Y Movie Review: पुरुषप्रधान संस्कृतीला आरसा दाखवणारा ‘वाय’ सिनेमा
पुरोगामी महाराष्ट्रात मुलांना जन्म देणारी मशीन याच भावनेतून महिलेकडे पाहिले जाते ही बाब जितकी संतापजनक तितकीच समाजाचे मानसिक मागासपण, वैचारिक दिवाळखोरी सिद्ध करणारी ठरते. २१व्या शतकाची दोन दशके संपत आली तरी वंशाला दिवा हवाच हा अट्टहास कायम आहे. या मानसिकतेतून भोवतालच्या समाजातला एक मोठा वर्ग अद्याप बाहेर आलेला नाही, किंबहुना सरकारी यंत्रणा आणि सामाजिक व्यवस्थेचे हे अपयश म्हणावे लागेल. आजही समाजमनाची योग्य मशागत न झाल्यामुळे बुरसट विचारसरणीची बिजे मुळापासून उखडली गेली नाहीत. ती पुन्हा-पुन्हा अंकुरत राहतात. हेच अंकुर तोडण्याचे काम अजित वाडीकर लिखित दिग्दर्शित ‘वाय’ (Y Movie Review) हा सिनेमा करतो. सिनेमा पाहिल्यावर दिग्दर्शक अजितने या ‘गर्भपात’ विषयावर सखोल अभ्यास केलेला जाणवतो. कारण, या घटनेशी निगडित संभाव्य पर्यायी कथा देखील त्याने सिनेमात मांडल्या आणि अधोरेखित केल्या आहेत.
स्त्री भ्रूणहत्या हे केवळ पापच नव्हे, तर देश आणि साऱ्या समाजासाठी एक शाप आहे. प्रश्न असाही आहे की, नि:स्वार्थपणे सुख-सुविधांचा त्याग करणारी आई गर्भातील शिशूचा बळी देण्यास कशी संमती देते? का गर्भातील मुलीस जगण्याचा अधिकार नाही? कोणत्याही जीवितास जगण्याचा अधिकार नाकारणे, त्यापासून वंचित ठेवणे हे पाप आहे.
आश्चर्य म्हणजे धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या आपल्या समाजात जेथे मुंगीलादेखील जपण्याचा प्रयत्न केला जातो तिथे बिनदिक्कतपणे स्त्री भ्रूणहत्या कशी काय केली जाऊ शकते? हे साऱ्या मानवजातीला कलंकित करणारे कृत्य आहे. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की, समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी स्त्री जन्माचे प्रमाण वाढवून लिंग गुणोत्तर वाढवणे आवश्यक ठरते. त्यासाठी गर्भ लिंग निदान चाचणीस आळा घालणे आणि स्त्री भ्रूणहत्येच्या निमित्ताने होत असलेला सामाजिक अध:पात रोखण्यासाठी विशेषत: प्रत्येक कुटुंबातूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा प्रयत्न ‘वाय’ हा सिनेमा करतो. (Y Movie Review)
सिनेमांचं नाव ‘वाय’ (Y) असं आहे. हे असं का? हे जाणून घेण्यासाठी थोडी उजळणी करुन देतो. पुरुष आणि स्त्रिया यांच्यामधील मूलभूत जनुकीय बदलाला ‘वाय’ हे गुणसूत्र प्रामुख्याने कारणीभूत असते. म्हणजेच जन्माला येणारे बाळ मुलगा असणार, की मुलगी… ही बाब ‘वाय’ या गुणसूत्रावर अवलंबून असते. या गुणसूत्रांना सेक्स क्रोमोझोम्स (लिंग गुणसूत्रे) असेही म्हटले जाते. स्त्रियांमध्ये एक्स आणि एक्स (XX) अशी गुणसूत्रे असतात, तर पुरुषांमध्ये एक्स आणि वाय (XY) या गुणसूत्रांनी ही जोडी असते. अर्थात जन्माला येणारे बाळ हे मुलगा असणार की मुलगी यासाठी पुरुषच प्रामुख्याने कारणीभूत असतो. त्यामुळे मुलगी झाली म्हणून स्त्री दोष देणाऱ्या समाजासाठी हा सिनेमा नवी दृष्टी देणारा आहे. (Y Movie Review)
सिनेमाची पटकथाही हायपरलिंक पद्धतीची आहे. ज्यात एकाच वेळी एकाहून अधिक कथांचे ट्रॅक सुरू असतात, हे उत्तरार्धात एकत्र येतात. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या या सिनेमात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी काही घटना घडत आहेत. ज्यांचा एकमेकांशी संबंध आहे. ही अशी पटकथा समजून घेण्यास प्रेक्षकांना काहीशी गुंतागुंतीची वाटली तरी; नवी सिनेमॅटिक दृष्टी यातून प्रेक्षकांना नक्कीच मिळेल.
