
‘ठरलं तर मग’ मध्ये पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार का? निर्मात्या सुचित्रा बांदेकरने दिलं उत्तर
‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. ज्योती चांदेकर यांना प्रेक्षकांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या पूर्णा आजीच्या भूमिकेतून भरभरून प्रेम दिलं. त्यांची ही भूमिका एवढी लोकप्रिय झाली की, चाहते त्यांना खऱ्या आयुष्यातही पूर्णा आजी म्हणूनच ओळखू लागले. पण आता त्यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? ही भूमिका रिप्लेस होणार का? असे प्रश्न प्रेक्षकांमध्ये चर्चिले जात आहेत. अनेक चाहत्यांनी “आम्ही दुसऱ्या कोणालाही पूर्णा आजी म्हणून स्वीकारू शकत नाही”अशा भावना व्यक्त केल्या आहेत.(Tharal Tar Mag Serial)

या पार्श्वभूमीवर मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “ज्योती चांदेकर अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत होत्या. पण पूर्णा आजीच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. कलाक्षेत्रात नेहमी म्हटलं जातं, ‘शो मस्ट गो ऑन!’ पुढे एखाद्याला ही भूमिका द्यावी लागेल, पण हा निर्णय खूप कठीण आहे. चॅनेल आणि आमच्या प्रोडक्शन टीमने अजून या बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.”

सुचित्रा पुढे असही म्हणाल्या की, “आम्हाला आणि प्रेक्षकांना सावरण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. प्रेक्षकांच्या कमेंट्समधून स्पष्ट जाणवतंय की, तेही दुसऱ्या कोणालाही पूर्णा आजी म्हणून पाहू इच्छित नाहीत. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.” ज्योती चांदेकर यांच्या निधनाबद्दल बोलताना त्या भावुक झाल्या. “ती अशी अचानक निघून गेली, यावर विश्वासच बसत नाही. तिला आम्ही कधीच विसरू शकणार नाही. संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी हा खूप मोठा धक्का आहे,” असे सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले.(Tharal Tar Mag Serial)
==============================
==============================
ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रेक्षकांसाठी आणि कलाविश्वासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील हे नक्की.