‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘ये चांद सा रोशन चेहरा…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा धमाल किस्सा!
शम्मी कपूर आपल्या पडद्यावरील गाण्यांबाबत खूप दक्ष असायचा. अगदी गाण्याच्या सिटींगपासून रेकॉर्डिंगपर्यंतच्या या सर्व प्रोसेसचा तो साक्षीदार असायचा. ते गाणं पडद्यावर कसं साकारायचं हे तो तिथेच ठरवायचा. बऱ्याचदा रफीला तो ते गाणं अधिक कॅची कसं होईल ते सांगायचा. रफीला तो गाण्यात खूप हरकती घ्यायला देखील सांगायचा. रफिला देखील शम्मी कपूरची पडद्यावरची स्टाईल माहिती होती. त्यानुसार तो देखील शम्मीच्या प्रत्येक हट्टाला पूर्ण करायचा. (O. P. nayyar)
एकदा मात्र अभिनेता शम्मी कपूरचा एक सल्ला संगीतकार ओपी नय्यर (O. P. nayyar) ऐकायला तयारच नव्हते. रफी त्यांना सांगून सांगून थकला पण ओपी आपल्या निर्णयावर ठाम होते. ते गाण्यांमध्ये कुठलाही बदल करू इच्छित नव्हते. शम्मी कपूर खूप नाराज झाला. पण शेवटी मात्र तसंच झालं जसं शम्मी कपूरला हवं होतं. हे मिरॅकल कसे घडले? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. कोणतं होतं ते गाणं? आणि काय होत हा किस्सा?
दिग्दर्शक शक्तीसामंत यांचा ‘कश्मीर की कली’ हा चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर ही जोडी होती. शर्मिलाचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. चित्रपटाला संगीत ओपी नय्यर यांचे होते. या म्युझिकल हिट सिनेमाचं सर्व चित्रीकरण काश्मीरच्या नयनरम्य परिसरात झालं होतं. या सिनेमात एक गाणं होतं ‘ये चांद सा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया….’ गाण्याचे बोल ऐकून शम्मी एकदम खुश झाला होता.
या गाण्यांमध्ये पडद्यावर खूप हरकती करता येतील असं त्याने ठरवलं होतं. या गाण्याचा शेवट यातील एक ओळ पुन्हा पुन्हा गात टेम्पो वाढवायचा असं त्यांना ठरवलं होतं. ज्याला इंग्रजीमध्ये क्रीसेन्डो म्हणतात त्या पद्धतीने गायचं असं त्याने ठरवलं होतं त्या पद्धतीने त्याने संगीतकार ओपी नय्यर (O. P. nayyar) यांना सांगितले. “रेकॉर्डिंग करताना रफीला शेवटची ओळ अशा रीतीने गायला सांगा की तीच तीच ओळ द्रुत गतीत गात गाणे उच्च टिपेला पोहोचेल आणि संपेल!” पण संगीतकार ओपी म्हणाले, ”असं काही होणार नाही. मी माझ्या पद्धतीने रेकॉर्ड करणार आहे. गाण्याची लांबी विनाकारण वाढेल सर्व गाणं खराब होऊन जाईल. मी तुझा कुठलाही सल्ला ऐकणार नाही!”
शम्मी कपूरने त्यांना हर तऱ्हेने समजून सांगितले की, ”मला इथे ही स्टेप घ्यायची आहे. मला असं करायचं आहे. त्यासाठी असं करणे गरजेचे आहे.” पण संगीतकार ओपी म्हणाले, ”तसं काही नाही होणार नाही. गाणं रेग्युलर पद्धतीने संपेल.” झालं. शम्मी कपूर खूप नाराज झाला. काय करायचे? तो सरळ रफीला जाऊन भेटला आणि त्याने सर्व त्याचा प्लॅन सांगितला. रफीला देखील तो प्लॅन आवडला. तो शम्मीला म्हणाला, ”काळजी करू नको मी ओपीला बोलून बघतो.” रफी थेट ओपीला जाऊन भेटले आणि म्हणाले, ”ओपी तुम्हे क्या प्रॉब्लेम है. मुझे गाने में कोई प्रॉब्लेम नही. उसे परदे पर काम करने में प्रॉब्लेम नही. तो तेनु क्या प्रॉब्लेम है?”
त्यावर ओपी (O. P. nayyar) म्हणाला, ”गाण्याची लांबी वाढेल आणि ते बरोबर दिसणार नाही.” त्यावर रफी म्हणाले, ”ते आपण नंतर पाहू. जर तसं वाटलं तर तो पोर्शन कट करून टाकू.” आता मात्र ओपीना नकार देता आला नाही. अशा पद्धतीने हे गाणं रेकॉर्ड झालं आणि या गाण्यांमध्ये चित्रीकरणाच्या वेळी शम्मी कपूरने जबरदस्त धमाल केली. ‘तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया’ ही ओळ रफीने इतक्या द्रुतगतीमध्ये वाढवत वाढवत मस्त गायली की गाण्याला एक वेगळाच इफेक्ट आला!
=======
हे देखील वाचा : ‘या’ गाण्याच्या शूट वेळी अमिताभ बच्चन होते नाराज !
=======
‘कश्मीर की कली’ या चित्रपटाच्या प्रीमियरला ओपी (O. P. nayyar) देखील उपस्थित होते. या गाण्याचे चित्रीकरण पाहिल्यानंतर त्यांनी शम्मी कपूरला मिठी मारली आणि म्हणाले, ”यार तुने तो कमाल कर दी!” अर्थात हे सर्व रफीमुळे साध्य झाले होते. त्या दिवशी जर रफीने ओपीला व्यवस्थित पटवले नसते तर कदाचित हा प्रयोग झाला नसता. रफीकडे तो एक जबरदस्त गुण होता. त्यामुळे पडद्यावर कोणता कलाकार गातो आहे हे रफीच्या स्वरातून लक्षात यायचे! मग जॉनी वॉकर वर चित्रित ‘सर जो तेरा चकराये’ हे गाणं असो किंवा दिलीप कुमारवर चित्रित ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गाणं असो किंवा गुरुदत्तवर चित्रित ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है… ‘ सारखं गंभीर गाणं असो. प्रत्येक व्यक्तिरेखेला रफीने आपल्या स्वरातून १०० % व्यक्त केलं!