यल्लो…ची जादू
जिद्द…चिकाटी…आत्मविश्वास…या सर्वांचा संगम म्हणजे यल्लो चित्रपट….
4 एप्रिल रोजी या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाली. मंडळी आठवलं का, एक स्पेशलचाईल्ड…तिची आई…मुलगी अशी कशी म्हणून त्रस्त झालेले वडील. वडीलांच्या या वागण्याला कंटाळून या स्पेशल मुलीला एकाट्यानं वाढवण्यासाठी सज्ज झालेली आई. मुलीचा मामा…आणि मुलीला, ती स्पेशल नाही तर सुपर स्पेशल असल्याची जाणीव करुन देणारा स्विमींगचा कोच…हो. तोच चित्रपट मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये यांच्या अभिनयानं सजलेला. आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या दिग्दर्शन प्रवासाचा पहिलाच टप्पा सुपर हिट करणारा…यल्लो…
यल्लो ही एक सत्यकथा आहे. गौरी गाडगीळ यांचा प्रेरणादायी प्रवास. जन्मत: असलेल्या ‘डाऊन सिंड्रोम’ मुळे ‘स्पेशल चाइल्ड’ हे बिरुद कायम स्वरुपी चिटकलेली गौरी परिस्थितीबरोबर लढत या स्पेशल लेबलच्या पुढे जाते. हा प्रवास पडद्यावर अनेकांना प्रेरणा देऊन गेलाय. चित्रपटात गौरीनं स्वतःची भूमिका साकारली आहे.
आज सहा वर्षानंतरसुद्धा हा चित्रपट बघतांना नव्यानं बघतोय असं वाटतं. महेश लिमयेनं या चित्रपटात जादू केलीय. अगदी छोटे छोटे संवाद जिवनाचा अर्थ सांगतात…आपली मुलगी अशी स्पेशल आहे, तिला नाकारणारे वडील. या गौरीच्या आईची काय अपेक्षा असते, ती कधीतरी तिच्या पायवर उभी राहील, एवढीच. आपणा सर्वांच्या आपल्या मुलांकडून याच अपेक्षा असतात…पण गौरी ही स्पेशल आहे. तिच्या आईला हा स्पेशलपणाच संपवायचा असतो. ती तिला शाळेत घालते. इथे तिचं आणि पाण्याचं जवळचं नातं आहे, हे शिक्षक जाणतात. आपल्या मुलीकडून काही अपेक्षा करणा-या आईला, या मुलांकडून काही अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना आपण म्हणजेच समाजानं स्विकारणं महत्त्वाचं आहे, हे आईला समजवून सांगतात…
या सर्वांत मजा आणली आहे ती उपेंद्र लिमयेनं. स्विमींगचा कोच…काहीसा कडक..पण गौरीला तो तिची ओळख देतो…तरीही आईला कुठेतरी भीती असते. आपली मुलगी हरली तर…इथे तिचा मामा तिच्या सोबत असतो. ऋषीकेश जोशीनं अगदी ख-याखु-या मामाची भूमिका साकारली आहे. मामा आणि भाचेमंडळी हे अजोड नातं असतं. इथंही तसंच आहे. आपली भाची स्पेशल असली तरी हा मामा तिच्यावर तेवढंच प्रेम करतो. तो आपल्या बहिणीला समजावतो, जो मुळात शुन्यावर असतो, त्याला हरण्याची कधीही भीती नसते, हे साधे आणि सोप्पे सत्य….
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताकडून गौरीची निवड होते. पण यावेळी झालेली स्पर्धा लक्षवेधक असते. गौरीचा अभिनय आणि महेश लिमयेंचं दिग्दर्शन यांची जादू या सिनमध्ये पहायला मिळते. महेशनं एक दिग्दर्शक आणि सिनेमोटोग्राफर म्हणून या शेवटच्या सिनमध्ये अक्षरशः प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. निकालाची उत्सुकता…पाण्याखाली होण्या-या शूटची कमाल…असा संगम या सिनमध्ये केला आहे. गणेश पंडीत आणि अंबर हडप यांनी ‘यलो’चे लेखन केले आहे. गतीमंद मुल आहे म्हणून कुठेही अरे…अरे…अशी भावना नाही. गेली अनेक वर्ष सिनेमोटोग्राफर म्हणून काम करणारे महेश लिमयेंनी आपला सगळा अनुभव या चित्रपटात लावलाय. त्यामुळे गौरीच्या भोळ्या चेह-याचे भाव आपलेसे करतात. चित्रपट बघतांना आपण काही सेटमधलं बघतोय असं वाटत नाही. तर हे प्रत्यक्षात आहे, असं वाटावं असं चित्रीकरण आहे. एकूण काय रितेश देशमुख निर्माता असलेला यल्लो चित्रपट या सुट्टीमध्ये बघायला मिळाला तर नक्की बघा. कधीही हरायचं नसतं. जिथे अपयश आहे, असं वाटतंय तिथेच यश लपलेलं असतं. फक्त त्यासाठी थोडी मेहनत करायची गरज असते. हेच हा यल्लो सांगतो.
– सई बने