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. तर, आशा पारेख सोबतचे कटी पतंग आणि आन मिलो सजना हे चित्रपट तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. पण ता सर्व नायिकांसोबत त्यांच्या अफेसर्सची चर्चा कधीच रंगली नाही. अपवाद फक्त टिना मुनीमचा!
टिना मुनीम आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये नातं जेव्हा निर्माण झालं तेव्हा राजेश खन्ना यांचं लग्न झालेलं होतं. राजेश खन्ना आणि डिंपल या दोघांमधलं नातं कधीच फुललं नाही. दोघांच्या वयामध्ये १५ वर्षांचं अंतर होतं. यासंदर्भात डिंपलने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, “ज्या दिवशी माझं आणि राजेश खन्नाचं लग्न झालं त्याच दिवशी आमच्या आयुष्यातला आनंद कायमसाठी संपला.”
राजेश खन्ना यांचं आयुष्य अनेक घटनांनी भरलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते जेवढे यशस्वी होते तेवढंच त्यांचं वैवाहिक आयुष्य अपयशी ठरलं होतं. राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे दुःखात बुडालेल्या राजेश खन्ना यांना आधार मिळाला तो टिना मुनीम यांचा. पण ते टिनाकडे आपलं मन मोकळं करत असत. त्यांच्यासाठी टिना केवळ आधार होती. तिच्यासोबतच्या नात्यामध्येही ते कधीच खुश नव्हते. राजेश खन्ना यांचं खरं प्रेम होतं ते अंजु महेंद यांच्यावर. दोघंजण तब्बल ७ वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहिली होती. परंतु काही कारणांनी या दोघांचं नातं संपुष्टात आलं तरी प्रेम मात्र कायम राहिलं. असो.

आराधनाच्या वेळी राजेश -शर्मिला ही जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन झळकली. त्यावेळी राजेश खन्नांइतक्याच शर्मिला टागोरही लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांच्या दोन्ही गालावर पडणाऱ्या खळ्या पाहून कित्येक चाहते घायाळ होत असत. इतर कोणत्याही अभिनेत्रींच्या गालावर अशा खळ्या पडत नसत. गालावरच्या खळ्या हीच त्यांची जणू मुख्य ओळख होती. दोन लोकप्रिय कलाकारांना एकत्रित बघणं प्रेक्षकांसाठी सुखद अनुभव होता. यामुळेच नंतरही या दोघांचे कित्येक चित्रपट सुपरहिट झाले. अमर प्रेम, आराधना, सफर, छोटी बहू, आविष्कार असे काही चित्रपट आजही या जोडीसाठी ओळखले जातात.
शर्मिला टागोर यांच्यासोबत त्यांची ऑनस्क्रीन जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. पण ती फार काळ टिकली नाही. कारण अचानक शर्मिला टागोरनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेण्यामागे कारणही तसंच होतं. राजेश खन्ना सुपरस्टार होतेच, पण शर्मीला टागोरही यशस्वी अभिनेत्री होत्या. स्टारडमचे कोणतेही नखरे त्या करत नव्हत्या आणि राजेश खन्ना याच्या बरोबर उलट. राजेश खन्ना सेटवर कधीही वेळेवर पोचत नसत. इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना आणि वेळ हे समीकरण कधी जुळलंच नाही. याच कारणामुळे शर्मिलाजींनी त्यांच्यासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.
==============
हे ही वाचा: ‘त्या एका भूमिकेमुळे वर्षा उसगावकर यांच्यामध्ये घडला एक मोठा बदल
जेव्हा वर्णद्वेषाचा फटका स्मिता पाटील यांना बसला…. तो ही भारतात!
==============
‘राजेश खन्ना: एक तनहा सितारा’ या ऑडिओबुकमध्ये, याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये शर्मिलाजींनी सांगितलं, “मुझ पर काका की जो बात असर करते थी, वो थी उनके काम पर देरी से पहुचने की आदत. क्यूंकी 9 बाजे की शिफ्ट के लिए काका कभी भी 12 बाजे से पहले नहीं पहुँचते थे..”
अशाप्रकारे राजेश खन्ना यांच्या चुकीच्या सवयीमुळे शर्मिलाजींनी त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. जर असं झालं नसतं तर, या जोडीचे अजूनही अनेक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले असते.