दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
किशोर कुमारच्या गाण्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर बंदी ?
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार पार्श्वगायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या गाण्यांवर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनने बहिष्कार टाकला होता, बॅन लावला होता. त्याकाळात किशोर कुमारचे (Kishore Kumar) कुठलेही गाणे या दोन माध्यमातून प्रसारित केले जात नव्हते. खरं तर किशोर कुमारसाठी हा मोठा गोल्डन पिरेड होता पण त्याला बहिष्काराला सामोरे जावं लागलं होतं. का त्याच्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती? काय होत हा नेमका किस्सा? स्वतंत्र भारतामध्ये १९७५ ते १९७७ हा कालखंड आणीबाणीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात अंतर्गत सुरक्षेसाठी इमर्जन्सी जाहीर केली होती. या काळात नागरिकांच्या अनेक अधिकारांवर गदा आली होती. मीडिया आणि प्रेस यांच्या स्वातंत्र्यावर मोठी बंधने आली होती. याच काळात हा प्रसंग घडला होता. २६ जून १९७५ या दिवशी आणीबाणी जाहीर झाली आणि त्याचा पहिला फटका बसला गुलजार यांच्या ‘आंधी’ या चित्रपटाला. ‘आंधी’ या चित्रपटात सुचित्रा सेन यांनी साकारलेली भूमिका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काहीजण कोरिलेट करू लागल्यामुळे त्याकाळचे सूचना आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी चित्रपटाचे निर्माते जे ओम प्रकाश यांना बोलावून त्यातील अनेक प्रसंगांवर आपली आपत्ती जाहीर केली. त्यात अनेक कट्स सुचवले. एक प्रकारे चित्रपटावर अघोषित बंदीच आणली!
आणीबाणीचा काळ जसा जसा पुढे जाऊ लागला, तसं तसा लोकांमधील असंतोष वाढू लागला. समाजाला आणीबाणीचे महत्त्व कळावे म्हणून शासकीय पातळीवर अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले. शाळा कॉलेजातून आणीबाणीचे महत्त्व सांगणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. या काळात माध्यमाची साधने कमी असल्यामुळे चित्रपट आणि चित्रपट कलावंत यांच्यामार्फत आपण चांगल्या प्रकारे आपल्या सरकारच्या योजनांचा प्रपोगंडा करू शकतो असे सरकारला वाटू लागले.
त्यातूनच मुंबईला होणाऱ्या एका काँग्रेसच्या अधिवेशनात किशोर कुमार यांनी येऊन सरकारी योजनावर आधारित काही गाणी गावीत असे ठरले. त्याप्रमाणे के सी जैन या सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरीने किशोर कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व योजना समजावून सांगितली. किशोर कुमारला (Kishore Kumar) हा सर्व प्रकार अजिबात आवडला नाही त्याने सरळ सरळ असे प्रचारकी गाणे गायला नकार दिला. जैन यांनी त्यांचे सीनियर आणि सुचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सेक्रेटरी एस एम एच बर्नी यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांचा इगो दुखावला. एक साधा गायक आपली मागणी मान्य करत नाही याचा त्यांना राग आला. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांच्याशी संपर्क साधून “आपल्याला काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला लागेल.” असे सांगितले.
=========
हे देखील वाचा : हृदयविकार असताना मुकेश यांनी हे गाणे अजरामर केले!
=========
त्याप्रमाणे ४ मे १९७६ रोजी किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याविरुद्ध अध्यादेशच काढला गेला. यात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली. तसेच किशोर कुमारच्या मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व गाण्यांच्या रेकॉर्ड्स विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली. किशोर कुमार अभिनय करत असलेल्या चित्रपटांवर सरकारची करडी नजर राहू लागली. थोडक्यात किशोर कुमारला (Kishore Kumar) सर्व बाजूने घेरले गेले. पुढचे एक वर्षभर हा बॅन चालू होता. पण मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार आहे. या सरकारने आणीबाणीतील काळ्या घटनांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश शहा यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग नेमला. या आयोगाच्या समोर इतर अनेक प्रकरणांसोबतच किशोर कुमारचे (Kishore Kumar) प्रकरण देखील आले. या आयोगाने या निर्णयाच्या विरुद्ध आपले मत व्यक्त करत तात्काळ किशोर कुमारच्या गाण्यांवरील आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील बंदी उठवली. गेल्या वर्षी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा उल्लेख केला होता.