हा सिनेमा स्त्रीकेंद्रित असला तरी तो पुरुषप्रधान संस्कृतीला आरसा दाखवणारा आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घटना आणि प्रकरणे घडत असताना आपल्याला त्याची माहितीही नसते. नैतिकतेचा मुखवटा घेतलेल्या समाजाचे वास्तव आपल्या ‘वाय’ सिनेमात दिसते. वास्तववादी आणि मन सुन्न करणारी ही कथा मराठी सिनेमांच्या पटलावर आज महत्वपूर्ण ठरते. सध्या एका चौकटीतील सिनेमांची रांग मराठी सिनेसृष्टीत लागलेली आहे. त्यामुळे हा विषय प्रेक्षकांना नवं काहीतरी दाखवण्याचं काम करतो.
सिनेमाच्या कथानकात केंद्रस्थानी असलेलं पात्र डॉ. आरती देशमुख (मुक्ता बर्वे) ही शासनाच्या आरोग्य विभागाची अधिकारी आहे. विश्रामपूरमध्ये बेकायदेशीर पद्धतीने गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटलवर कारवाई करणं; हा तिचा कार्यभाग असतो. हेच कर्तव्य पार पडल्यानं ती शासकीय पातळीवर अडचणीत येते. डॉ. पुरुषोत्तम गायकवाड (नंदू माधव) असाच एक डॉक्टर आहे जो गर्भपातसारखे दुषकृत्य करतोय. हे कृत्य पुराव्यानिशी समाजासमोर आणि शासनासमोर आणण्यासाठी डॉ. आरतीला कसा लढा द्यावा लागतो? याची साक्ष देणारा हा सिनेमा आहे. (Y Movie Review)
शीर्षक नायिका मुक्ता बर्वे हिनं सिनेमात दमदार काम केलं आहे. सोबतच प्राजक्ता माळी, नंदू माधव, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते यांची कामही उमदा आहेत. सिनेमातील प्राजक्ताचे पात्र दिग्दर्शकाला अधिक खुलवता आलं असतं. उत्तार्धारात हे पात्र अधिक सक्षमपद्धतीनं पटकथेत सादर करता आलं असतं. कारण, उत्तरार्धातील तीच पात्र अधांतरी आहे.
============
हे देखील वाचा – Bhirkit Movie Review: भरकटलेल्या मानवतेचा पट
============
अभिनयाच्या पातळीवर नंदू माधव यांचं काम उत्कृष्ट आहे. सहजरित्या त्यांनी त्यांची भूमिका निभावली आहे. सोबतच सिनेमांची आणखी एक जमेची बाजू म्हणजे सिनेमांचे पार्श्वसंगीत. सिनेमात पार्श्वसंगीताचा वापर पूरक करण्यात आला आहे. परिणामी सिनेमातील दृश्य अधिक वास्तवाशी जोडली जातात. त्यांचा प्रेक्षकांवर खोलवर परिणाम होतो. सिनेमाचे संवादही नैसर्गिक आहेत. खासकरुन सुहास शिरसाटच्या तोंडी असलेले संवाद अधिक लक्ष वेधतात. बाकी सिनेमा तांत्रिकदृष्ट्या देखील समाधानकारक झाला आहे. विषय गंभीर असला तरी त्याची दखल सर्वांनी घ्यायला हवी. हा सिनेमा जरुर पाहावा, नवा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आणि स्वतःला आरशात पाहण्यासाठी. (Y Movie Review)
सिनेमा : वाय
कथा, दिग्दर्शन : अजित वाडीकर
लेखन : अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ, संदीप दंडवते
कलाकार : मुक्ता बर्वे, नंदू माधव, संदीप पाठक, प्राजक्ता माळी
छायांकन : राकेश भिलरे
दर्जा : तीन स्टार